ताज्या बातम्या

अपत्ती आणि माणुसकी 

अपत्ती आणि माणुसकी 
नैसर्गीक अपत्ती नेहमीच मानवी जीवनाला उध्दवस्त करत असते. वादळ, अतिवृत्ती, पुर, दुष्काळ असे संकट सातत्याने कोसळू लागले. पुर, वादळ, दुष्काळ हे तीन संकटे गहीरे होवू लागले. पृथ्वी तलावर संकटे निर्माण होणे याला काही प्रमाणात माणुसही जबाबदार आहे हे नाकारुन चालणार नाही. माणसाच्या चुका आणि माणसाच्या हावरटपणामुळे निसर्गात बदल होवू लागले. शहरे बाकासुरासारखे वाढू लागले. वाढते शहरीकरण हे जमिनी गिळतात. पर्यावरणाला बाधक ठरतात. शहरातील इमारतीची संख्या आणि मजल्यावर मजले पाहता. डोळे गरागरा फिरतात. शहराच्या ठिकाणी मोठा पाऊस झाला की, शहरे तुंबतात. नाल्या बुजतात आणि लोकांच्या घरात पाणी घुसतं. मुंबई, पुणे सारख्या बड्या शहरांना दरवर्षी पाण्याचा जबरदस्त फटका बसतो. पंधरा दिवसापुर्वी जो पाऊस मुंबईला झाला होता. त्यात मुंबई, पुणे हे दोन्ही शहरे तुंबले होते. कित्येक लोकांचे प्रचंड हाल झाले. शहरातील नगर पालिका पुरपरस्थितीला तितक्याच कारणीभूत आहे, हे प्रशासन मान्य करायलाच तयार होत नाही, म्हणजे हा वेळकाढूपणाच आहे. सत्ता मिळवण्यासाठी जितका जोर लावला जातो तितकाच जोर शहराचे व्यवस्थापन करण्यासाठी लावला जात नाही हे राजकीय पुढार्‍यांचे अपयश आहे. सत्ता फक्त हवी असते, त्यातून समाज कार्य तितके होत नाही त्यामुळेच शहरांना नैसर्गीक अपत्तीला तोंड देण्याची वेळ येते. 
तीन जिल्हयात हाहाकार
कोल्हापुर,सातारा, सांगली, या तीन जिल्हयात अति पाऊस झाल्याने येथील नद्यांना महापुर आला आणि या तिन्ही जिल्हयात हाहाकार माजला. जेव्हा पाऊस पडत होता, पाणी शहरात शिरले होते, तेव्हाच प्रशासन आणि शासनाला वाढत असलेल्या पाण्याचा अंदाज यायला हवा होता. मात्र याकडे दुर्लक्ष झाले. पाणी गळ्याभोवती आलं तेव्हा कुठं राज्य सरकार जागं झालं. या तिन्ही जिल्हयात पाणी घुसलं होतं, तेव्हा भाजपा-शिवसेनेच्या यात्रा सुरु होत्या. पाण्याच्या वेढ्याने पुरग्रस्त लोकांचे जीवन उध्दवस्त झाले. हजारो लोकांना सुरक्षीतस्थळी ठेवले गेले. बोटीतून सुरक्षीतस्थळी जातांना सांगली जिल्हयात १४ जणांचा दुर्देवाने मृत्यू झाला. या चौदा जणांना आधीच हालवले असते तर त्यांना जीवानिशी जावे लागले नसते. पुरग्रस्त भागातील जो-तो माणुस संकटात सापडला. हजारो जनावरे वाहुन गेली. कोट्यावधी रुपयाच्या संपत्तीची हाणी झाली. शेती उध्दवस्त झाली. पिके पाण्यात गेली. मोठे सकंट या तिन्ही जिल्हयावर पडले. या संकटातून सावरण्यास एका वर्षापेक्षा जास्तीचा कालावधी लागेल. कारण येथील लोकांचा सगळा संसार आणि जगण्याचं साधण पाण्याने गिळून घेतलं आहे. लोकांना पुर्वपदावर येण्यासाठी आर्थिक,मानसीक मदतीची गरज आहे. 
शासनाचा थिल्लरपणा
अपत्ती कुठलीही असो. तेथे प्रशासन तात्काळ गेले पाहिजे, अशी व्यवस्थाच आपल्याकडे नाही. नुसतं. म्हणायला अपत्ती विभाग असतं. त्यातच पुढार्‍यांचा थिल्लरपणा नेहमीच पाहवयास मिळतो. कोण काय बोलतं, कोण काय कृती करतं याचा काही हिशोबच नसतो. निदान दु:खद घटनेत राजकारण आणि हालगर्जीपणा होता कामा नये, पण पुढार्‍यांना शहाणपणा येणार कधी? मदतीच्या नावाखाली ज्या काही वस्तु पाठवण्यात आल्या. त्या वस्तुला मुख्यमंत्र्यांचा फोटा टाकून त्याला लेबलं लावण्यात आलं. लेबल लावण्यासाठी मदत करायची का? कुठं प्रचार करावा याचं भान राहिलं नाही. तेथील राष्ट्रवादीच्या एका नेत्याने ही खाद्य पदार्थावर आपल्या फोटोचं लेबल लावण्याचा फोटा सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. मदत देतांना या हातातून त्या हाताला कळू अशी द्यावी असा एक संकेत आहे, पण आज-कालच्या पुढार्‍यांचा उतावीळपणाच जास्त दिसून येतो. कुठं ही श्रेय घेण्याची घाई पडलेली असते. एखादी घटना घडली की, त्या घटनेचं गार्भीय ओळखून मंत्र्यांनी पाहणी करायला हवी पण, जणू काही पर्यटन स्थळीच आपण जात आहोत असं काहींचा पेहराव आणि देखावा असतो. मंत्री गिरीश महाजन पुरग्रस्तांच्या भेटीला गेले खरे पण त्यांचा हावभाव हा काही दु:खद घटनेच्या िंठकाणी गेलेल्याचा दिसला नाही. हासत-हासत त्यांनी फोटो दिला. जसं काही ते समुद्रावरुन सफर करुन आले. मंत्र्यांना घटनेचं गार्ंभीय नसेल तर काय म्हणावं या मानसिकतेला? 
धोके निर्माण करुन ठेवले 
शहराच्या ठिकाणी कुठे इमारती बांधाव्यात याचे काही नियम ठरवलेले असतात. नियम पायदळी तुडवून इमारतीचे बांधकाम केले जाते. बिल्डरांना पोसण्यासाठी म्हणा की, बिल्डरांच्या कामात भागीदारीसाठी राजकीय पुढारी बिल्डरांना अभय देतात. त्यामुळे नको त्या, ठिकाणी बांधकाम झालेले आहे, हे अनाधिकृत बांधकामे कधी ना कधी त्रासदायक ठरते. ज्या शहरातून नदी जाते. त्या नदीच्या काठी गगनचुंबी इमारती बांधल्या जातात, म्हणजे नदीवर अतिक्रमण केले जाते. नदीचा किनारा पुररेषेत येतो, पुर रेषेत बांधकाम करता येत नाही, तरीही अनेक नद्या बांधकामाने व्यापून टाकण्यात आल्या. काही मोठ-मोठे नाले बुजवून त्या िंठकाणी प्लॉटींग करुन बांधकाम करण्यात आले. नदीकाठी बांधकाम झाल्यास भविष्यात त्याचे परिणाम भोगावे लागतात. कमी पाऊस पडला तर पुराचे धोके निर्माण होत नाही. जर निसर्गाने मर्यादा ओलांडली की, माणसांची अवस्था अत्यंत बिकट होते. पुराच्या पाण्यामुळे घरे पाण्याखाली जातात. गेल्या दहा वर्षापासून राज्यात पावसाने तितकी सरासरी ओलांडली नाही. अपवाद २०१६ साली राज्यात अनेक ठिकाणी धुवांधार पाऊस पडला होता. कित्येक नद्यांना पाणी आल्याने हे पुराचे पाणी लोकांच्या घरात घुसले होते. जास्त नुकसान नदीच्या काठी बांधलेल्या घरांचे झाले होते. आज ही लोक नदीच्या काठी घरे बांधण्याचा आघोरीपणा सोडत नाही. निर्सग कोपला की, माणुस अगदी शुन्य असल्यासारखाच असतो. निसर्गाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला की, कधी ना कधी नुकसान ठरलेलंच आहे. 
राज्य धावून आलं 
जेव्हा-जेव्हा कुठलंही संकट आलं. तेव्हा-तेव्हा. राज्यातील आणि इतर ठिकाणचा माणुस मदतीला धावून आला. मग किल्लारीचा भुकंप असेल, गुजरातचा भुकंप असो किंवा अन्य कुठलीही दुर्देवी घटना, घटनेचं गांभीर्य ओळखून राज्यातील माणुस मदतीला धावून गेलेला आहे. तीन जिल्हयासाठी मदतीसाठी कित्येकांचे हात पुढे आले. ज्याला जी मदत करता येईल ती मदत केली जात आहे. कापडे, धान्य, खाद्य, पाणी, पैसे इत्यादी मदत केली जात आहे. ग्रामीण भागातील आणि शाळकरी मुलं ही मदतीसाठी पुढे येत आहे. बड्या शहरातील अनेक लोक पुरग्रस्तांच्या मदतीला पुढे आले आहेत. आमदार, खासदार, शासकीय कर्मचार्‍यांनी एक दिवसाचा आपला पगार पुरग्रस्तांना दिला. राज्यातील अनेक स्वयंसेवक त्या ठिकाणी डेरेदाखल झाले असून आपल्याकडून काही मदत करता येईल का यासाठी तेथेच ठाण मांडून आहेत. जवान,विविध पक्षाचे, संघटनेचे कार्यकर्ते सांगली, कोल्हापुरात मुक्कामी आहेत. दानशुरांनी गाड्यांनी जिल्हा प्रशासनाकडे मदत पाठवली आणि पाठवत आहे हे नक्कीच चांगली बाब आहे. प्रशासनाच्या भरोशावर न राहता. सर्वसामान्यांनी दिलेली मदत ही पुरग्रस्तांचे पुन्हा पुर्नवसन करणारी आणि आधार देणारी मदत ठरत आहे. 
जाती-पाती विरगळल्या 
संकट जेव्हा येतं ते कधी विचारुन येत नाही, किंवा ठरावीक लोकांवर येत नाही. येणारं संकट हे सगळ्यांना कवेत घेत असतं. ते फक्त संकटच असतं. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यातील सर्वचं माणसं पुढे आली. तिथं-जातीचा विषयच नव्हता. मदत करण्यासाठी फक्त हात पुढे येत होते. बीड जिल्हयातील अनेक दानशुर, पत्रकार, स्वयंसेवक, विविध पक्षाचे कार्यकर्त्यांनी मदतीसाठी मेहनत घेतली. काहींनी थेट स्वत: घटनास्थळी जावून मदत पोहच केली. अगदी लहान मुलांनी आपला वाढदिवस टाळून ती मदत पुरग्रस्तांना दिली हा नक्कीच विसरण्या सारखा क्षण नाही. एखादा माणुस संकटात आहे त्याला मदत करणं आणि दिलासा देणं म्हणजे जिवंत माणसाचं लक्षण आहे. हा जिवंतपणा मदतीच्या रुपाने दिसून आला. आयुष्यात माणसाने किती संपत्ती कमवली त्याला महत्व नाही. त्याने समाजासाठी काय केलं याला महत्व आहे. मदत करणारे हात नेहमीच आठवणीत राहणारे असतात. हेच हात माणुसकीचे बेट तयार करुन चांगला समाज घडवत असतात. जेव्हा मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी कोल्हापुर, सातारा, सांगली या तिन्ही जिल्हयात माणुसकी जानणारांची गर्दी झाली तेव्हा नक्कीच पुरग्रस्तांचे डोळे पाणवले असतील, त्यांच्यामध्ये आत्मबल निर्माण झालं असेल. आम्ही नक्कीच एकटे नाहीत असं त्यांना वाटलं असेल. संकटकाळी माणुसकीच्या मशाली पेटतात हे काही कमी नाही. ऐरवी भले ही काही होवो, संकटात मदतीला धावून येतो तो देवदुतच असतो.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review