ताज्या बातम्या

अकरापैकी दहा गट शिक्षणाधिकारी प्रभारी तेही कामकाज न करता जि.प.मध्ये मारतात चकरा

अकरापैकी दहा गट शिक्षणाधिकारी प्रभारी
तेही कामकाज न करता जि.प.मध्ये मारतात चकरा
बीड (रिपोर्टर):- बीड जिल्हा परिषदेच्या अकरा पंचायत समित्यापैकी दहा पंचायत समित्यांना प्रभारी गटशिक्षणाधिकारी आहेत. हे सर्व प्रभारी गट शिक्षणाधिकारी कार्यालयात दोन तास बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या आवारात चार तास चकरा मारतात. गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार यांनी शिक्षण विभागासह सर्वच खातेप्रमुखांची बैठक लावत प्रत्येक आठवड्यात जिल्हा परिषदेच्या किमान चार शाळांची तपासणी करून त्याचा गुणवत्ता आणि शिक्षकांची उपस्थिती याचा अहवाल पाठवण्याचे धोरण निश्‍चित केले होते, मात्र शिक्षण 
विभागानेच ही शालेय गुणवत्ता खुंटीला टांगली की काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
   बीड जिल्हा परिषदेमध्ये अकरा गटशिक्षणाकारी वर्ग २ ची पदे आहेत. त्यापैकी वडवणी येथील गटशिक्षणाधिकारी पद सोडले तर सर्वच ठिकाणी विस्तार अधिकारी यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार आहे. हे सर्व विस्तार अधिकारी आपल्या नेमून दिलेल्या ठिकाणी त्यांच्या सोयीप्रमाणे उपस्थिती लावून बीड जिल्हा परिषदेमध्ये फिरताना दिसतात. काही जण शिक्षण विभागाला अहवाल द्यायचे कारण सांगतात तर काही जण ठरलेल्या शासकीय मिटिंग आहेत, असे सांगतात. आठ तासाच्या ड्युटीपैकी किमान पाच ते सहा तास त्यांचा बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागात आणि इतर ठिकाणीच वेळ जातो. अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक शाळेवर जात नाहीत. काही जण सोबतच्या शिक्षकाला कामाला लावून स्वत: दुसरेच काम करतात, असे प्रकरण जिल्ह्यात खूप मोठे आहेत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण विभाग यांच्या समित्या करून आठवड्यातून किमान जिल्हा परिषदेच्या चार प्राथमिक शाळा तपासून तेथील मुलांची गुणवत्ता आणि शिक्षकांची उपस्थिती याचा अहवाल देण्याचे आदेश काढले होते मात्र याबाबत कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. बदली झालेले विस्तार अधिकारी हिरालाल कराड हे तर बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसून प्रतिनियुक्तीच्या नावाखाली आपले मन कायमस्वरुपी शिक्षण विभागातच रमवतात. मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार यांनी गुणवत्तेबाबत उचललेले पाऊल चांगले असले तरी त्याची अंमलबजावणी होणेही तेवढेच आवश्यक. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review