ताज्या बातम्या

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन
वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि दिल्ली कॉंग्रेसच्या अध्यक्षा शीला दीक्षित यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शीला दीक्षित यांनी १५ वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. दिल्लीतील एक्सॉर्ट रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १९९८ ते २०१३ या काळात त्यांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. दीक्षित यांच्या निधनावर कॉंग्रेसमधून शोक व्यक्त होत आहे. देशभरात कॉंग्रेसची पडझड होत असताना शीला दीक्षित यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या निधनामुळे कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
शीला दीक्षित यांनी तीन वेळा दिल्लीचे मुख्यमंत्री पद भूषावलं आहे. दिल्लीमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या मुख्यमंत्री म्हणून शीला दीक्षित यांना ओळखलं जातं. ३१ मार्च १९३८ रोजी शीला दीक्षित यांचा जन्म पंजाबमधील कपूरथला येथे झाला होता. शीला दीक्षीत यांचे शिक्षण दिल्लीमध्ये झालं आहे. दिल्लीच्या कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी स्कूलमधून शिक्षण घेतलं. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून मास्टर्स ऑफ आर्ट्समध्ये पदवी घेतली.
    शीला दीक्षित यांनी १९८४ ते १९८९ पर्यंत उत्तर प्रदेशमधील कन्नौज लोकसभेच्या खासदार होत्या. १९८६ ते १९८९ या कालावधीत शीला दीक्षित यांनी केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारीही सांभाळली होती. शीला दीक्षित यांची २०१४ मध्ये केरळ राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. मात्र, त्यांनी २५ ऑगस्ट २०१४ मध्ये राजीनामा देत कॉंग्रेसमध्ये पूर्णकाळ कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला होता. यंदाच्या लोकसभा निवडुकीत शीला दिक्षीत यांना भाजपाच्या मनोज तिवारीकडून पराभवचा धक्का बसला आहे. १९८४ ते १९८९ या कार्यकाळात शीला दीक्षित यांनी संयुक्त राष्ट्र आयोगात ५ वर्ष भारताचं प्रतिनिधीत्व करून महिलांच्या समस्येकडे संयुक्त राष्ट्राचं लक्ष वेधलं होतं.

अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Best Reader's Review