ताज्या बातम्या

कोणाच्या नावाला मोहर लागेल?

कोणाच्या नावाला मोहर लागेल?

मजीद शेख | बीड

----

केज विधानसभा मतदार संघ राखीव असल्याने या मतदार संघात स्व. विमलताई मुंदडा यांचे अनेक वर्ष वर्चस्व राहिलेले आहे. आघाडीच्या सरकारमध्ये मुंदडा कॅबीनेट मंत्री होत्या. त्यांच्या निधनामुळे या मतदार संघात राष्ट्रवादीचे वर्चस्व कमी झाले. गेल्या निवडणुकीत या मतदार संघातून भाजपाच्या उमेदवार संगीता ठोंबरे निवडून आल्या. येत्या निवडणुकीत भाजपाकडून तिकीट मिळवण्यासाठी अनेकांत रस्सीखेच सुरु आहे. विद्यमान आमदार ठोंबरे पुन्हा निवडणुक लढवण्यासाठी आग्रही आहेत. त्यातच अंजली घाडगे या ही भाजपाकडून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. बीड जिल्हयात घटक पक्षाला जागा सोडावी आणि ती केज मतदार संघातून अशी मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली. रिपाईचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे केज मधून निवडणुक लढवण्यास इच्छूक आहेत. ठोंबरे, घाडगे, कागदे हे तिघे जण उमेदवारीसाठी स्पर्धेेत आहेत. शेवटी कोणाला उमेदवारी द्यायची हे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर अवलंबून आहे. केजचा मतदार संघ राखीव असल्याने या मतदार संघातून इतरांना निवडणुक लढवता येत नाही. या मतदार संघात स्व. विमलताई मुंडदा यांनी आपले वर्चस्व निर्माण केले होते. भाजपासह राष्ट्रवादीच्या तिकीटावर मुंदडा पाच वेळा निवडून आल्या होत्या. आघाडीचे सरकार असतांना मुंदडा कँबीनेट मंत्री होत्या. मात्र मुंदडा यांचे दुर्देवी निधन झाल्याने हा मतदार संघ राष्ट्रवादीला आपल्या ताब्यात ठेवण्यात यश आले नाअही. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मोदी लाट होती. या लाटेत राज्यात भाजपाचे १२२ उमेदवार निवडून आले होते. राज्यात जसे यश मिळाले तसे जिल्हयात ही भाजपाला चांगले यश मिळाले. सहा पैकी पाच जागा भाजपाच्या निवडून आल्या होत्या. त्यात केज मतदार संघही होता. आता या वेळीही विद्यमान आमदार संगीता ठोंबरे ह्या मतदार संघात निवडणुकीच्या कामाला लागल्या आहेत. त्यांनी आपले दौरे सुरु करुन विकास कामांचा धडका सुरु केला. लोकसभा निवडणुकीत ठोंबरे यांच्या मतदार संघात भाजपाच्या उमेदवाराला चांगली लीड मिळाली. विशेष करुन राष्ट्रवादीचा उमेदवार केज मतदार संघाचा होता तरी मतदारांनी राष्ट्रवादीला साथ दिली नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान, काही ठिकाणी ठोंबरे यांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे ठोंबरे यांच्या बाबत भाजपाच्या नेत्यात नापसंदी व्यक्त केली जात होती. मात्र केजने लोकसभेत चांगले यश मिळवून दिल्याने आ. संगीता ठोंबरे यांचे पारडे जड झाले. येत्या विधानसभा निवडणुकीत आ. ठोंबरे पुन्हा तिकीटाचा दावा करणार यात काही शंका नाही. तिकीट आपल्यालाच असं म्हणत ठोबरे यांनी मतदार संघात संपर्क वाढवला आहे. दुसरीकडे अंजली घाडगे या ही निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. त्यांनाही भाजपाकडून तिकीट हवं आहे. तिकीट मिळवण्याचा त्या प्रयत्न करत असुन. त्यांनी तर गेल्या एक वर्षापासून केज मतदार संघामध्ये आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे. तिसरे प्रबळ इच्छूक आहेत, रिपाईचे युवा प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे, रिपाईला राज्यात काही जागा द्या अशी मागणी पक्षांनी भाजपाकडे केली. त्यातच बीड जिल्हयात जागा द्यावी व ती केजची द्या अशी मागणी रिपाईने केलेली आहे. पप्पू कागदे गेल्या अनेक वर्षापासुन रिपाईचे काम करत आहेत. रिपाईचे भाजपाला प्रत्येक निवडणुकीत सहकार्य मिळालेले आहे. लोकसभा निवडणुकीत रिपाई भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. बीडमध्ये भाजपाला रिपाईमुळे फायदाच झालेला आहे. त्यामुळे रिपाईला केजची जागा द्यावी अशी अग्रहाची मागणी रिपाईने केलेली आहे. रिपाईला नेमक्या किती जागा मिळतात व कुठल्या हे येत्या काही दिवसात समोर येईल. केज मतदार संघ रिपाईला सुटेल का याकडे जिल्हयातील रिपाई कार्यकर्त्याचे लक्ष लागून आहे. माजलगाव प्रमाणेच केज मतदार संघातून भाजपाकडून इच्छुकांची गर्दी जास्त आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आ. ठोंबरे, पप्पू कागदे आणि घाडगे हे तीन प्रबळ दावेदार समजले जातात. पश्रश्रेष्ठी या तिघापैकी कोणाच्या नावाला मोहर लावेल याकडे लक्ष लागून आहे.

राष्ट्रवादीतील गटबाजी

केज मतदार संघ हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र या किल्याला तडे गेले. गटबाजीमुळे पक्षाचे नुकसान झाले. स्व. मुंदडा यांच्या नंतर या मतदार संघातून नमिता मुंदडा यांना गत वेळी उमेदवारी देण्यात आली होती, पण नमिता यांचा पराभव झाला. आ. पृथ्वीराज साठे आणि मुंदडा यांच्यामध्ये सख्ये नसल्याचे दिसून येत आहे. माजी. आ.पृथ्वीराज साठे मध्यंतरी वंचीतच्या मुलाखतीला गेले होते. त्यामुळे येणार्‍या काळात राष्ट्रवादीतील चित्र काय असेल हे आज तरी सांगता येत नाही. मुंदडा मात्र निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.

अधिक माहिती: beed reporter

Best Reader's Review