बलात्कारी कोण? बलात्कार करणारे की बलात्काराचा व्हिडीओ पाहण्यासाठी पॉर्न साईट चाळणारे वृध्द आश्रमात थेर घरात

eReporter Web Team

बलात्कारी कोण?
बलात्कार करणारे की बलात्काराचा व्हिडीओ पाहण्यासाठी पॉर्न साईट चाळणारे
वृध्द आश्रमात थेर घरात
-रोखठोक-
गणेश सावंत
९४२२७४२८१०
---
सात वर्षाचा मुलगा राजा हरिश्‍चंद्राचं नाटक एक वेळेस पाहतो. त्या बाल मनावर त्या नाटकाचा एवढा परिणाम होतो, की तो बालक पुढे उभे आयुष्य सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने चालत राहतो. अहिंसेचा पुजारी होतो. अन महात्मा बनून उभ्या जगाला गांधीगिरीची शिदोरी देतो. मोहन करमचंद गांधी नावाच्या बालमनावर राजा हरिश्‍चंद्राच्या नाटकाने एवढा प्रभाव टाकला असेल तर मग आज आपण रोज आपल्या घरात प्रत्येक दहा पाच मिनीटाला विविध दुरचित्रवाहिन्यांवर चित्रपटातून आणि जाहिरातीतून अर्धनग्न, कामुक, व्याभीचारी चित्र पाहत असु, संवाद ऐकत असू, अन व्याभिचारीपणाचा बाहेरख्यालीपणाचे नाट्य याची देही याची डोळा बघत असतोत तर आजच्या बालकांवर तरूण पिढीवर त्याचा काय परिणाम होणार? तो अहिंसक होणार की हिंसक होणार? तो चारित्र्यवान होणार की चारित्र्यहिन होणार? तो स्त्री जातीचा आदर करणार की अनादर करणार? त्याची ‘काम’ याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा असणार? बालमनावर जे काही पडत असतील तेच मन भविष्यात सैरा-वैर धावत असतील. या मनाला ताब्यात ठेवण्यासाठी वयाच्या पाच ते पंधरा वर्षांपर्यंत जे संस्कार घरातून मिळायला हवे तेच संस्कार आज लहान मुलांना, तरूणांना मिळत नाही. त्यामुळे त्या तरूणांचे मन अहिंसावादी होण्यापेक्षा सत्यवादी होण्यापेक्षा हिंसावादी आणि असत्यवादी होत चालले आहे. घरातली रचना आता पूर्णत: बिघडत असल्याने, फ्लॅट संस्कृती घराघरात शिरल्याने, मुलांना वेळ देता येत नसल्याने, मुलांचे मन हे शुध्द राहतायत का? याचा शोध आता घेण्याची वेळ आली आहे. राजा हरिश्‍चंदाच नाटक पाहून एखादा बालक आयुष्यभर सत्य आणि अहिंसेची बाजू धरत असेल तर मग रोज प्रत्येक क्षणाला सेक्स, बॉयलर, मारधाड, बलात्कार, व्याभिचार यासारखे दृष्य पाहून आजच्या मुलांचे 
मन बलात्कारी
होणार नाही का? दिल्लीची निर्भया असो, कोपर्डीची ताई असो या काल-परवा हैद्राबाद येथे बलात्कार करून जिवंत जळून मरणारी डॉक्टर मुलगी असो या सर्वांना वासनेच्या नजरेतून पाहणारे नराधम जेवढे समाजव्यवस्थेसाठी घातक आहेत, तेवढेच समाजव्यवस्थेचा डांगोरा पिटवणारे आणि घटना घडल्यानंतरच मेनबत्ती पेटवून आक्रोश करणारे तुम्ही आम्हीही तेवढेच जबाबदार आहोत. आपले मुलं आणि मुली कोणाच्या सानिध्यात आहेत? त्यांचे मित्र कसे आहेत? शिक्षण घेतात परंतू शिक्षणाव्यतिरिक्त त्यांना आनंद कशात मिळतो? त्यांना शिक्षणाव्यतिरिक्त नेमकी गोडी कशात आहे? हे तपासण्यापेक्षा, शोधण्यापेक्षा अभ्यास केलास का रे? अभ्यास करत जा, शेजारच्या मुलाने गेल्यावर्षी एवढे टक्के मार्क आणले, शेजारची मुलगी अमुक ठिकाणी शिक्षण घेते, तिचं काही घे....असं म्हणत शिक्षणाच्या स्पर्धेत अथवा अभ्यासाच्या आणि मेरिटच्या स्पर्धेत तुम्ही आम्ही मुलांना केवळ धावण्यास भाग पाडतो. परंतू संस्काराने आणि संस्कृतीने जगाच्या पाठीवर दबदबा निर्माण करणार्‍या या हिंदुस्थानात आज मुलावरचे संस्कार बलात्काराचा मार्ग धरणारे का ठरत आहेत? आणि सुसंस्कृत देशामध्ये फॅशनच्या नावाखाली मुलींच्या अंगावरचे कपडे का कमी होत आहेत? याचा विचार पालक करत आहेत का? एकीकडे घरामधल्या टीव्ही माध्यमातून रोज कमी कपड्यातल्या मॉडेल्स पहायच्या, मालिंकामधून अफेयर पहायचे, कीस सह बेड सीन प्रत्येक तासाला, अर्ध्या तासाला पहायचा, मग अशा वेळी कुठल्याही मुलाचे अथवा मुलीचे मन हे अध्यात्मिक, सांस्कृतिक, सभ्यता असणारे राहिल का? रिकामं मन हे भुताचं धन असते. आणि याच रिकाम्या मनात कामातूर आणि उत्तेजीतपणा आणणारे दृश्य वेळोवेळी पाहितले जात असले तर ते मन बलात्कारी होणार नाही का? गेल्या आठ दहा दिवसात हैद्राबादमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉक्टर तरूणीवर ज्या चार कामांद नराधमांनी सामुहिक बलात्कार केला. नुसता बलात्कारच केला नाही तर त्या डॉक्टर तरूणीला जिवंत जाळले. हि घटना जेवढी संतापजनक आहे, तेवढीच संतापजनक आणि तळपायाची आग मस्तकाला नेवून सोडणारी घटना निषेध करणार्‍या तथाकथीत समाजव्यवस्थेने त्याच मुलीबाबत घडवून आणलीय. त्या 
डॉक्टर तरूणीचा 
बलात्काराचा व्हिडीओ 
पाहण्यासाठी या देशातल्या एक नव्हे दोन नव्हे तर लाखाच्या घरात असलेल्या चावट चोत्यांनी पोर्न साईट अनेकवेळा चेक केल्याचे निदर्शनास येते. एकवेळेस नव्हे तर दोन नव्हे तर तब्बल ऐंशी लाखापेक्षा जास्त वेळा त्या तरूणीचा व्हिडीओ पाहण्यासाठी सर्च करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. लोक इंटरनेटवर बलात्काराचा व्हिडीओ पाहण्यासाठी किती आसुसलेले आहेत. ऐंशी लाखापेक्षा जास्त लोक तो व्हिडीओ शोधत असल्यामुळे पोर्न साईटवर त्या मुलीचे नाव टॉप टेन मध्ये आले. त्या चार नराधमांनी शारिरीक बलात्कार केला, तिचा शारिरीक छळ केला, तिच्या शरिराला अक्षरश: पेटवून दिले. मात्र या ऐंशी लाख नराधमांनी बलात्काराचा व्हिडीओ पाहण्याच्या दृष्टीकोनातून पदोपदी त्या मुलीवर जो अप्रत्यक्ष बलात्कार केला त्याला जबाबदार कोण? आम्हाला आज एवढेच सांगायचे आहे, मुलींवर बलात्कार झाले की संताप येतो. चार दिवस निषेध केला जातो. मेनबत्या पेटवल्या जातात. आणि पुन्हा दोन दिवसानंतर या गोष्टी विसरल्या जातात पुन्हा दुसर्‍या बलात्काराची वाट पाहिली जाते. अन त्यात मुलींच्या राहणीमानावर आक्षेप घेतला जातो. मुली कमी कपड्यामध्ये राहतात, तंग कपड्यामध्ये राहतात, अंग झाकवण्यासाठी नाही तर दाखवण्यासाठी चाळे करतात. असे एकना अनेक आरोप स्त्री जातीवर केले जातात. आणि पुरूष प्रधान संस्कृतीच्या शेख्या मिरवल्या जातात. परंतू इथे प्रत्येकाचे मन विटलेले आहे, प्रत्येकाचे मन कामातूर झालेले आहे, आणि प्रत्येकाचे मन हे टचटचीत बांध्याकडे पाहण्यासाठी आसुसलेले आहे. कामातूरा भय ना लज्जा असं आपल्याकडे म्हटले जाते. आणि ते सत्यही आहे. कामातूर झालेला माणूस, कामातूर झालेले मन हे भाद्रपदातल्या श्‍वानासारखे वर टंगडी करणारे असते. या भाद्रपदातल्या श्‍वानरूपी मनाला श्रावणातल्या सौंदर्यासारखे करायचे असेल तर प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यावर मग मुलगी असो वा मुलगा लक्ष देणे गरजेचे आहे. आजच्या विज्ञान युगात, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जग अत्यंत जवळ आले आहे. परंतू सुसंस्कृत या देशात माणसं मात्र दुर जाताना दिसून येत आहे. आज प्रत्येक घरामध्ये
वृध्द आश्रमात 
थेर घरात
आणुन ठेवले आहेत. भारताची संस्कृती ही एकत्रीत कुटूंब अशी आहे. परंतू गेल्या काही दशकापासून एकत्रीत कुटूंब संस्कृतीला आता हाडताळ फासली जात आहे. लोकांना वेळ नाही, कामाच्या जागी जायचं आहे. नौकरीच्या जागी जायचे आहे. अशा एक ना अनेक कारणांना समोर ठेवून प्रत्येक घरातले जोडपे हे वेगळे होत आहे. गेल्या पाच दशकापूर्वी घरामध्ये सासु, सासरे, भाया, दिर, ननंद, जाऊ, त्यांची मुले, असे दहा पासून पाच पन्नास लोकांचा परिवार असायचा. आता तेवढा परिवार तर सोडा, घरामध्ये आई-बाप अथवा सासु-सासरे राहुन देण्याचा चंग काही सुनांनी आणि काही मुलांनी मनी बांधून ठेवलाय. खरं तर त्या काळीही आई बापांपासून विभक्त होणार्‍या मुलाला सोळाव्या शतकात जगदगुरू संत तुकोबांनी ‘रांडेने केला गाढव’ अशा अभंगातून आसुड ओढले. आज अशा गाढवांची संख्याही मोठी होवून बसली. घरातल्या वृध्दांना आश्रमामध्ये पाठवायचे, आणि आपण नवरा-बायको नौकरीला आहोत आणि घरातल्या मुला-मुलींना खेळण्यासाठी त्यांच्या टाईमपाससाठी बाहेरचे थेर घरात आणुन ठेवायचे. या थेरामध्ये व्हिडीओ असेल, टीव्ही असेल, इंटरनेट असेल नाहीतर पैसे देवून प्रत्येक घरात येणारी गोष्ट असेल, घरात आई-बाप नसतात, आजी-आजोबांचा तर प्रश्‍नच नाही मग अशावेळी घरात एकटी राहणारे मुलं टीव्हीवर येणारे अर्धनग्न कार्यक्रम पाहतात. इंटरनेटवर पोर्न साईट सर्च करून नेत्रसुख घेतात. अशा वेळी असे उत्तेजीत चित्र पाहिल्यानंतर त्या मुलाचे किंवा मुलीची उत्तेजना वाढणार नाही का? घरामध्ये मुलांवर लक्ष ठेवायला वृध्द माणसं असतील, ज्येष्ट माणसं असतील तर अशा गोष्टींना बर्‍याच प्रमाणात पायबंद राहिल. परंतू आज अनेक महाभागांना स्वत:चे आई बाप जड होवून बसले आहेत. आणि जेव्हा आई बापांकडे ओझ म्हणून पाहिलं जाते. ज्या देशामध्ये माता पित्यांना सर्वोच्च स्थान आहे, त्याच देशामध्ये वृध्दांना आश्रमात जावे लागते. त्या देशामध्ये संत महात्म्यांपेक्षा बलात्कार्‍यांचाच जन्म मोठ्या प्रमाणावर होणार नाही का? एक विषय महत्वाचा आहे. बलात्कारासारखे महापातक कृत्य तेव्हाच होते जेव्हा 
घर घर मे है रावण
इतने राम कहासे लावू असा प्रश्‍न पडतो. कारण बलात्कारासारखे कृत्य करणार्‍या नराधमांना मन हे नसतेच. त्यांचे र्‍हदयही पाशानासारखे असते. परंतू असे र्‍हदय निर्माण करणारे, असे मन निर्माण करण्यामध्ये समाजव्यवस्थेचा हात आहे का? शासन व्यवस्थेचा हात आहे का? प्रशासन व्यवस्थेचा हात आहे का? बलात्कारासारखे कृत्य करणार्‍या मातापित्यांचा दोष आहे का? याचा शोध आणि बोध घ्यायचा असेल तर सर्व प्रथम प्रत्येकाने स्वत:च्या आजुबाजूच्या वलय तपासने नित्तांत गरजेचे आहे. आम्ही सुरूवातीलाच सांगितले, सात वर्षाच पोरग राजा हरिश्‍चंद्राचा नाटक पाहत अन उभ आयुष्य सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालत महात्मा बनत. मग तुमचं आमचं पोरग किंवा पोरगी सातत्याने कामुक चरित्र,चित्र याची देही याची डोळा पाहत असेल, आजुबाजूलाही तसेच वर्तन तिला दिसत असेल तर मग राम जन्मेल कि रावण? आता घर घर मे है रावण, इतने राम कहासे लावू हा सवाल करण्यापेक्षा घराघरातले रावणं जाळण्याचे काम प्रत्येकाने करायचे हवे. नौकरीच्या गावी जातोय, आपल्या मुलामुलींकडे पहायला आपल्याला वेळ नाही. अशावेळी घरातल्या आई बापाला वृध्दाश्रमात ठेवण्यापेक्षा स्वत:च्या घरात ठेवणे पसंत करा. आपल्याला मुलगा किंवा मुलगी इंटरनेटवर काय पाहते? ति कोणाच्या संपर्कात आहे? याची दक्षता घ्या. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली व्याभिचारी चित्रीत मालिका चित्रपट दाखवणारे तथाकथीत लोकांकडे जाब विचारा. चोली के पिछे क्या है? हे गाणे वाजवण्यापेक्षा मेरा रंग दे बसंती चोला अशा संगीतांना महत्व द्या. तेव्हाच कुठं बलात्कारासारख्या गंभीर घटनांना तुम्ही आम्ही आळा घालू शकतो. बलात्काराच्या घटना घडतात म्हणून त्याला सरकार जबाबदार आहे, व्यवस्था जबाबदार आहे, आपल्या जबाबदार आहे याविरूध्द बोट मोडण्यापेक्षा या घटना घडणारच नाही आणि प्रत्येकाचे मन शुध्द असेल असे वागण्यासाठी मन करारे प्रसन्न सर्व शुध्दीचे कारण हे धोरण आखा आणि ते प्रत्येकाच्या घरामध्ये आमलात आणा.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like