निवडणुकीची घोषणा झाली, भाजपाचे उमेदवार कोण?

eReporter Web Team

निवडणुकीची घोषणा झाली, भाजपाचे उमेदवार कोण?
माजलगावमध्ये उमेदवारी देण्याबाबत पक्षासमोर आव्हान आष्टीत मन कसे जुळवणार? केजमध्ये काय होणार?
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कामाला लागले, कोणत्या उमेदवारासाठी प्रचार करायचा? भाजपा कार्यकर्ते प्रश्‍नात अडकले
बीड (रिपोर्टर):- राष्ट्रवादी कॉंग्रेसने बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघातले उमेदवार जाहीर करून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना प्रचारासाठी दिशा दिलेली असतानाच निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरही भाजपाकडून अद्याप उमेदवारीची घोषणा झाली नाही. माजलगावमध्ये चार जण इच्छुक आहेत, तिथं कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत पक्षासमोर आव्हान आहे तर आष्टीत धस-धोंडेंचं मन कसं जुळवायचं? याची चिंता पक्षाला असतानाच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मात्र प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजप कार्यकर्ते कुठल्या उमेदवाराचा प्रचार करायचा या प्रश्‍नात अडकल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत प्रचंड प्रमाणात करण्यात आलेली आयात भाजपा नेतृत्वाला गोत्यात सापडू पहात असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसत आहे. 
   राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा.शरद पवारांनी पाच विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारांची घोषणा करून कार्यकर्त्यांसह उमेदवाराला कामाला लावले मात्र दुसरीकडे सत्तेत असलेल्या भाजपाला निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरही अद्याप उमेदवार देता आलेले नाहीत. केवळ परळी आणि गेवराई येथील उमेदवाराची निश्‍चिती कार्यकर्त्यांना दिसून येत आहे. त्यामध्येही गेवराईतील जागा कोणाला सुटणार? हा प्रश्‍न समोर असला तरी जागा सुटो अथवा ना सुटो निवडणूक लढवणार ही भूमिका विद्यमान आमदाराने घेतल्यामुळे त्यांच्यासह कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत तर इकडे माजलगावमध्ये लोकसभा निवडणुकीत फायदा व्हावा या इराद्याने अनेकांना आयात करून घेतले. आता त्याठिकाणी जगताप, आडसकर, शेटे आणि विद्यमान आमदार आर.टी. यापैकी 
उमेदवारी द्यायची कोणाला? 
कोण्या एकाला उमेदवारी दिली तर यातून कोण बंड उभारेल? याचे आव्हान पक्षश्रेष्ठीसमोर आहे. तर तिकडे आष्टी-पाटोद्यात धस-धोंडेंचं उघड वाक्‌युद्ध सुरू आहे. ऐन निवडणुकीच्या काळात उमेदवारीवरून दोघात होत असलेलं हे वाक्‌युद्ध पक्षाच्या उमेदवाराला कुठे नेऊन ठेवील हेही पक्षासाठी आव्हान ठरू पहात आहे. केजमध्ये विद्यमान आमदारांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिथलाही उमेदवारीचा प्रश्‍न भाजपा पक्षश्रेष्ठीसमोर असून निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरही भाजपाकडून उमेदवाराची निश्‍चितता करण्यात येत नसल्याने भाजपा कार्यकर्ते आपआपल्या मतदारसंघात कुठल्या उमेदवाराचे काम सुरू करायचे ? या प्रश्‍नचिन्हात अडकल्याचे दिसून येत आहे. 


अधिक माहिती: beed

Related Posts you may like