विधानपरिषद विरोधी पक्षनेता; खडसे, पंकजा यांच्या नावांची चर्चा

eReporter Web Team

विधानपरिषद विरोधी पक्षनेता; खडसे, पंकजा यांच्या नावांची चर्चा
पक्षनिष्ठेचा क्रायटेरिया बाजूला ठेवल्यास प्रवीण दरेकर किंवा सुरेश धस होऊ शकतात विरोधी पक्षनेते
बीड (रिपोर्टर):-

कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा भेदक तोफखाना निष्प्रभ करण्यासाठी विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्या नावाची भाजपामध्ये चर्चा आहे. सभागृह गाजवणारे आणि समोरच्या बाकावरील सदस्यांची बोलती बंद करणारे हे दोन्ही नेते सध्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे यापैकी एका नावावर किंवा विद्यमान सदस्यांमधील एखाद्या फर्ड्या वक्त्याची या पदावर निवड होण्याची शक्यता आहे.पक्षनिष्ठेचा क्रायटेरिया बाजूला ठेवल्यास प्रवीण दरेकर, सुरेश धस यांचीही नावे चर्चेत असली तरी सत्ताधारी पक्षांना काबूत ठेवण्यावर भाजपने लक्ष दिले आहे. 
    विधानपरिषद विरोधी पक्षनेते म्हणून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रभावी कामगिरी बजावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांना त्यांनी धारेवर धरले होते. आता त्यांच्याप्रमाणेच आपलाही विरोधी पक्षनेता सशक्त असावा, असे भाजपला वाटत आहे. पण तीस वर्षांपासून सोबत असलेला शिवसेना हा जुना मित्र आता सत्ताधारी बाकावर असल्यामुळे भाजपची अडचण झाली आहे. शिवसेनेचे कायदेतज्ज्ञ अनिल परब, आक्रमक नेते रामदास कदम आणि  दिवाकर रावते यांच्यासह कॉंग्रेसचे भाई जगताप, प्रा. जनार्दन चांदुरकर, शरद रणपिसे, अनंत गाडगीळ, तर राष्ट्रवादीचे हेमंत टकले, विद्या चव्हाण तसेच २० वर्षांपासून सभागृहात असलेले शेकापचे जयंत पाटील आणि लोकभारतीचे कपिल पाटील यांच्यासारखा तोफखाना आहे. यांच्यामध्ये विरोधकांना नेस्तनाबूत करण्याची क्षमता आहे. त्यामुळे या सर्वांना वेसन घालणारा सदस्य भाजपकडे नाही. सध्या भाजपच्या भात्यात सुरजीतसिंह ठाकूर व डॉ. परिणय फुके आहेत. पक्षनिष्ठेचा क्रायटेरिया बाजूला ठेवल्यास प्रवीण दरेकर, सुरेश धसयांचीही नावे चर्चेत असली तरी सत्ताधारी पक्षांना काबूत ठेवण्यावर भाजपने लक्ष दिले आहे. 
विधान परिषदेवर सध्या एकच जागा 
विधान परिषदेचे सदस्य धनंजय मुंडे हे विधानसभेवर निवडून गेले आहेत त्यामुळे विधान परिषदेवर सध्या तरी एकच जागा शिल्लक आहे. जुलै महिन्यामध्ये विधान परिषदेवर चार जागा रिक्त होणार आहेत. आज पंकजा मुंडेंना तात्काळ विधान परिषदेवर घेता येणार नाही. भाजपाकडे बहुमत नसल्यामुळे धनंजय मुंडेंच्या जागी त्या बसू शकणार नाहीत. इकडे शिवसेनेतही दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांसह सुभाष देसाई यांनाही विधान परिषदेवर यायचे आहे. अशा स्थितीत जूलैपर्यंत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद रिकामेही ठेवता येणार नाही.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like