काल मतदान झाले, आज उमेदवारांसह समर्थकांची धाकधूक वाढली बीडमधील मतांच्या धु्रवीकरणाचा दावा फोल 

काल मतदान झाले, आज उमेदवारांसह समर्थकांची धाकधूक वाढली
बीडमधील मतांच्या धु्रवीकरणाचा दावा फोल 
गेवराईत मतांच्या ध्रुवकरणामुळे भाजपाचा उमेदवार अडचणीत
परळीत कट टू कट फाईट, मुंडे भाऊ-बहिणींकडून विजयाचे दावे 
माजलगावात तालुक्याने प्रकाश सोळंकेंना सांभाळले, 
वडवणी-धारूर तालुक्यावर रमेश आडसकरांची मजल 
केजमध्ये नमितांच्या बोलबाल्याला गतिरोधक, 
आष्टीत धोंडे-धसांच्या पाठिशी तरीही 
दरेकरांचा आजबेंच्या विजयाचा दावा 
बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांसाठी काल मतदान झाले. सहाही मतदारसंघात मताचा टक्का हा साठच्या पुढे गेल्याने सत्ताधार्‍यांसह विरोधी उमेदवारात धाकधूक वाढली असून या निवडणुकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पालकमंत्री पंकजा मुंडे, ना. जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची असणार आहे. या तिघांकडूनही विजयाचे दावे केले जात असले तरी धाकधूक वाढल्याचे सांगण्यात येते. 
   बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघात नात्यागोत्याची निवडणूक झाली आहे. बीड विधानसभा मतदारसंघात ना. जयदत्त क्षीरसागरांविरोधात संदीप क्षीरसागर या काका-पुतण्यातल्या लढाईत कोण बाजी मारणार? यावर दावे प्रतिदावे होत असले तरी जयदत्त क्षीरसागरांसाठी उद्याचा निकाल हा प्रतिष्ठेचा असणार आहे.  या मतदारसंघात मताचे ध्रूवीकरण करण्याचा प्रयत्न झाला मात्र तो प्रयत्न फारसा यशस्वी दिसून आला नाही. गेवराई विधानसभा मतदारसंघात काका-पुतणे आणि मेव्हणे यांच्यात लढाई होत असून भाजपाचे लक्ष्मण पवार यांना विजयसिंह पंडितांचे तगडे आव्हान असतानाच शिवसेनेचे बदामराव पंडितांनी बंडखोरी करून निवडणूक लढविली. त्यामुळे या ठिकाणी मताचे प्रचंड धु्रवीकरण झाल्याने हा मतदारसंघ अटीतटीचा दिसून येत आहे. तिकडे परळीत भाऊ-बहिणीच्या लढाईमध्ये कोण बाजी मारणार? याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. या मतदारसंघात साम-दाम-दंडासह भावनेवरही बरच काही पाणी पुलाखालून गेल्याने या मतदारसंघातही टफ निवडणूक झाली. त्यामुळे धनंजय मुंडेंसह पंकजा मुंडे यांच्यात विजयाची धाकधूक कायम आहे. आष्टी मतदारसंघात भाजपाचे भीमराव धोंडे हे सुरेश धसांमुळे एकतरफी येऊ शकतात असे वाटत असतानाच धसांचे ईवाई साहेबराव दरेकर आजबेंच्या पाठिशी उभे राहिले आणि आजच राष्ट्रवादीचे आजबे ३० हजार मतांनी निवडून येतील, अशी प्रतिक्रिया दिल्याने तिथेही अस्वस्था निर्माण झाली आहे. केजमध्ये नमिता मुंदडा ह्या निवडून येतील असे असे धाडसाने सांगितले जात आहे, परंतु भाजपाचे नाराज आमचा विजय जास्त नाही दहा-पाच हजाराने होईल असे सांगत असल्याने तिथेही भाजपाच्या उमेदवाराला धास्ती लागली अहे. इकडे माजलगावमध्ये तालुका हा प्रकाश सोळंके यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा असतानाच वडवणी, धारूर या दोन तालुक्यांनी भाजपाचा उमेदवार रमेश आडसकर चांगला सांभाळला असल्याचे बोलले जाते. त्यामुळे तिथेही उमेदवारात धाकधूक वाढल्याचे दिसून येते.
 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review