पाण्डेय, पोद्दार साहेब, वाळू प्रकरणातल्या ‘त्या’ तथाकथीत अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई कधी होणार?  पाच पोलिसांना मुख्यालयी पाठवून उपयोग नाही 

eReporter Web Team

पाण्डेय, पोद्दार साहेब, वाळू प्रकरणातल्या ‘त्या’ तथाकथीत अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई कधी होणार? 
पाच पोलिसांना मुख्यालयी पाठवून उपयोग नाही 
बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यात होणारा अवैध वाळू उपसा हा महसूल आणि पोलिसांच्या आशीर्वादानेच होत असल्याचा दावा करत महसूलसह पोलिस कोण किती हप्ता घेतो? याचं दरपत्रक लोकांसमोर आणून जिल्ह्यातील भ्रष्ट प्रशासन व्यवस्थेचे लक्तरे वेशीला टांगले गेले होते. या प्रकरणात तब्बल सहा ते सात महिन्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष हर्ष पोद्दार यांनी पाच पोलिसांना संशयाच्या भोवर्‍यात घेरत त्यांना मुख्यालयी राहण्याचे सक्त आदेश आणि एकप्रकारची शिक्षा दिली खरी परंतु या प्रकरणात हात धुवून घेणार्‍या पोलिस प्रशासनातील एपीआय, पीआय सह वरिष्ठ अधिकार्‍यांचे काय? महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्यासह अन्य भ्रष्ट अधिकार्‍यांचे काय? असा सवाल उपस्थित करत सर्वसामान्य पोलिस कॉन्स्टेबलांना दोेषी धरण्यापेक्षा या प्रकरणातील मोठ्या माशांवर जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय आणि जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार हेे कारवाई करणार का? असा सवाल जनतेतून विचारला जात आहे. 
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केली जात आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातील छोट्या-मोठ्या नद्यातून पोलिस आणि महसूल प्रशासनाला मोठा हप्ता देत हे अवैध काम केले जात असल्याचे गेल्या पाच-सहा महिन्यांपूर्वी उघड झाले होते. कुठल्या महसूल कर्मचारी, अधिकार्‍याला आणि कुठल्या पोलिस कर्मचार्‍यासह वरिष्ठ अधिकार्‍याला  किती हप्ता दिला जातो याचं दरपत्रक जगजाहीर करण्यात आले होते. या प्रकरणात जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी आपल्या पाच पोलिस कर्मचार्‍यांवर मुख्यालय रवानगीची कारवाई केली होती, परंतु मोठमोठे मासे अद्यापही हप्तेखोरीच्या तलावात मनसोक्त पोहताना दिसून येत आहेत. सर्वसामान्य कर्मचार्‍यांवर कारवाई करून जिल्हा अथवा खातं भ्रष्टाचार मुक्त होणार नाही, हे हर्ष पोद्दार यांनी समजून घ्यायला हवं. या प्रकरणात जे पीआय आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी असतील त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचं आहे. त्याचबरोबर महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांची आहे. पोद्दार आणि पाण्डेय हे दोन्ही अधिकारी कर्तव्यदक्ष असून वाळू प्रकरणात कुणालाही मुभा दिली जाणार नाही, या भूमिकेत त्या प्रकरणातल्या सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे. पाच पोलिसांवरची कारवाई म्हणजे वाळू प्रकरणातलं सत्य नव्हे तर अधिक गौडबंगाल असेल त्यामुळे या प्रकरणात सर्वसामान्य कर्मचार्‍यांना सुळावर देण्यापेक्षा दोषी असलेल्या वरिष्ठ अधिकारी, कर्मचार्‍यांनाही कारवाईचा बडगा दाखवावा, अशी मागणी होत आहे. 
माळापुरी अवैध वाळू उपसा
जिल्ह्यातील बहुतांश भागातून आजही वाळू उपसा होत आहे. गेवराई तालुक्यातील माळापुरी येथील वाकी नदी व सिंदफणा नदीतून तलाठी, मंडल अधिकारी यांच्या संगनमताने वाळू उपसा केला जातो. सदरचा उपसा हा ट्रॅक्टरद्वारे चालू असल्याचे गावकर्‍यांचे सांगणे आहे. 


अधिक माहिती: beed police

Related Posts you may like