ताज्या बातम्या

जिल्ह्यातील ३ हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी

बीड (रिपोर्टर):- बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वंचित असलेल्या जवळपास ७० हजार कर्जधारकांपैकी काल रात्री ३ हजार शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची यादी जिल्हा बँकेला प्राप्त झाली आहे. या तीन हजार शेतकर्‍यांसोबत विविध राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्जधारक शेतकर्‍णयांनाही कर्जमाफी मिळालेली आहे. आजपर्यंत शेतकर्‍यांच्या कर्जमाफीपोटी जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राष्ट्रीयकृत बँकेच्या शेतकरी कर्जमाफीसाठी ८३० कोटी रुपये बँकांना प्राप्त झाले आहेत. 
  राज्य सरकारच्या महाऑनलाईन पोर्टलने कर्जमाफीची दुसरी यादी काल रात्री उशीरा अपलोड करून ती संबंधित बँकेला पाठविली आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पीक कर्ज आणि मोटार पाईपलाईनसाठी मध्यम मुदतीच्या घेतलेल्या कर्जधारक शेतकर्‍यांची संख्या मोठी आहे. जिल्हा सहकारी खाते आणि जिल्हा मध्यवर्ती बँका यांच्या संयुक्त विद्यमाने या अपात्र शेतकर्‍यांच्या कर्जमाफीतील त्रुटी दूर करण्याचे काम चालू आहे. यासाठी तालुकास्तरावरही राज्य सरकारच्या सहकार विभागाने पाच सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. ज्या शेतकर्‍यांची आजपर्यंत कर्जमाफी झालेली नाही अशा शेतकर्‍यांनी महाऑनलाईनद्वारे भरलेला कर्जमाफीचा अर्ज, सातबारा, आठ-अ चा उतारा, आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक यासह परत नव्याने या तालुकास्तरीय समितीकडे आपला अर्ज दाखल करावयाचा आहे. असे असतानाच काल सायंकाळी उशीरा बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तीन हजार शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ झालेला आहे. त्याची ग्रीन लिस्ट रात्री उशिरा जिल्हा मध्यवर्ती बँकेला प्राप्त झालेला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेसह विविध राष्ट्रीयकृत बँकांनाही ही यादी दिलेली आहे. या बँकांसह राष्ट्रीयकृत बँकांकडून ग्रीन लिस्टमध्ये आलेल्या शेतकर्‍यांचे नाव तपासून त्याच्या खात्यावर ही रक्कम वळती करावयाची आहे. यासाठी किमान चार दिवस लागतील, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्जमाफी समन्वयक सुशील राठोड आणि जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण या दोघांनी संयुक्तरित्या रिपोर्टरशी  बोलताना दिली. आजपर्यंत जिल्हा बँकेला शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी ८३० कोटी रुपये विविध बँकांना प्राप्त झाले आहेत. ज्या शेतकर्‍यांची आजपर्यंत कर्जमाफी झालेली नाही अशा शेतकर्‍यांना चालू खरीप हंगामात पीक कर्ज न मिळवल्याने मोठी गोची झाली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दीड लाखापर्यंतचे सरसकट कर्ज सरकार माफ करेल या सरकारच्या घोषणेकडे शेतकरी आस लावून बसलेले आहेत. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review