ताज्या बातम्या

कॉंग्रेसमध्ये नेतृत्वाचा दुष्काळ

कॉंग्रेसमध्ये नेतृत्वाचा दुष्काळ
---
मजीद शेख

कॉंग्रेस पक्षाचे चोहीबाजुने बुरे होत आहेत. नवा कार्यकर्ता कॉग्रंेस पक्षाकडे फिरकतांना दिसत नाही, आहे तेच इकडून तिकडे जाण्याच्या प्रयत्नात आहेत. जे गेले ते भाजपा व शिवसेनेत स्थिर झाले आणि ज्यांना आपण पुन्हा निवडून येत नाही अशी भीती वाटू लागली ते वेगळ्या वाटा शोधण्याच्या विचारात आहेत. निवडणुका कधी ही घोषीत होऊ शकतात. निवडणुकीत आपला पुन्हा विजय व्हावा अशी विद्यमान आमदारांची अपेक्षा आहे तर शेकडो कार्यकर्ते नवीन आमदारकीचे स्वप्न उराशी बाळगून आहेत. या पक्षातून तिकीट मिळाले नाही की, त्या पक्षातून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. पुर्वी कॉंग्रेसकडे जास्त इच्छूकांचा लोंढा असायचा तसा लोंढा यावेळी दिसून येत नाही, काही ठिकाणी उमेदवार मिळतात की नाही अशी वाईट अवस्था कॉंग्रेसची झाली. वर्षानुवर्ष सत्ता भोगलेल्या पक्षाला अशी वाळवी लागावी म्हणजे पक्ष रसातळाला गेल्या सारखाच झाला, जे पक्षाला सोडून गेले त्याचं म्हणणं असतं की, आपल्यावर अन्याय झाला, अन्याय झाला तर राधाकृष्ण विखे सारखे माणसं मोठया उंचीवर गेले नसते? जे अन्याय झाला असं म्हणतात ते नंतर कुठल्याच पक्षात यशस्वीपणे टिकत नसतात? कॉंग्रेसने पडत्या माणसांना मोठं केलं. ज्यांनी निष्ठा वाहिली त्यांना शेवटपर्यत पदावर बसवले. कॉंग्रेसने एकच चुक केली ती, म्हणजे नको त्या माणसांना जास्त दिवस पोसले, त्यामुळे नवीन नेतृत्व उदयाला आले नाही. आज महाराष्ट्रातील कॉंग्रेसमध्ये नेतृत्वाचा दुष्काळ आहे.
प्रमुख नेत्यांना पुन्हा धास्ती
         लोकसभेत राज्यातील कॉंग्रेस पक्षाची प्रचंड दाणादाण उडाली. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे सारखी दिग्गज मंडळी लोकसभा निवडणुकीत पराभूत झाली. आपल्या मतदार संघातच ह्यांचे वर्चस्व नाही, हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. वंचीतमुळे आम्हाला फटका बसला असल्याचे ह्या नेत्यांच्या वतीने सांगितले जात असले तरी आपला मतदारसंघ सांभाळता न येणारे राज्य काय सांभाळतील?. राजकारणात मतदार सांभाळणे हे सर्वात महत्वाचं काम आहे. आपल्या पाठीमागचा जनाधार बाजूला का जात आहे याचा विचार कॉंग्रेस पक्षाचे नेते करत नाहीत? ज्यांचा आपण आता पर्यंत फक्त मतदानापुरताच वापर केला तो सगळा वंचीत घटक कॉंग्रेस पक्षापासून दुर जात आहे हे राज्यातील नेत्यांच्या खुप उशिरा लक्षात आले. जेव्हा आपला मतदार आपली साथ सोडू लागला तेव्हा काही नेत्यांनी उंदरा सारख्या इकडुन तिकडे उड्या मारण्यास सुरुवात केली. सत्तेसाठी इकडून तिकडे उड्या मारणारे कधीच निष्ठेने कोणत्याच पक्षात कायम राहू शकत नाही. सत्तेसाठी लाचारी पत्कारुन पक्षांतर करणारे कधीच इतिहास घडवत नसतात. ज्यांनी पक्षासाठी योगदान दिले तेच इतिहासाच्या पानात असतात, जे सत्ता मिळवण्यासाठी पळपुटेपणा करतात, ते कधीच चांगला समाज घडवू शकत नाही किंवा ते कधी चांगले राजकारणी होऊ शकत नाही. येत्या विधानसभेत पुन्हा राज्यातील कॉंग्रेसमधील दिग्गज मंडळी निवडणुकीच्या रिंगणात उरतणार, त्यांना आपण निवडून येणार की नाही याची धास्ती पडली. पराभवातून बरचं काही शिकता येतं. नेहमीच सत्तेवर असावं असं प्रस्थापीत मंडळींना वाटत असतं. कधी-कधी सत्तेविना राहायला हवं, म्हणजे राजकारणाची सगळीच हवा चाखता येते, पण पराभव कोणालाच नको असतो.
थोरात यांच्या पुढे आव्हान
        लोकसभा निवडणुकी नंतर राज्यात कॉंग्रेस पक्षाने संघटनेत बरेच बदल केले पण त्यात नवीन असं काही दिसून आलं नाही. पुन्हा-पुन्हा त्याच व्यक्ती समोर आणल्या जात आहेत. ज्यांनी आत्ता पर्यंत फक्त सत्तेचा लाभ घेतला. त्यांच्याच गळ्यात महत्वाची पदे टाकण्यात आली. जुन्या नेत्यांना थोडं बाजुला ठेवून नव्या तरुणांना कॉंग्रेस संधी का देत नाही हेच कळत नाही? अशोक चव्हाण यांच्या जागेवर बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती केली. बाळासाहेब थोरात हे पुर्वीच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. थोरात हे राज्याच्या कॉंग्रेसचा चेहरा होऊ शकत नाही. राजकारण करायचं म्हटलं तर त्याला माणुस चौफेर असावा लागतो. गर्दी खेचणारा असावा लागतो आणि विरोधकांवर तुटून पडणारा असावा? थोरात वक्ते नाहीत, वक्ता निदान आवाज मोठा करुन वातावरण निर्माण तरी करु शकतो. येत्या निवडणुका थोरात यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार आहेत. विखे गेले म्हणुन त्यांच्याच जिल्हयातील असलेल्या थोरात यांना पक्षांनी संधी दिली असली तरी थोरात हे आपल्याच जिल्हयात यशस्वी होेतील का? लोकसभा निवडणुकीत त्यांच्या जिल्हयात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे पानीपत झाले. आता विधानसभेत काय होतयं याकडे लक्ष लागून आहे.
विरोधी पक्ष नेते विदर्भ सांभाळतील का?
पुर्वीचा विरोधी पक्ष नेता हा नगर जिल्हयातील होता, आता विरोधीपक्ष नेता म्हणुन विदर्भातील विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली. विदर्भात कॉंग्रेस पक्षाची अवस्था काही चांगली नाही. लोकसभा निवडणुकीत विदर्भात ही दाणादाण उडालेली आहे. विधानसभेत विरोधी पक्ष नेत्यांनी आपला विदर्भ सांभाळला तर पद मिळाल्याचं सार्थक होऊ शकतं. कॉंग्रेस पक्षात फक्त पदासाठी रस्सीखेच असते पण पद मिळाल्यानंतर पदासारखं काम केलं जात नाही. त्यामुळेच पक्षाची वाताहत झाली. विरोधी पक्षनेता पद मिळाल्यापासून वडेट्टीवार यांची कामगिरी दिसून आली नाही. जो विरोधीपदाचा बाणा विरोधकात असायला हवा तो त्यांच्यात अजुन तरी दिसून आला नाही. एखादं चांगलं पद मिळालं तर त्या पदाला साजेल असं काम नेत्यांनी केलं पाहिजे, पण पद येताच आळस आल्यासारखं काम केले जात असल्याने कॉंग्रेस पक्षाला घरघर लागलेली आहे. राष्ट्रवादीने राज्यात वातावरण निर्माण केले, तसं वातावरण कॉंग्रेस कडून अद्याप कुठं दिसेना? कॉंग्रेस पक्ष लोकसभेच्या पराभवातून अद्याप सावरलेला नाही. प्रत्येक बडया नेत्यांनी किमान आपला जिल्हा सांभाळला तरी खुप झालं? नसता येत्या निवडणुकीत विरोधी पक्ष नेते पद ही मिळतं की नाही अशीच परस्थिती आजची आहे.
गांधी यांच्यावरच कॉंग्रेस अवलंबून
       काम करणारांनाच लोक स्विकारतात हे मान्य केलं पाहिजे. भावनेवर आणि जाती-पातीवर जास्त दिवस राजकारण करता येत नाही. आज भाजपाची सत्ता असली तरी ती कायमच राहील असं काही नसतं. पंधरा वर्ष राज्यात कॉंग्रेस पक्षाची सत्ता होती. पंधरा वर्ष कॉंग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री होता. पंधरा वर्षानंतर सत्तेत बदल झाला आणि शिवसेना-भाजपाची सत्ता आली. आता येत्या निवडणुकीत पुन्हा सत्तेसाठी रणसंग्राम सुरु झाला. राज्यातील कार्यकर्त्यांची गळती पाहता. कॉंग्रेसची दहा वर्ष तरी सत्ता येत नाही अशी राजकारणात चर्चा सुरु आहे. सत्ता येणार नाही म्हणुन धिम्या गतीने काम करणं हे काही चांगल्या राजनितीचं लक्षण नाही. राज्यातील कॉंग्रेसला पुन्हा गांधी कुटूबावरच अवलंबून राहवं लागत आहे. सोनिया गांधी, राहूल गांधी, प्रियंका गांधी येवून प्रचाराची धुरा सांभाळतील आणि काही तरी परिवर्तन होईल अशी अपेक्षा राज्यातील नेत्यांना आहे, पण गांधींच्या प्रचाराने राज्यातील कॉंग्रेस कोमातून बाहेर येईल असं काही वाटत नाही? पंधरा वर्षात कॉंग्रेस पक्ष वाढवण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी भरीव कार्य केले नाही म्हणुन आज ही कॉंग्रेस पक्षाची अवस्था झाली आहे. वंचीत सोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला पण वंचीतने कॉग्रंेसला भावच दिला नाही. उलट कॉग्रेसला फक्त ४० जागा सोडण्याची घोषणा वंचीतने करुन कॉंग्रेस आता संपलेली आहे असं म्हणुन कॉंग्रेस सोबतच्या आघाडीचा विषय संपुष्टात आणला. येत्या निवडणुकीत विरोधी बाकावर कॉंग्रेस-राष्ट्रवादी नसणार, वंचीत बहूजन आघाडी राहिल अशी पुडी मुख्यमंत्र्यांनी सोडल्याने कॉंग्रेस पक्षाचे अधिकच अवसान गळाले. अवसान गळालेल्या कॉंग्रेसला ४० जागा तरी वाचवता येतात की नाही असाच प्रश्‍न निर्माण झाला.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review