रोड लेवल चुकल्यानेच रस्ता व चेंबर खाली-वरी कॉलिटी कंट्रोल पण मिक्स डिझाईनची पायमल्ली

eReporter Web Team

रोड लेवल चुकल्यानेच रस्ता व चेंबर खाली-वरी
कॉलिटी कंट्रोल पण मिक्स डिझाईनची पायमल्ली
राज्यातील नागरिकांना नागरी भागात मुलभूत पायाभुत सुविधा पुरविण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढवण्याकरीता राज्य शासनाने अत्यंत महत्त्वकांक्षी योजना राज्यभरात राबविण्याचा निर्णय घेतला. या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहरातील रस्ते दर्जेदार करणे म्हणून ही योजना अंमलात आणली. या योजनेत बीड शहरातील १६ रस्त्यांची कामे मंजूर झाली. यात १८.४५ किलोमीटर एवढे सिमेंट रस्ते नवीन तयार होणार असून यासाठी ८६ कोटी रूपये एवढा निधी मंजूर करण्यात आला. यात राज्य शासनामार्फत अनुदान ७५ टक्के व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा सहभाग २५ टक्के अशी तरतूद करण्यात आली. विशेष म्हणजे हे काम तात्काळ सुरू करावे असे आदेशित असल्याने तात्काळ ऑनलाईन टेंडर पद्धतीने टेंडर मागवून हे काम नियमाने एजन्सीला देण्यात आले. आणि काम सुरू झाले. शहरात पुर्वीच सुरू असलेल्या अमृत पाणी पुरवठा योजना व नगरपालिकेची भुयारी गटार योजना हे सुरू असल्याने शहरातील सर्व रस्त्यांची चिरफाड झालेली होती. काही प्रमाणात अमृत योजना व गटार योजना यांचे काम संपत आले म्हणून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राबविण्याचे काम सुरू झाले. त्यात बार्शी रोड, शिवराज पानसेंटर ते तुळजाई चौक, बार्शी रोड, पोलीस अधिक्षक कार्यालय ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह व जुना नगर नाका ते अंबिका चौक, या कामाची सुरूवात झाली. अत्यंत दर्जेेदारपणे काम सुरळीत सुरू असल्याचे दिसून आले. परंतू बारकाईने सर्व्हेक्षण केले तर या दर्जेदार कामातही अनेक त्रुट्या आढळून आल्या. रस्त्याच्या कामाची कॉलिटी कंट्रोल असली तरी मिक्स डिझाईन रिपोर्टप्रमाणे काम सुरू आहे का? हे कोण तपासणार? महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दै.रिपोर्टरच्या प्रतिनिधीने गेल्या एक महिना या रस्त्याच्या कामाचा व या कामाचे तांत्रिक अंदाजपत्रक मिळावे म्हणून विशेष प्रयत्न केले. संबंधितांना मोबाईलवरून फोन केले. व्हाटस्ऍपला मॅसेज व एसएमएसद्वारे अंदाज पत्रकाची मागणी केली. परंतू अंदाजपत्रक देण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले. या रस्त्याच्या कामाचे खडीकरण, मुरूमकरण कसे झाले? म्हणण्यापेक्षा मिक्स डिझाईन रिपोर्टप्रमाणे हे काम झाले का? याची सहनिशा करणे अत्यंत गरजेचे आहे. विशेष म्हणजे जे रस्ते तयार झाले त्या रस्त्यावर सस्पेंशन जाईन दिसत नाहीत. एम-२० कॉक्रीटीकरण करतांना जे रेडी मिक्स कॉक्रीट वापरण्यात येत आहेत त्या कॉंक्रीटची गुणवत्ता एम-२० प्रमाणे आहे का? याची जागेवरच तपासणी करण्याची अत्यंत गरज आहे. विशेष म्हणजे या रस्त्याच्या कामावर जागोजागी भुयारी गटारचे चेंबर दिसतात. तर मग या रस्त्याच्या कामातून चेंबरसाठी जी जागा व्यापली गेली त्या जागेवर रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करण्याची गरज नाही. अंदाजपत्रकात चेंबर वजा करूनच संबंधित गुत्तेदारांना पुन्हा मोजमाप करून बीले दिले तर नगर पालिकेचा मोठा फायदा होणार यात काही शंका नाही. चेंबरचे छिद्र छोटे असले तरी बार्शी रोड ते तुळजाई चौक व बार्शी रोड ते नाट्यगृह या दोन रस्त्याच्या मधोमध मुख्य चेंबर ५६ व छोटे चेंबर (सबचेंबर) १४५ असे असून एकंदरीत अनुमान लावला तर या दोन रस्त्यावरच चेंबरच्या जागेचे रस्त्यातून मोजपमाप वजा केले तर लाखो रूपयांचा फायदा होवू शकतो. विशेष म्हणजे शहरात या योजनेतून १६ रस्ते होणार, या सोळा रस्त्यात भुयारी गटारीचे हजारो चेंबर येवू शकतात. याकडे नगर पालिका मुख्याधिकारी यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. या संदर्भात दै.रिपोर्टरच्या प्रतिनिधीने मुख्याधिकारी रोहिदास यांना भेटून सर्व बाबी संदर्भात चर्चा करण्याचाही प्रयत्न केला परंतू कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याने मुख्याधिकारी रोहिदास हे सतत व्यस्त असतात. 
प्रशासनाचे कोणतेही काम सुरू करतांना सर्व प्रथम मिक्स डिझाईन रिपोर्ट घेवूनच कामाची सुरूवात करावी लागते. मिक्स डिझाईन रिपोर्ट प्रमाणे काम करणेही गरजेचे आहे. परंतू अनेक ठिकाणी मिक्स डिझाईन रिपोर्टर हे फाईलला लावण्याचे एक कागद बनले आहे. जेणेकरून कागदोपत्री पुर्तता व्हावी अशी अवस्था या डिझाईन रिपोर्टची झाल्याचे दिसून येते. नगरोत्थान अभियानाअंतर्गत सुरू असलेले हे काम पाहिल्यास अत्यंत दर्जेदार पद्धतीने सुरू असल्याचे दिसून येते. खर्‍या अर्थाने पाहिले तर पहिल्यांदाच बीडमध्ये असे दर्जेदार काम होत असावे म्हणून याकडे दै.रिपोर्टरच्या प्रतिनिधीने विशेष लक्ष देवून सर्व्हेक्षण केले. या दर्जेदार कामातही अनेक त्रुट्या आढळून आल्या. चुक ही चुक असते. छोटी असो की मोठी. म्हणूनच या छोट्याश्या विषयावर महत्त्वाच्या मुद्यावरच हे सर्व्हेक्षण करण्यात आले. सर्व प्रथम या सुरू असलेल्या कोट्यवधींच्या कामावर नगर पालिकेचा एकही अभियंता दिसून आला नाही. परंतू गुत्तेदार स्वत:च्या अभियंत्याकडून हे काम अत्यंत दर्जेदारपणे करून घेत असल्याचे दिसून आले. जर या साईडवर नगर पालिकेचाही अभियंता असता तर ज्या त्रुट्या आमच्या निदर्शनास आल्या त्या त्रुट्या दुरूस्त झाल्या असत्या. 

एम-२० कॉंक्रीटीकरण नंतर व्हायबे्रट मशिन, तवा मशिन न फिरवता नगरोत्थान महाअभियान सुरू
तयार झालेल्या रस्त्यावर सस्पेंशन जॉईंट दिसत नाही, कॉंक्रीट मशिननेही काम सुरू नाही 
एम-२० कॉंक्रीटची गुणवश तपासणी जागेवरच करण्याची गरज
चेंबरचे छिद्र वजा करून व पुन्हा मोजमाप करूनच देयके दिले तर न.प. प्रशासनाला मोठा फायदा 
रस्ता खाली-वर झाला की चेंबर रोड लेवल चुकल्याचे संकेत 
अंदाजपत्रक देण्यासाठी न.प.चे टाळाटाळ, दै.रिपोर्टरने अभियंतापासून गुत्तेदारांपर्यंत केला पाठपुरावा 
उपअभियंता दंडे यांची बदली पण चार्ज दिला नसल्याने एकही अभियंता साईडवर नाही
मिक्स डिझाईन रिपोर्ट प्रमाणे काम सुरू आहे का? याची तपासणी कोण करणार? 

सस्पेंशन जॉईंट,व्हायबे्रट,
तवा मशिन गायब
सध्या सुरू असलेले हे काम प्रगतीपथावर आहे. या कामाची एक बाजू पुर्णत: कंप्लेट झाली असली तरी दुसर्‍या बाजूचे काम सुरू आहे. रस्त्याच्या खालचे काम खडीकरण, कॉंक्रीटीकरण कसे झाले?  हा विषय पुर्वीचा नंतर एम-२० कॉंक्रीटीकरण झाले. यात सांगायचे तात्पर्य एवढेच की खडीकरण करतांनी चांगल्या प्रकारे दाबून घेण्यासाठी रोेलरने दाबून घेण्यात आले का? एम-२० कॉंक्रीटीकरण करतांना व्हायब्रेट मशिनने कॉंक्रीट पसरवण्यात आले का? त्यानंतर तवा मशिनने कॉंक्रीट मिश्रणात जास्ती झालेले पाणी बाहेर काढणे व तवा मशिन फिरवून झालेले काम चिकणे करून घेवून त्यावर ब्रशने खरबुडे रेषा ओढणे. या पद्धतीने काम होणे गरजेचे आहे. रस्ता पुर्ण झाल्यावर ३० मिटर रूंदीवर जागोजागी सस्पेंशन काढणे म्हणजे ३०-३० मिटरवर ३ इंच रस्ता कट करून घेणे. परंतू या तयार झालेल्या रस्त्यावर व्हायब्रेट मशिन, तवा मशिन वापरण्यात आली का? त्याशिवाय कॉंक्रीटीकरण कॉंक्रेट मशिनद्वारे केले का? हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. परंतू या सुरू असलेल्या कामावर कॉंक्रीटीकरण करतांनी एक ऍल्युमिनियमच्या पट्टीने लेवल करण्यात आले. व्हायब्रेट मशिन, तवा मशिन हे गायब होते. 

अंदाजपत्रक देण्यात टाळाटाळ
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान या अंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट रस्ता संदर्भात गेल्या एक महिन्यापासून दै.रिपोर्टरचे प्रतिनिधी पाठपुरावा करत आहेत. अंदाजपत्रक मिळावे म्हणून नगर पालिकेतील सर्व अभियंता, उपअभियंता यांना मोबाईलवर फोन करून प्रत्यक्ष भेट घेवून अंदाज पत्रकाची मागणी केली. शेवटी उपअभियंता यांचा व्हाटऍपनंबर नसल्याने त्यांना एसएमएस करून अंदाजपत्रकाची मागणी केली. संबंधित गुत्तेदारांनाही फोन लावून अंदाजपत्रकाविषयी बोलणे झाले. परंतू नगर पालिकेतील अभियंता यांनी सागितले की, सदरील कामाचे अंदाजपत्रक हे उपअभियंता दंडे यांच्याकडे आहे. त्यांना विचारणा केली असता माझी बदली झाली असून तरी बीडला आलो तर तुम्हाला या संदर्भात माहिती देईन. शेवटी शनिवारी मुख्याधिकारी यांना व्हाटसऍपवरून अंदाज पत्रकाची मागणी केली परंतू अंदाजपत्रक मिळालेच नाही. विशेष म्हणजे अभियंता दंडे यांची बदली झाली आहे. त्यांनी चार्ज का दिली नाही किंवा नगर पालिकेने त्यांच्याकडून चार्ज का घेतला नाही हे मात्र समजू शकले नाही. सोबत दंडे साहेब यांना एसएमएस स्क्रीनशॉट फोटो.

रस्ता व चेंबर खाली-वरी
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विभागामार्फत भुयारी गटारचे काम सुरू आहे. त्याप्रमाणे म.जि.प्रा.विभागाने आपले काम केले. रोड लेवलपर्यंत चेंबर आणने ही जिम्मेदारी त्यांची होती. नंतर महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत सिमेंट रस्त्याची कामे सुरू झाली. त्यांनी पण नियमाने रोड लेवल धरून काम सुरू केले. शेवटी असे निदर्शनास आले की, रोडलेवल चुकल्यामुळे रस्ता व चेंबर खाली-वरी झालेले आहेत. पहिल्या छायाचित्रात मोठे चेंबर हे तयार झालेल्या रस्त्याच्या सहा इंच खाली दिसत आहेत दुसर्‍या बाजूच्या रस्त्याचे काम झाल्यानंतर हे चेंबर जमिनदोस्त होणार दुसर्‍या छायाचित्रात चेंबर रस्त्याच्या वर पाच इंच वर आहेत. जर याला एखादे वाहन किंवा पादचारी धडकला तर नक्कीच वाहनाचे टायर फुटेल व पदचार्‍याचा पाय फुटेल. तिसर्‍या छायाचित्रात या चेंबरवर रस्ता तयार झाल्यानंतर कॉंक्रीटीकरण आले होते. नियमाने रस्त्याच्या मधले चेंबर एक इंच खोल असले तरी चालते पण हे चेंबर तीन-तीन इंच खोल आहेत. चौथ्या छायाचित्रात हे चेंबर वाहनासाठी गाडी आदळण्याच्या कामी येणार. एकंदरीत हे वर आलेले चेंबर व रस्त्याच गेलेले चेंबर याची दुरूस्ती होणार. परंतू जर नगर पालिकाचे अभियंता यांनी रोड लेवल योग्यपणे काढला असता तर रस्ता व चेंबर खालीवरी झाले नसते. 


अधिक माहिती: beed n.p.

Related Posts you may like