ताज्या बातम्या

महाराष्ट्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करा  -नाना पटोले

महाराष्ट्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करा 
-नाना पटोले
सांगली (रिपोर्टर):- राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाला पावसाबाबत सूचना देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले. मुख्य सचिवांना नोटीस देऊनही कसूर केली. आता महाराष्ट्र व कर्नाटकचे मुख्यमंत्री एकमेकांना दोष देत आहेत. या दोघांविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात यावा. यासंदर्भात याचिका दाखल करणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान कॉंग्रेसचे अध्यक्ष माजी खा. नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
   ते म्हणाले की, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नऊ दिवस महापुराचे तांडव आहे, जणू आभाळच फाटलं आहे. शासन पातळीवर यंत्रणा अपयशी ठरली आहे. हा केवळ राजकीय आरोप नसून वस्तूस्थिती आहे. अतिवृष्टीबाबत दोन तारखेपासून सातत्याने आपत्ती व्यवस्थापनाला सूचना केल्या आहेत. तरीही त्यांनी मुद्दामहून दुर्लक्ष केले. मुख्यमंत्री फडणवीस महाजनादेश दौर्‍यावर होते. ५ तारखेला राज्याच्या मुख्य सचिवांना आम्ही नोटीस देखील दिली. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार तात्काळ कार्यवाही केली नाही तर हायकोर्टात दाद मागता येते. २००५ च्या महापुरावेळी दिवंगत नेते पतंगराव कदम, आर. आर. पाटील यांनी आलमट्टी धरणातील पाण्याच्या साठ्याबाबत कर्नाटक राज्याला कळवून प्रसंगी ते फोडण्याचा इशारा दिला होता. आता महाराष्ट्र व कर्नाटकात भाजपचेच सरकार आहे, तरीही दोन्ही मुख्यमंत्री एकमेकांना दोष देत आहेत त्यामुळे या प्रकरणात दोघांवर ३०२ चे गुन्हे दाखल करावेत, यासाठी याचीका दाखल करण्याची तयारी केली आहे. पटोले पुढे म्हणाले की, पुरग्रस्तांना मदतीसाठी अन्य जिल्ह्यातून मदत येत असताना आरएसएसने स्वत:चे लेबल त्यावर लावून ते वाटप करण्याचा उद्योग चालविला आहे. पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी देखील ज्या भागातून मतदान मिळाले तेथे बोट प्रथम पाठविली गेल्याच्या तक्रारीही ऐकावयास येत आहे. २००५ च्या महापुरात दुसर्‍या दिवशी मदत सुरू केली तर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस अद्याप निर्णय घेत नाहीत. त्यांचा डीएनए तपासण्याची वेळ आली आहे. दुसर्‍या बाजीरावप्रमाणे त्यांचा कारभार सुरू आहे. सांगली, कोल्हापुरातील महापुरातील परिस्थिती हाताळण्यासाठी मिलिट्रीकडे सर्व जबाबदारी द्यायला हवी होती. या संकटाला राष्ट्रीय आपत्ती म्हणून अद्याप घोषीत केले नाही. राष्ट्रीय आपत्ती घोषीत केली तरच पुरग्रस्तांना न्याय मिळू शकते, असे ते या वेळी म्हणाले. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पूरग्रस्तांना मदत केली मात्र अद्याप कॉंग्रेसने का मदत केली नाही? या प्रश्‍नावर पटोले म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पूरग्रस्तांना मदत करताना लेबल लावून करत आहे. ते काही उपकार करत नाहीत, परंतु उपकार केल्याप्रमाणे भासवत आहेत. आम्हाला फोटो, प्रसिद्धी काहीच नको आहे. आज मुस्लिम समाजाने ईद साजरी न करता पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कार्याला सॅल्यूट आहे, अशा प्रकारचा आदर्श घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review