ताज्या बातम्या

चल मुषकराज...! ‘नरक यातना’ भोगणारे ‘निवडणुकीत मॅनेज’ कसे होतात?

चल मुषकराज...!
---
‘नरक यातना’ भोगणारे ‘निवडणुकीत मॅनेज’ कसे होतात?

विकासाचं ‘गाजर’ दाखवून ‘भूषण’ नगरीतील जनतेला नरक यातना भोगायला लावणार्‍या ‘विकास’ पुरुष आणि ‘भूषणावह’ कामगिरी केली म्हणून मिरवणार्‍यांना येथील जनता मॅनेज होतेच कशी? असा प्रश्‍न मुषकाला पडतो. कारण गेल्या काही दिवसांपासून ‘भूषण’ नगरीत आलेल्या मुषकाला येथील राजाने केलेल्या ‘भुषणावह’ कामगिरीचे अनेक किस्से समजले होते. शिवाय प्रकरण वरिष्ठांपर्यंत गेल्याने ‘न.प.च.’ स्पेशल ऑडीट फिडीट काय ते होणार असल्याची कुणकूनही मूषकाच्या कानी पडली होती. कारण गेल्या तीस वर्षापासून येथे ‘भूषणावह’ कामगिरी करत शासनाच्या प्रत्येक योजना इथं फक्त कागदावरच राबविल्या जातात. जर याच योजना प्रत्यक्षात राबवल्या असत्या तर आता ‘भूषण’ नगरीतील जनतेला ‘नरक’ यातना भोगाव्या लागल्या नसत्या.

        त्यावर बाप्पा बोलू लागले, हे बघ मुषका इथं मॅनेजचं राजकारण चालतं, येथील विरोधक साडेचार वर्षे झोपा काढतात. नागरिकांच्या प्रश्‍नांवर ते या काळात केव्हाच आक्रमक होत नाहीत. मात्र निवडणूक येताच विरोधकांना खाडकन् जाग येते अन् त्यांना प्रजेचे हाल हवाल दिसतात. त्यात पुन्हा आमूक-तमूक जातीच्या संघटना उड्या घेतात अन् सुरु होते मॅनेजचे राजकारण या सर्व संघटना अन् विरोध करणारे विरोधकही ‘त्या’ बंगल्यापुढे घोंगाटा घालतात. यांना काय दिल्याने मॅनेज होतात हे या ‘विकास पुरुषाला’ चांगलेच माहित असल्याने त्यांचे तोंड वेळेवर बंद केले जाते. जर कोणी जातीवंत विरोधक भेटलाच तर त्याला प्रेमाणे घ्यायचे आणि नंतर सरळ सरळ ‘नवगण राजूरीच्या’ गणरायाचे दर्शन द्यायचे. एकदा दर्शन घडले तर पुन्हा त्याच्या सात पिढ्या विरोधात भूमिका घेत नाहीत. मात्र आता ‘बंगला दुभंगला’ अन् विरोधकांची संख्या वाढल्याने ‘विकास पुरुषांची’ डोकेदुखी वाढली. पुढचा धोका लक्षात घेवून त्यांनी लगेच ‘बंध’ हातात बांधून ‘मातोश्री’ जवळ केली. त्यावर मूषक म्हणाले बाप्पा हे ठीक आहे. पण नरक यातना भोगणारी प्रजा निवडणूकीत हे सगळ कसं विसरते? त्यावर गणराय उत्तरले, ‘हे बघ मुषका येथील सत्ताधारी आपल्याला सर्वच जनतेने चांगलं म्हणावं अस काही मानत नाहीत. आपल्याला जेवढ्या मताची गरज आहे तेवढ्यांनाच आपण (निवडणुकीच्या काळात) चपटी बोटी सह जे लागेल ते पुरवायचं बाकी जे मते आपल्याला मिळणार नाहीत ते मते आपल्या प्रतिस्पर्धी असलेल्या विरोधकांनाही मिळू नयेत म्हणून प्रत्येक जातीतील एक-दोन चमकोगिरी करणार्‍यांना धनलक्ष्मी प्राप्त करुन द्यायची. लगेच तो उमेदवार आमच्या जातीवर या सरकारसह विरोधकांनी अन्याय केला म्हणून आम्ही निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा करतात. अशा उमेदवाराने चार-दोन हजार मते घेतली तरी हे विकास ‘पुरुष’ सहज निवडून येतात. कारण इथं निवडणूकीच्या काळात जातीला महत्व दिलं जातं त्यावेळेस जनता ‘विकासाला’ विसरुन फक्त जातीला महत्व देते अन् याचाच फायदा येथील घराणेशाहीचे राजकारण करणार्‍यांना होतो. यावर उपाय काय? असा प्रश्‍न पुन्हा मुषकाने बाप्पाला केला. त्यावर गणराय म्हणाले, ‘जोपर्यंत जातीयव्यवस्था नष्ट होवून मतदारराजा कोणाच्या चपटी बोटीला बळी पडणार नाही, तोपर्यंत हे असचं चालायचं..! 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review