हैद्राबाद बलात्कार्‍यांचे एन्काऊंटर चारही आरोपी ठार घटनास्थळावरच न्याय, पोलिसांवर फुलांचा वर्षाव

eReporter Web Team

हैद्राबाद बलात्कार्‍यांचे एन्काऊंटर
चारही आरोपी ठार
घटनास्थळावरच न्याय, पोलिसांवर फुलांचा वर्षाव

हैदराबाद (वृत्तसेवा) हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले ४ आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले आहेत. हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र ते पोलिसांच्या आवाहनाला दाद देत नसल्याचे पाहून पोलिसांना अखेर त्यांच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या. ही घटना आज (शुक्रवार) पहाटे ३ वाजता घडली. हैदराबादमध्ये एका डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिला ठार मारण्याचा या चार आरोपींवर आरोप होते. बलात्कार आणि हत्येच्या या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरचे देशभरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे तर कायदे तज्ज्ञांनी ही घटना अयोग्य असल्याचे म्हटले आहे. 
   हैदराबादच्या पोलीस आयुक्तांनी या वृत्ताला दुरोरा दिला आहे. तपासादरम्यान या ४ आरोपींना पोलीस घटनास्थळी नेत होते. मात्र, दरम्यानच्या काळात हे चारही आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत होते. त्यानंतर पोलिसांनी या चौघांनाही थांबवण्यचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना दाद देत नसल्याचे पाहून शेवटी पोलिसांनी चौघांवर गोळ्या झाडल्या. यात या चौघांचा मृत्यू झाला. आरोपींनी पोलिसांच्या हातातील शस्त्रे खेचून पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या अशी माहिती तेलंगणचे कायदेमंत्री इंद्रकरण रेड्डी यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना दिली.
   शिवा, नवीन, केशवुलू आणि मोहम्मद आरिफ अशी या ४ आरोपींची नावे आहेत. या चौघाना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. तपासाचा एक भाग म्हणून पोलिसांनी त्यांना घटनेची माहिती मिळवण्यासाठी घटनास्थळी नेले. ही घटना नेमकी कशी घडली हे पोलिसांना तपासायचे होते. मात्र, या दरम्यान या चौघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. चारही आरोपी पळून जात असल्याचे पाहून पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हैद्राबाद बलात्कार आणि खून प्रकरणानंतर या चौघा आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणी देशभरातून होत होती. 


 असा न्याय चंबळचे डाकू 
सुद्धा द्यायचे -उज्ज्वल निकम
हैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींचं पोलिसांनी केलेलं एन्काउंटर अयोग्य व कायद्याला धरून नव्हतं,’ असं स्पष्ट मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ऍड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं आहे. ’झटपट न्याय मिळाल्यानंतर आनंद होणं स्वाभाविक आहे. पण तसा न्याय चंबळचे दरोडेखोरही द्यायचे. पण शेवटी ते दरोडेखोरच होते,’ असंही निकम यांनी सांगितलं. हैदराबाद बलात्कार प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले चार आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना, आज सकाळी पोलीस चकमकीत मारले गेले. या वृत्तामुळं सर्वसामान्य लोकांमध्ये आनंद व समाधान व्यक्त होत आहे. तेलंगणचे कायदामंत्री इंद्रकरण रेड्डी यांनीही या एन्काउंटरचं समर्थन केलं आहे. देवानंच न्याय केला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.


जे झालं ते देशासाठी भयंकर; 
एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज
नवी दिल्ली: हैदराबाद येथील बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींच्या एन्काउंटरनंतर देशभरातून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. माजी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी पोलिसांच्या या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. ’केवळ तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही एखाद्याला कसं मारू शकता?, जे झालं ते खूप भयानक आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like