ताज्या बातम्या

एक पंडित चोर तर दुसरा दरोडेखोर-आ.लक्ष्मण पवार

माझ्या कामावर समाधानी नसाल तर मला मतदान करू नका, पण दोन पंडितांनाही मतदान देवू नका!

एक पंडित चोर तर दुसरा दरोडेखोर-आ.लक्ष्मण पवार

पंडित मुक्तीचा नारा देणारे लक्ष्मण पवार यांना पक्षश्रेष्ठी एका पंडिताशी सलगी करण्याबाबत सक्ती करत होते, हे खरं आहे का? 
राजकारणामध्ये काही प्रसंग असे येतात की त्याठिकाणी राजकीय दृष्टीकोन समोर ठेवून निर्णय घ्यावे लागतात. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आमच्या पक्षाने शिवसेनेशी युती केली. गेवराई पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी आम्हाला जागा कमी पडल्या म्हणून नेतृत्व सेनेसोबत जाण्याचा सल्ला देत होतं पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं की या मतदारसंघातील लोकांनी मला केवळ अमरसिंह पंडित व बदामराव पंडित हे नकोयत म्हणून निवडून दिलं. लोकांची आजही तीच मागणी आहे. त्यांच्यासारखं वागू नका, आज काही पंडित परिवार बदललेला नाही. आधी वाईट होता अन् आता चांगले झाले, असेही नाही. त्यामुळे माझी भूमिका अशी होती की, राजकारण सोडेल पण पंडितांच्या बाजुला जावून बसणार नाही. याआधी तुम्हाला दिलेल्या मुलाखतीत मी हेच म्हटले होते आणि आजही तेच म्हणतोय. पक्षश्रेष्ठीत पंचायत समितीमध्ये त्यांच्या सोबत जावून बसा, हे सांगत होते हे खरं आहे. परंतु मी त्यांच्या सोबत जावून बसू शकत नाही. ही भूमिका मी पक्षश्रेष्ठीला समजावून सांगितली आणि ती त्यांनी मान्य केली. 
       दोन्ही पंडितांनी काहीच काम केले नाही म्हणून लोकांनी मला निवडूण दिले असे तुम्ही म्हणता, मग तुम्ही पाच वर्षामध्ये मतदार संघात काय काम केले?
मतदार संघातले रस्ते अत्यंत खराब झालेले होते. रस्त्यावर गरोदर महिला बाळांत व्हायच्या, गंभीर आजारातला माणूस रूग्णालयापर्यंत खराब रस्त्यामुळे पोहचू शकत नव्हता. तेंव्हा लोकांनी आधी रस्ते करण्याची मागणी लावून धरली असता मी पंकजाताई आणि मुख्यमंत्र्यांना गेवराई मतदार संघातल्या रस्त्यांबाबत वस्तूस्थिती सांगून रस्त्यासाठी जास्तीत जास्त निधी देण्याबाबत आग्रह धरला आणि तेथूनच मतदार संघातील रस्ते चांगले करण्याचा प्रयत्न सुरू केला. यात मला यशही आले. गेल्या चाळीस वर्षात ज्या गावांना रस्ते नव्हते त्या गावांना आज रस्ते झाले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसह अन्य योजनातून रस्त्यावर मोठा निधी खर्च केला आहे. आता प्रत्येक वाडी, वस्ती, तांड्यावरचा नागरिक चांगल्या रस्त्याची मागणी करत आहे. भलेही त्यासाठी उशिर झाला तरी हरकत नाही. परंतू दोन-चार मुरूमाचे टोपले टाकण्यापेक्षा अण्णा आता डांबरी रस्ताच करा असे म्हणत आहेत. हा प्रश्‍न आता बर्‍यापैकी मार्गी लागला असून लोकांचा विश्‍वासही माझ्यावर तेवढाच आहे. आता गावागावातील पाणी पुरवठ्याचा प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयास चालू असून सिंचनाचा प्रश्‍नही हाती घेतला आहे. 

रेशन आणि रस्ते कामावर आरडाओरडीशिवाय आपण कुठलचं काम केलं नाही असं विरोधक म्हणतात?
बरं झालं, विरोधक ते तरी मान्य करतात. मी आमदार झाल्यानंतर मतदार संघात रस्त्याचे कामे झाले आणि रेशनचा माल गोरगरिबांपर्यंत जावू लागला. माझ्या कामाची पद्धत लोकांची जशी मागणी येते ते काम मी प्राधान्याने करत राहिलो. कृषी विभाग असो अथवा तहसील याठिकाणी लोकांची कामे होत नव्हती. ते सोडवण्यासाठी मी जातीने लक्ष दिले. पीक विम्यासह अन्य प्रश्‍न लोकांचे सोडवले, तसं पाहिलं तर गेवराई मतदार संघाच्या विकासाचा बॅकलॉग पाहता सगळी कामे लगेच होणार नाहीत. आता हेच बघा विद्युत मंडळाचा विषय गेल्या पंधरा-वीस वर्षापासून अनेक वर्षापासून नुसते पोल उभे केले आहेत. काही ठिकाणी तारा आहेत, पोल रोवण्याचे काम निकृष्ट झाल्याने ते खाली कोसळतात. तालुक्यात वीज कंपनीची थकबाकी मोठ्या प्रमाणावर आहे. हे सर्व एकदम होणार नाही. या सुत्रता आणावी लागणार आहे. ती सुत्रता आता येत आहे. मागची घाण आधी धुण काढायची आहे, यासाठी गेलेेले पाच वर्ष आणि पुढचे पाच वर्षे लागतील. खर तर विरोधकांनी मी कुठलं काम केलं नाही हे आधी सांगावं. अमरसिंह पंडित आणि बदामराव पंडितांनी सत्तेत असतांना काय केलं ते ही लोकांना सांगावं. 

मुख्यमंत्र्यांनी गेवराईच्या अतिक्रमण धारकांना पीटीआर देण्याचा शब्द दिला होता त्याचे काय झाले?
सुप्रिम कोर्टाने २०११ साली एक निर्णय दिला. गायरान जमिन ही कोणाच्या नावे करू नये. विषय पीटीआरचा आहे, मुख्यमंत्री जेंव्हा २०१६ साली गेवराईत आले होते तेंव्हा ते म्हणाले होते. हा प्रश्‍न आपणच सोडवू, त्यानुसार कामही सुरू झाले असून अतिक्रमण करत्यासाठी  तब्बल २२०० घरकूल बांधुन देण्यात येणार आहेत. आम्ही नुसतं पीटीआरवर नाव लावणार नाहीत तर गेवराईतील अचानक नगर, संजय नगर, इस्लामपुरा, भीमनगर, साठेनगर भागात घरकूल बांधुन त्यांना पीटीआर देवू. या सर्वांची प्रोसेस सध्या सुर आहे. 

गोदा काठच्या गावातील पुनवर्सनाचे काय झाले, पाच वर्षात हा प्रश्‍न सुटला नाही?

बरोबर आहे, मी दोन-तीन गावामध्ये गेलो, तेथील लोकांना पुनर्वसनाबाबत बोललोही पण गावकरी गाव सोडायला तयार नाहीत. राजापूर, काठवडा येथील गावकर्‍यांशी मी पुनर्वसनाबाबत बोललो त्यांनी गाव सोडण्यास स्पष्ट नकार दिला. जोपर्यंत गावकरी निर्णय घेत नाहीत तोपर्यंत तो प्रश्‍न सुटणार नाही. परंतू मी पुर्नवसनासाठी प्रयत्न करत आहे. लोक जेंव्हा म्हणतील तेंव्हा गोदाकाठच्या गावाचं पुर्नवसन होईल. 

कोल्हापूर-सांगलीसारखी परिस्थिती निर्माण झाली तर?
नाही, आपल्याकडे ही परिस्थिती निर्माण होणार नाही. गोदावरी पात्रामध्ये दोन लाख क्युसेसने पाणी सोडले तरी ते डेंजर झोनपर्यंत पाणी येते. पाणी सोडतांना आपल्याकडे दोन दिवस असतात. त्यावेळी लोकांना आपण सुरक्षित स्थळी हलवतो. प्रश्‍न आहे तो गावांचा संपर्क तुटण्याचा. पर लोक पुर्नवसनासाठी तयार असतील तर काम करता येईल. नाही तर उगच शासनाचे कोट्यवधी रूपये पाण्यात जातील.

राज्यात  शिवसेना-भाजपाची युती झाली अन् गेवराईची जागा शिवसेनेला सुटली तर तुम्ही निवडणूक लढवणार?
युती होणार यात प्रश्‍नच नाही, शिवसेनेने गेवराईच्य जागेबाबत प्रयत्नही केले. परंतू सर्व्हे करून तुम्हीच भाजपापेक्षा जड आहात हे दाखवा म्हटल्यानंतर तसा सर्व्हे अथवा अपेक्षित आकडा स्थानिकांना पक्षाकडे देता आला नाही. तरीही पक्षाला वाटलं या ठिकाणी भाजपापेक्षा सेनेचा उमेदवार जड आहे. आणि त्यांनी शिवसेनेला जागा सोडली तर मी आधीच मुख्यमंंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि पंकजाताईंच्या कानावर गोष्ट घातली आहे. लोकांनी मला पंडितांविरोधात उभं केलं आहे. अशा स्थितीत पंडितच दोन्हीकडून निवडणूक लढवीत असतील अन् मतदार संघाचं वाटोळं होत असेल तर मी बघ्याची भूमिका घेवू शकत नाही. कार्यकर्ते आणि जनतेच्या अग्रहास्तव मी निवडणूक लढवणार असं मी पक्षाला सांगून टाकलेलं आहे. 

.समजा युती झाली अन् भाजपाकडून तुम्ही उभे राहिले तर बदामरावांची निवडणूकीत मदत घेणार काय?
नाहीच मुळीच नाही. आहो साहेब, माझी एकच भूमिका आहेे. मला जनतेची सेवा करायची आहे. त्यांच्यासोबत राहून काय करायचं? त्यांनी पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार म्हणून सत्तेत राहून चार चांगल्या गोष्टी केल्याचं सागावं. वैयक्तीक माझं त्यांचं कुुठल भांडण नाही,  वैर नाही. त्यांनी जनतेला त्रास दिलाय आणि जनतेने मला पर्याय म्हणून निवडूण दिले. त्यामुळे मी त्यांची मदत घेणार नाही आणि मदतही करणार नाही. अशास्थितीतही जनता म्हणाली, पंडित-पवार हे एकत्रित येवून काम केलं तर आपलं बरं होईल. तेंव्हा मी कोणासोबतही काम करायला तयार आहे. हे जनतेचं साम्राज्य आहे, आम्ही सेवक आहोत. जनतेला पंडितांसोबत जाण मान्य नाही म्हणून त्याच्यापासून आम्ही अलिप्त आहोत. 

पंकजाताई आणि तुमच्याच मतभेद आहेत, तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा सपोर्ट आहे असं जाहिर बोललं जातयं हे खरं आहे का?
नाही, चुकीचं आहे. असं काही नाही, उलट ताईंनी महाजनादेश यात्रेत मला लहान भाऊ म्हणून संबोधले आहे. त्यांनी परळीला जेवढा निधी दिला तेवढाच गेवराईला दिला आहेे. पण काही लोकांनी त्यांच्या राजकीय फायद्यासाठी अशा अफवा पेरल्या, तशा बातम्या छापून आणल्या, आमच्यातत गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला. पण मी समजदार आहे, ताईंनाही या गोष्टी कळतात, त्यांनी त्यांच्या जबाबदार्‍या पार पाडल्या मीही पार पाडत आहे. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत, मनभेद नाहीत आणि यापुढेही नसतील. कारण गेवराई मतदार संघाचा विकास करण्यासाठी पंकजाताई पालकमंत्री असणे गरजेचे आहे. या पाच वर्षात जो काही विकास झाला तो आमच्या मते गेवराई मतदार संघाचा बॅकलॉग पाहता दहा टक्केच आहे. पुढच्या पाच वषार्त तो पन्नास टक्के होईल आणि येणार्‍या दहा वर्षात मतदार संघाचा शंभर टक्के विकास झालेला दिसेल. पश्‍चिम महाराष्ट्रातील एखाद्या विकसित मतदार संघासारखा गेवराई मतदार संघ तुम्हाला दिसून येईल. लोकसभेमध्ये आम्ही प्रामाणिक काम केलं, मताधिक्य दिलं, इथले लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजाताई मुंडे लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या पाठिशी आहेत. 

पंकजा मुंडे, विनायक मेटे यांच्यातल्या वादामुळे तुमच्या आणि मेटेंच्या संबंधात काही फरक पडला का?
मेटे साहेब आणि आमच्या वडिलांचे चांगले संबंध होते. ते नेहमीच घरी यायचे, त्यांनी वडिलांना शिवसंग्राममध्ये प्रदेश कार्यकारिणीवर येण्याचेही आमंत्रण दिले होते. मात्र वडिलांचे आणि स्व.गोपीनाथरावांचे चांगले संबंध असल्याने त्यांनी मेटेंचे आमंत्रर साभार नाकारले होते. आपण मुंडे साहेबांसोबतच काम करणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं. मुंडे साहेबांशी घट्ट नातं आहे, ते तोडणार नाही असं वडिलांनी सांगितल्यामुळे मेटे साहेबांनी यावर पुन्हा भाष्य केलं नाही. मी सर्वांसोबत प्रेमाने राहतो. फक्त हे दोन पंडित सोडून बाकी सर्वांना नमस्कार घालतो. चहा,पाण्यासाठी बोलवतो. आम्ही दोघेही बीड जिल्ह्यातले असल्यामुळे मुंबईला गेल्यावर भेट होते. जुने संबंध आहेत, अशा स्थितीत एकदा मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली. दोघांनीही मुख्यमंत्र्यासोबत फोटो काढला आणि तो फोटो व्हायरल झाला. त्यातून गैरसमज पसरविण्याचे काम विरोधकांनी केले. मी याबाबत ताईसाहेबांना सांगितलं ही, मेटे साहेब मला वेळोवेळी मदतही करतात. मी सध्या ताईच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. खर तर त्या दोघातला वाद मिटावा असं मला वाटतं. मी तेवढा मोठा नाही, आमचे जे संबंध आहेत ते राजकारण विरहीत आहेत. 

परवाच्या कार्यक्रमात विजयसिंह पंडित यांनी व्यासपीठावरून तुम्हाला लिंबू म्हणून संबोधलं?
त्यांनी तसं कशामुळं हे मला माहित नाही. मी खालच्या स्तरावर जावून टिका करत नाही. ती जि.प.अध्यक्ष असतांना, पं.स.,जि.प. ताब्यात असतांना या मतदार संघातील कुठल्या गावाचा पाणी प्रश्‍न मार्गी लावला हे त्यांनी सांगावं. मी तर माझ्या लोकांचे आणि विरोधकांचेही प्रश्‍न सोडवतो. विरोधकांच्या ग्रामपंचायतींनाही पाण्यासाठी निधक्ष देतो. ते सत्तेत असल्यावर विरोधकांचा एकही प्रश्‍न सोडवत नाही. 

गेवराईत तिरंगी लढत झाली तर तुमची खरी लढत कोणाशी असेल? बदामराव की विजयसिंहाशी?
हा प्रश्‍न जनतेलाच विचाराना ते सांगतील. माझ्यासाठी हे एक चोर आहेत अन् दुसरे दरोडेखोर आहेत. दोघांनी जनतेचे तेवढेच वाटोळे केले आहे. एकाने गोड बोलून तर दुसर्‍याने कडू बोलून. पण हे दोघेही एकाच माळेेचे मणी आहेत. दोघात काहीच फरक नाही. पंडितांनी स्वत:च्या कार्यकाळात काहीच केले नाही. आता जनता कोणाला दगड समजते आणि कोणाला वीट हे येणार्‍या निवडणूकीत समजेल. 

वंचितकडून उमेदवार उभा ठाकला तर त्याचा तुम्हाला काही फरक?
गेवराई मतदार संघात अधी व्यक्ती पाहून मतदान केलं जायचं. पंडितांनी अत्यंत वाईट सवय लावून ठेवली होती. एक तर हे पंडित कुठल्या एका पक्षात स्थिर नसतात. त्यांना पक्षाची देणं-घेणं नसतं, त्यांना सत्तेशी देणं-घेणं असतं. बदामराव आधी अपक्ष होते, पुन्हा भाजप पुरस्कृत झाले आता सेनेत गेले. ताई म्हणाल्या तर ते भाजपातही येतील. पक्ष निष्ठा त्यांना महत्त्वाची नाही. अमरसिंहाचंही तसंच आधी राष्ट्रवादी मग भाजप  पुन्हा राष्ट्रवादी त्यांना पक्षाची गरज नाही. परंतू २०१४ पासून भाजप हा एकमेव पक्ष असेल की, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भाजपाला मतदान केलं. आता पुन्हा तेच पंतप्रधान व्हावेत म्हणून लोकांनी कालच्या निवडणूकीत मतदान केलं. येणार्‍या निवडणूकीत पंकजाताईंना पालकमंत्री, फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी लोक मतदान करतील. येथे जातीवर अथवा व्यक्तीवर मतदान होणार नाही. आता विकासावर आणि पक्षावर मतदान होईल.

येणार्‍या विधानसभा निवडणूकीला सामोरे जातांना आपलं व्हीजन काय असेल?
मी लोकांना सांगतोय, केंद्रात भाजपाचं सरकार आलं आहे. राज्यात भाजपाचं सरकार आलं तर मतदार संघातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न आपल्याला मिटवता येईल. वॉटरग्रीडच्या माध्यमातून मोठा निधी येईल. सिंचनाचा प्रश्‍न सुटेल, पश्‍चिम घाटातील पाणी गोदावरील खोर्‍यात आणण्यात येईल. २०२४ पर्यंत पिण्याचं पाणी आणि सिंचन मतदार संघातल्या प्रत्येक गावामध्ये दिसून येईल. पिण्याच्या पाणी आणि सिंचन याला अधिक महत्त्व दिले जाईल. 

मतदारांना आज काय आवाहन कराल? 
माझे मतदारांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, गेल्या पाच वर्षात मी इमाने, इतबारे काम केले आहे. स्वत:साठी काहीच केलं नाही. जे काही केलं ते मतदारांसाठी, जनतेसाठी पण यातूनही लोकांना असं काही वाटत असेल की मी चांगलं काम केलं नाही. तर मला मतदान करून नका आणि या पंडितांनाही मतदान करून नका. तुम्ही चौथा पर्याय निवडा, मी म्हणत नाही की मी खूप चांगला आहे पण पुन्हा तुम्ही पंडितांना मतदान केलं आणि ते निवडूण आले तर हा मतदार संघ पुन्हा पंन्नास वर्षे मागे घेवून जातील. मी एवढचं म्हणेल पंडिस सोडून कोणालाही मतदान करा.
गेल्या पाच वर्षात मी मतदार संघात मी इमाने इतबारे काम केलं. माझ्या कामावर तुम्ही समाधानी नसाल तर मला मतदान करू नका. परंतू दोन्ही पंडितांनाही मतदान करू नका. ते मतदार संघाला पन्नास वर्षे मागं घेवून जातील. गेल्या चाळीस वर्षामध्ये त्यांनी काही केलं नाही, लोकांना त्रास दिला. शासनाच्या योजनांवर दरोडा टाकला, एक पंडित गोड बोलून चोर्‍या करतो तर दुसरा पंडित कडू बोलूण दरोडे टाकतो अशी जळजळीत टिका करत गेवराईचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत आपले मतभेद नसल्याचे स्पष्ट केले. तर आ. विनायक मेटे यांच्यासोबत आपले घरचे संबंध असल्याचे सांगितले. मतदार संघातला माणूस आता माझ्यावर विश्‍वास ठेवत आहे. रस्त्याचे प्रश्‍न सुटत आहेत. भविष्यात पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्‍न सोडवणार आहे. यासह अन्य बाबीवर सायं.दै.बीड रिपोर्टरच्या थेट सवालला कार्यकारी संपादक गणेश सावंतच्या उपस्थितीत पवारांनी थेट उत्तर दिले ते वाचकांसाठी. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review