भाजपात दोन गट?

eReporter Web Team

भाजपात दोन गट?

मजीद शेख | बीड

लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर राज्यातील भाजपा फॉममध्ये होता. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपाच्या गळाला लागले होते. भाजपातील भरती पाहता, भाजपाच्या नेत्यांना विशेष करुन देवेंद्र फडणवीस यांना उखळ्या फुटत होत्या. विकास पाहून इतर पक्षाचे नेते आमच्या पक्षात येत असल्याचे भाजपाचे नेते मोठ्या तोर्‍यात सांगत होते, जशीच सत्ता हातातून गेली, तसाच भाजपाच्या नेत्याचे चेहरे पडले आणि भाजपात उभी फुट पडली? पक्षात दोन गट तयार झाले. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, बावनकुळे ही मंडळी नाराज असल्याने भाजपात अस्वस्थता निर्माण झाली. मेगा भरतीला ओहटी लागते की काय असाच प्रश्‍न निर्माण झाला. 
पाच वर्ष भाजपाचे मुख्यमंत्री म्हणुन देेवेंद्र फडणवीस होते, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पुन्हा एकदा चांगले यश मिळाले. लोकसभेचं यश पाहून राज्यातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही नेत्यांनी खच खाल्ली  आपलं राजकारण संपलं असं म्हणुन हातपाय गाळून बसले आणि अनेकांनी भाजपा, शिवसेनेचा रस्ता पकडला. भाजपातील भरती पाहता, देवेंद्र फडणवीस खुपच आनंदी होते, आता राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचं काहीच अस्तित्व राहिलं नाही, हे दोन्ही पक्ष फक्त नावालाच राहतील अशा तोर्‍यात फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यासह अन्य नेते बोलत होते. विधानसभेत भाजपाला सर्वात जास्त १०५ जागा मिळाल्या खरं मात्र शिवसेना भाजपाच्या सोबत गेली नसल्याने भाजपाचे सत्तेचे स्वप्न आधूरे राहिले. शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रीत येवून सत्ता संपादन केल्याने भाजपावर मोठी नामुष्की आली. सत्ता नसल्याने भाजपातील अंतर्गत वाद आता उफाळून येवू लागले. सत्ता असतांना ज्यांना-ज्यांना फडणवीस व त्यांच्या सहकार्याने जाणीव पुर्वक त्रास दिला, त्याचा आता स्फोट होवू लागला. एकनाथ खडसे हे पुर्वी पासूनच भाजपाच्या राज्यातील नेत्यावर नाराज होते, त्यातच पंकजा मुंडे या ही नाराज असल्याचे समोर आले, आपण नाराज नाही. पक्ष सोडणार नाही असं जाहीरपणे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले असले तरी पंकजा मुंडे ह्या नाराज आहेत हे नाकारुन चालणार नाही. भाजपातील नाराजांचा एक गट एकत्रीत आला आहे. या मध्ये एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडेे, बावनकुळे ही बडी मंडळी आहे. या बड्या मंडळीच्या पाठीमागे अंतर्गत किती आमदार आहे हे समोर आलेले नाही. एकनाथ खडसे यांनी तर त्यांची मुलगी रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांचा पराभव भाजपाच्याच लोकांनी केल्याचा गौप्यस्फोट केल्याने भाजपातील अंतर्गत वाद अधिकच चिघळत असल्याचे दिसून येवू लागले. भाजपातील काही आमदार फुटण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होत आहे. जितका फास्ट भाजपा राज्यात पुढे आला होता. तितक्याच फास्ट भाजपातील अंतर्गत कुरबुरीला आणि फाटाफुटीला सुरुवात झाल्याचे दिसून येवू लागले. भाजपात सरळ-सरळ दोन गट पडल्याचे दिसून येवू लागले. भाजपातील नाराजी पक्षाचे केंद्रीय नेते थंड करण्यास यशस्वी होतील की भाजपाच्या भरतीला आहोटी लागेल हे दिसून येईल. 
नेत्यांची सारवा सारव 
पंकजा मुंडे ह्या भाजपा सोडणार, शिवसेनेत प्रवेश करणार अशी राज्याच्या राजकारणात चर्चा होताच भाजपात एकच पळापळ सुरु झाली. पंकजा मुंडे ह्या पक्ष सोडणार नसल्याची सारवा सारव प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच अशिष शेलार यांनी पक्षात कुणी ही फुटणार नाही, उलट आघाडीतच अस्वस्थता असल्याचे सांगून आपल्या पक्षात सगळं काही आलबेल असल्याचा आव आणला आहे. 


अधिक माहिती: beed

Related Posts you may like