ताज्या बातम्या

औरंगाबादेत शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लावला  आता बीडमध्ये पुनरावृत्ती होणार-ओवैसी

औरंगाबादेत शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लावला 
आता बीडमध्ये पुनरावृत्ती होणार-ओवैसी
बीड (रिपोर्टर):- औरंगाबादच्या जनतेने इतिहास घडवून इम्तियाज जलील यांना निवडून दिले. जलील यांनी तेथील प्रस्थापित शिवसेना नेत्याच्या सत्तेला सुरुंग लावला. त्याचीच पुनरावृत्ती बीडमध्ये शेख शफीक यांच्या माध्यमातून होईल आणि शिवसेना उमेदवाराचा पराभव होईल असा विश्वास एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असोदोद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केला.
बीड मतदार संघातील एमआयएमचे उमेदवार शेख शफिक व माजलगाव मतदार संघातील शेख अमर जैनोद्दीन यांच्या प्रचारार्थ मंगळवारी बीडमध्ये झालेल्या सभेत ओवेसी बोलत होते. क्षीरसागर काका-पुतण्याने बीड मतदारसंघ भकास केला. आता क्षीरसागर काका-पुतण्याच्या भूतबंगल्याला उखडून फेका, त्यांचे नामोनिशाण मिटवा असे आवाहन त्यांनी केले. मतविभागणी करण्यासाठी मजलिस 
निवडणुक लढवितो असा आरोप केला जातो. मात्र आम्हांला ७० वर्षाच्या राजकीय प्रवासाचा इतिहास असून तो संघर्षातून तयार झाल्याचे ओवेसी म्हणाले. मजलिस सामान्यांच्या हक्कासाठी लढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या सेटींगचे गुपित सांगावे, असे आवाहनही त्यांनी केले. जयदत्त क्षीरसागर आधी राष्ट्रवादीत होते त्यांनी शिवसेनेत उडी मारली त्यापाठोपाठ आधी आघाडी केलेले संदीप यांनीही राष्ट्रवादीत उडी मारली. हे दोघेही कोलांटी उडीचे मास्टर आहेत.
 एका घरात सोबत राहतात, सोबत खातात  आणि बाहेर येवून आम्हांला सांगतात तुमची सेटिंग आहे. खरी सेटिंग तर तुमचीच आहे असा आरोप ओवेसी यांनी केला. सय्यद मतीन, महेफुजुर रहमान, शेख निजाम, शेख शफीक, शेख अमर, खयूम इनामदार, शेख मतीन, हाफिज अश्फाक, मोमीन अझहर, हरिसन फ्रांसिस, एजाज इनामदार, शिवाजी भोसकर, सचिन गाडे, हाजी आयुब पठाण उपस्थित होते.

अधिक माहिती: beed reporter

Best Reader's Review