महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवटीचे ढग? सत्ता स्थापनेचा तिढा कायम; राज्य घटनात्मकपेचात

eReporter Web Team

महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवटीचे ढग?
सत्ता स्थापनेचा तिढा कायम; राज्य घटनात्मकपेचात
राष्ट्रपती राजवट लागू झाली तर सेना कोर्टात जाणार
मुंबई (रिपोर्टर): शिवसेना, भाजप युतीत बेबनाव झाल्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या मदतीने शिवसेना सरकार बनवू पाहत असतांना कॉंग्रेसने काल अचानक सेनेला हात दाखवल्याने शिवसेना सरकार स्थापनेबाबतचे पत्र राज्यपालांना देवू शकली नाही. राज्यपालांनी वेळ वाढवून दिला नसल्याचा आरोप करत शिवसेनेने राष्ट्रपती राजवट लागू झाली तर कोर्टात जाण्याची तयारी ठेवली आहे. दुसरीकडे आज राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्ता स्थापनेबाबत आमंत्रण देण्यात आलेले आहे मात्र कॉंग्रेसने अद्याप आपली भुमिका स्पष्ट न केल्याने राष्ट्रवादीही आज सत्ता स्थापन करू शकेलच हे सांगणे कठीण होवून बसल्याने राज्य घटनात्मकपेचात आडकलं आहे. 
विधानसभा निवडणूकीचे निकाल लागून आज वीस दिवस झाले तरी अद्याप राज्यामध्ये कुठलाच पक्ष सरकार स्थापन करू शकला नाही. मुख्यमंत्री पदावर आडून बसलेल्या शिवसेनेचे आणि भाजपाचे ऋणानुबंध गेल्या दोन दिवसांपूर्वी तुटले. काल शिवसेनेला राज्यपालांनी सरकार स्थापनेबाबत निमंत्रण दिलं. प्रचंड हालचाली झाल्या मात्र शिवसेनेने राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला तो वेळ वाढवून देण्यात आला नसल्याने काल शिवसेना सरकार स्थापनेचा दावा करू शकली नाही. कॉंग्रेसने ऐनवेळेस शिवसेनेला हात दाखवला. त्यापाठोपाठ तात्काळ राज्यपालांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सरकार स्थापनेबाबत आमंत्रण दिलं. आज सायंकाळी ८.३० वाजेपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसला सरकार स्थापन करावयाचे आहे परंतू कॉंग्रेसने अद्याप आपली भुमिका स्पष्ट केली नाही. त्यात राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार यांनी एवढ्या कमी वेळात आमदारांची जुळवाजूळव होणे अशक्य असल्याचे म्हटले आहे त्यामुळे राष्ट्रवादीही आज सरकार स्थापन करेलच हे सांगणे कठीण होवून बसले आहे. अशा स्थितीत राज्यावर राष्ट्रपती राजवटीचे ढग अधिक गडद होत असतांना दिसून येत आहेत. राज्यात कुठलाच पक्ष सत्ता स्थापन करण्यात अद्यापतरी यशस्वी झाला नसल्याने राज्य घटनात्मकपेचात अडकल्याचे दिसून येते मात्र अशा स्थितीतही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर शिवसेना वेळ दिला नाही म्हणून कोर्टात जाणार असल्याचे सूत्रांचे सांगणे आहे.  

शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, 
कॉंग्रेस नेत्याने व्यक्त केला विश्वास
मुंबई : सरकार स्थापण्यासाठी कॉंग्रेसचा पाठिंबा गृहीत धरून शिवसेनेने सोमवारी सायंकाळी सरकार स्थापन करण्याचा दावा राज्यपालांकडे केला, पण मुदतीत कॉंग्रेसकडून पत्रच प्राप्त झाले नाही. पाठिंब्यावरून कॉंग्रेसमध्ये झालेल्या घोळाचा शिवसेनेला फटका बसला आणि तोंडघशी पडावे लागले. मात्र यानंतरही राज्यात शिवसेना-कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकत्रित सरकार स्थापन होईल आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल असा विश्वास कॉंग्रेस नेते आणि आमदार कागडा चांड्या पाडवी यांनी व्यक्त केला आहे. कागडा चांड्या पाडवी हे कॉंग्रसचे नंदुरबारमधील अक्कलकुवा मतदारसंघातील आमदार आहेत. शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करत सलग दुसर्‍यांदा ते आमदारपदी निवडून आले आहेत. सत्ता स्थापनेची प्रक्रिया अद्याप सुरु असून, निकाल सकारात्मक असेल. वैयक्तिकरित्या मला तिन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतील आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असं आमदार कागडा चांड्या पाडवी यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेच्या समर्थनावरून आघाडीत जुंपली
मुंबई : निवडणुकीचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला असला तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यातच भाजपा आणि शिवसेनेतील वाद आणखी वाढला आहे. त्यातच भाजपानं नकार दिल्यानंतर राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं होतं. परंतु २४ तासांमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांच्या समर्थनाचं पत्र त्यांना सादर करता आलं नाही. त्यातच आता झालेल्या उशीरावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच जुंपल्याचं पहायला मिळत आहे. कॉंग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामुळे उशीर होत असल्याचं म्हटलं. तर अजित पवार यांनी कॉंग्रेसमुळे समर्थन देता आलं नसल्याचं म्हटलं. 
राज्यपालांनी शिवसेनेला दिलेल्या मुदतीत आमदारांच्या समर्थनाचं पत्र सादर करता आलं नाही. त्यामुळे तिसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला विचारणा केली आहे. परंतु पत्र देण्यावरूनच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. एकट्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पत्रानं काहीही झालं नसतं. आम्हीदेखील कॉंग्रेसच्या पत्राची वाट पाहत होतो. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र निवडणूक लढल्यानं दोघांनीही एकत्र हा निर्णय घेणं अपेक्षित होतं. कॉंग्रेसचे आमदार सध्या जयपूरला असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्यात अडचण येत आहे. कॉंग्रेस सोबत आली तरच यातून काही मार्ग निघू शकतो, असं पवार यावेळी म्हणाले.
तर दसुरीकडे शरद पवार यांच्या सांगण्यामुळेच एक दिवस पुढे ढकलला असल्याची प्रतिक्रिया माणिकराव ठाकरे यांनी दिली. २४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. १८ दिवसांनंतरही राज्यात अद्याप सरकार स्थापन होऊ शकलं नाही. राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तसंच यापूर्वीच भाजपानं आपण सरकार स्थापन करू शकणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.


अधिक माहिती: State constitutional paper

Related Posts you may like