माणसातील सैतान

eReporter Web Team

माणसातील सैतान
माणसांनी ज्यांना भ्यावे, असे अनेक विषय पुर्वी होते. माणसांनी सर्व प्रकारच्या भयावर मात केली. आता माणसांना भीती उरली आहे ती, फक्त माणसांची, माणसांच्या जगात माणसांना माणसांची भीती वाटावी याहून भयानक ते काय? माणुस सुधारला तितकाच तो नालायक आणि सैतानी वृत्तीचा बनला. माणसाने माणसा सारखं वागावं  असं नेहमीच सांगितलं जातं, पण वागतो कोण? समाजात अशा काही वाईट घटना घडतात. त्या घटना पाहून किंवा ऐकून मनाचा थरकाप उडतो. महिलांच्या बाबतीत आजही काही पुरुषांची वाईट दृष्टी असते. महिला पुर्वी पासून अन्याय, अत्याचार सहन करत आल्या. आजच्या युगात महिला सुरक्षीत नाही, ही समाजाच्या मनाने लाज आणणारी बाब आहे. महिला सगळ्या क्षेत्रात पुढे आल्या, पण त्यांची सुरक्षेची हमी नाही. कार्यालयात जाणारी, रस्त्याने चालणारी, शेतात काम करणारी किंवा अन्य कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात काम करणार्‍या महिला, मुलीकडे लोक वाईट नजरेने पाहतात. बलात्काराच्या संख्या कमी झालेल्या नाहीत. रोज देशात चार बलात्कार होतात. कित्येक विनयभंग होतात. बलात्काराच्या घटनेबाबत कठोर कायदे केले, कायदे करुन ही अत्याचाराच्या घटना कमी झाल्या नाहीत. दिल्लीच्या निर्भया आणि जम्मु काश्मिरमधील कटुओच्या  प्रकरणाने अवघ्या देशाला हादरुन टाकले होते. त्यानंतर केंद्राने बारा वर्ष वयापर्यतंच्या मुलीवर अत्याचार झाल्यास आरोपीला फाशीची शिक्षेची तरतुद केली. निर्भयाच्या घटनेनंतर देशात कित्येक अत्याचाराच्या भीषण घटना घडलेल्या आहेत, आणि घडत आहेत. दोन दिवसापुर्वी हौद्राबादची घटना घडली. या घटनेने पुन्हा एकदा देशात खळबळ उडाली. 
मदत करणारेच नराधम निघाले 
हैद्राबाद येथील प्रियंका रेड्डी ही डॉक्टर असणारी तरुणी घरी परतत असतांना तिची गाडी पंक्चर झाल्याने तिच्या मदतीला काही तरुण आले, आपल्याला मदत करणारेच आपला काळ ठरतील याचा विचार ही तिच्या डोक्यात आला नाही. तरुणीला दुर नेवून तिच्यावर अत्याचार करुन तिला जिवंत जाळण्यात आले. दुसर्‍या दिवशी तरुणीचा मृतदेह दिसून आला. ज्या हैवानांनी हे कृत्य केले ते मोहंमद आरिफ, जोलू नवीन, चंताकुंता आणि जोलू शिवा हे नराधम असून पोलिसांनी या चौघांना अटक केली. या नराधमाविरोधात देशभरात संताप व्यक्त केला जात आहे.  लोक रस्त्यावर उतरुन या घटनेचा निषेध करुन नाराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. काही संतप्त लोक नराधमांना आमच्या ताब्यात द्या आम्ही त्यांना कसा धडा शिकवायचा ते शिकवतोत अशा ही भावना व्यक्त करत आहेत. मदत करण्याच्या बहाण्याने असे सैतानी आणि माणुसकीच्या चिंंधड्या उडवणारी कृत्य घडत असेल तर महिला, मुलीस मदत करणारावर आता विश्‍वास ठेवायचा कसा?  
बिघडत चाललेली तरुणाई 
कोण काय करील याचा गॅरंटी राहिली नाही. अनेक जण आपल्या नात्यातील मुलीवर, महिलांवर अत्याचार करुन आपला भेसुर चेहरा दाखवत असतात. महिला घरात आणि बाहेर ही सुरक्षीत नाही हे नेहमीच समोर आलेलं आहे. महिलांचा आदर केला पाहिजे असं नुसतं म्हटलं जातं, प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जात नाही. हल्ली तरुण मंडळी चांगलं करण्यापेक्षा वाईटच जास्त करतांना दिसतात. याला घरातील वातावरण तितकचं जबाबदार आहे. आपला मुलगा नेमका काय करतो, त्याचे वर्तन कसं आहे, हे आई-वडील पाहत नाही. चांगल्या संस्काराची मुलं शक्यतो वायाला जात नाही किंवा त्याचे वर्तन वाईट नसतं. ज्यांना संस्कारच नाहीत अशी मुलं टार्गटपणा करुन दुसर्‍यांना त्रास देणारी ठरतात. समाजात आराजकता माजवणे एकतर्फी प्रेमातून मुलींना मारणे, जाळणे अशी कृत्य वाढले आहेत. काहींना आपल्या मुलांची फुकटच फुशारकी असते. जेव्हा मुलाचं कार्य समोर येतं तेव्हा पालकांच्या डोळ्यासमोर काजवेच चमकतात. एका चोरीच्या प्रकरणात काही चोरटे पकडण्यात आले होते. त्यात एक अल्पवयीन मुलगा होता. अल्पवयीन मुलांचं नाव वृत्तपत्रात छापू नये असा एक नियम आहे, पण नजर चुकीने त्या अल्पवयीन मुलाचे नाव छापून आलं, वृत्तपत्रात नाव छापुन आलं म्हणुन मुलाच्या वडीलाने वृत्तपत्रालाच नोटीस पाठवली, ती नोटीस पोलिसांनाही आली. जसा काय ह्याचा मुलगा एखादं शौर्य गाजवायलाच गेला होता.  पेपरवाल्यांना आणि पोलिंसांना नोटीस पाठवण्याची जशी तत्परता दाखवण्यात आली, तशीच तत्परता आपला मुलगा रात्रीचा कुठे फिरतो तेव्हा का दाखवण्यात आली नाही? गुन्हेगारी वृत्तीला पाठबळ देणारे तितकेच दोषी असतात. पालकांनी आपल्या मुलांवर ताबा ठेवला पाहिजे. त्यांना चार समजुतीचे डोस दिले पाहिजे. आपल्या घरात जशा मुली आहेत. तशाच त्या दुसर्‍यांच्या असतात हे आई, वडीलांनी आपल्या डिवटयांना सांगितले पाहिजे तेव्हा कुठं समाजात बदलाची प्रक्रिया सुरु होवू शकते आणि समाजातील गुन्हेगारीला आळा बसू  शकतो. 
नशीलीपणा वाढला 
प्रगतीचा डांंगोरा पिटला जात असला तरी तरुणाईमध्ये तितकी वैचारीकता आली नाही. चंगळवादाला मोठ्या प्रमाणात वाव मिळू लागला. तरुण मुलं नशेच्या आहारी जास्त प्रमाणात जावू लागले. दारु, अंमलीपदार्थाचं सेवन वाढलं आहे. नशेतून गुन्हेगारीच्या घटना वाढू लागल्या. चित्रपट, टिव्ही चॅनलवर काय दाखवलं पाहिजे याचं भान राहिलेलं नाही. पॉर्न साईटमुळे मुले बिघडू लागले आहेत. समाज नेमका कसा घडवायचा हे आपण ठरवलं पाहिजे. शासन, प्रशासन व्यवस्था आपले काम व्यवस्थीतपणे करत नसल्याचे नेहमीच समोर आलेलं आहे. समाजात घडणार्‍या घटनांची तात्काळ दखल घेवून त्यावर कठोर अमलबजावणी करणे तितकेच गरजेचे आहे. बलात्कार प्रकरणातील कित्येक आरोपींना फाशीची शिक्षा झालेली आहे, पण त्यांना तात्काळ शिक्षा होत नाही. घटना घडल्या नंतर ते प्रकरण जदल गती न्यायालयात चालवून आरोपीला शिक्षा ठोठावली की, त्याची तात्काळ अंमजबजावणी करायला पाहिजे. आपल्याकडे कायद्यात अनेक पळवाटा असल्यामुळे बलात्कार प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हायला वेळ लागतो. बलात्कार प्रकरणातील आरोपीला दयेचा अर्ज करण्याची तरतुद आहे. बलात्कार्‍याला काय म्हणुन दया दाखवली पाहिजे? त्याचा तर तात्काळ सोक्षमोक्ष केला पाहिजे. ज्या प्रमाणे एखादी कॅन्सरची गाठ तात्काळ काढली तरच त्याचा फैलाव होत नाही, गाठ काढायला थोडा उशिर केला की, ती मोठी होवून माणसाचा जीव घेते, तसच बलात्कार्‍याला तात्काळ शिक्षा व्हायला हवी, ती ही अगदी कठोरपणे! 
कुणी तरी लढलं पाहिजे 
समाज आणि सामाजीक स्थिती बद्दल नागरीकामध्ये असणारी उदासीनता हा त्या समाजाला मिळालेला भयावह शापच असतो. जगातील पसरलेल्या अत्याचाराकडे कानाडोळा करणं हे षंडपणाचं लक्षण आहे. कुणीच एखाद्याच्या मदतीला जात नाही, म्हणजे आपण ही जावू नये असं नसलं पाहिजे. जो पर्यंत स्वत: अन्याय, अत्याचाराच्या विरोधात उभा राहत नाही तो पर्यंत समाजात बदल घडणार नाही. इतिहासात डोकावून पाहिले तर अनेक महापुरुष आणि थोरांनी अन्याय, अत्याचाराच्या विरोधात बंड केलेले आहे. इतिहास साक्षीला ठेवून प्रत्येकांनी अत्याचाराच्या विरोधात बंड करुन उठले पाहिजे. 
एका आईचं मुलाला पत्र 
कुटूंबात आईची भुमिका महत्वाची असते, आई कठोर असेल, संस्कारी असेल तर तिची मुलं तशीच निपजतात. एका आईने आपल्या मुलाला पत्र लिहलं. ती म्हणते, जगातील उत्तमोत्तम ज्ञानाचं आणि मुल्याचं संपादन करण्यासाठी तुझ्या आकलन क्षमतेमध्ये तु सुधारणा केली पाहिजे, तेच तुला आपल्या राष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट, समाजासाठी दागिना आणि आई वडीलासाठी आर्शिवाद बनवेल, सन्मान सत्य आणि विश्‍वासार्हता या मुल्याशिवाय तुझ्या क्षमता मग त्या किती ही महान असल्या तरी अत्यंत कुचकामी ठरतील,जी तत्व तुझ्या मनावर बालवयात बिंबवण्यात आली आहेत. त्या तत्वांचा कधीही अव्हेर करु नकोस लक्षात ठेव तुझ्या प्रत्येक शब्दासाठी आणि कृतीसाठी तु परमेश्‍वाराला उत्तरदायी आहेस, तुझ्या वडीलांनी तुला दिलेली मुल्य आणि त्यांची शिकवणुक कसोशीने आणि सातत्याने आचरणात आणायचा प्रयत्न कर, तुला तुझ्या आईच्या आनंदाची आणि स्वत:च्या कल्याणाची किंमत आहे म्हणुन सांगते, तुला एक अनैतिक उडानटप्पू झालेलं किवा ज्याची लाज वाटेल असा मुलगा झालेलं पाहण्यापेक्षा तू समुद्रात बुडून मेलेला किंवा मृत्यूने तुझ्यावर अकालीच घाला घातलेला पाहणं मी पसंद करेन, आपल्या मुलाला समाजाचा जबाबदार आणि महत्वाचा घटक बनवणं हे प्रत्येक आई-वडीलाचं कर्तव्य आहे. डॉ. प्रियंका रेड्डी या डॉक्टर तरुणीवर जो हिंसक प्रकार घडला तो माफीत बसणारा नाही. यातील एका आरोपीच्या आईने आपली प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटलं आहे की, ज्या प्रमाणे प्रियंकाला जीवंत जाळण्यात आलं, त्याच प्रमाणे आरोपी असलेल्या माझ्या मुलाला शिक्षा मिळाली पाहिजे, खरं तर तीच शिक्षा आरोपीला मिळायला हवी, अशीच देशवाशियांची संतप्त भावना आहे. नराधमांना अद्दल घडवलीच पाहिजे. आपल्यातील माणुस मरत आहे, तो मरणं म्हणजे विनाशाकडे वाटचाल आहे. विनाश टाळायचा असेल तर प्रत्येकांने जागृक असलं पाहिजे. 


अधिक माहिती: beed

Related Posts you may like