कुंभार साहेब, जिल्ह्याच्या विकासाला आकार द्या 

eReporter Web Team

कुंभार साहेब, जिल्ह्याच्या विकासाला आकार द्या 

खासदार, आमदार फंडाच्या कामांच्या प्रस्तावावर सह्या करा, गौण खनिजाची लूट करणार्‍यांकडे बघा
बीड (रिपोर्टर):-एकीकडे शासनाच्या गौण खजिन्यावर डल्ला मारणारे वाळू माफियांसह अन्य लोक मजेत असतानाच दुसरीकडे मात्र जिल्ह्याचे विविध विकास कामे ठप्प झाले आहेत. खासदार फंडासह आमदार फंडाच्या पत्रावर केवळ जिल्हाधिकारी सह्या करत नसल्याने अन्य कुठलेही कामे होत नाहीत. सध्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्याकडे प्रभारी जिल्हाधिकारी पदाचा चार्ज आहे. कुंभार साहेब, जिल्ह्याच्या विकासाला आकार देण्यासाठी प्रस्तावित कामांवर सह्या करा, त्याकडे लक्ष द्या अन् शासनाच्या गौण खनिजावर डल्ला मारणार्‍यांना धडा शिकवा, अशी मागणी आता सर्वस्तरातून होत आहे. कुंभार साहेब आम्ही केवळ जिल्ह्याचा विकासाला महत्व देत असून लोकांची कामे होणे नितांत गरजेचे आहे. तुमच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा चार्ज असल्याने तुम्ही जिल्ह्याचे मायबाप आहात. त्यामुळे तुमच्याकडून अपेक्षा मोठ्या आहेत. 

   गेल्या दीड महिन्यापासून प्रभारी जिल्हाधिकारी पदाचा पदभार त्यांच्याकडे आहे. विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी कुंभार हे आयएस अधिकारी असल्यामुळे त्यांच्याकडून विशेष करून जिल्हाधिकारी पदाचा पदभार सोपविला. खा.माजेद मेमन, खा. रामदास आठवले, आ. हुसेन दलवाई यांनी बीड जिल्ह्याला विशेष करून लाखो रुपयांचा स्वत:चा निधी दिलेला आहे. प्रभारी जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतल्यापासून या विकास निधीची फाईल त्यांच्याकडे दोन वेळेस जावून आलेली आहे. राज्यातील वरील लोकप्रतिनिधींसह बीड जिल्ह्यातील खासदार आणि आमदारांचा विकास कामाच्या निधीचे अनेक प्रस्ताव कुंभार यांच्याकडे पेंडिंग आहेत. त्यांच्या कार्यकाळात वाळू माफिया आणि गौण खनिजवाल्यांनी डोके वर काढून मालामाल झालेले आहेत. बीड जिल्ह्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारीच्या दोन पोस्ट आणि उपजिल्हाधिकार्‍यांचे चार पदे रिक्त असल्यामुळे अगोदरच शासकीय कामाला वेग येत नाही. कुंभार हे आयएस अधिकारी असल्यामुळे जिल्ह्याच्या विकास कामात ते भर घालतील आणि प्रमोटेड अधिकार्‍याकडे जिल्हाधिकारी पदाचा पदभार देण्याऐवजी विभागीय अयुक्तांनी दूरदृष्टी ठेवून ज्यांना कायमस्वरुपी जिल्हाधिकार्‍याचा पदभार मिळणार आहे, अशा कुंभार यांना पदभार मिळविण्यापूर्वीच बीड येथे प्रभारी जिल्हाधिकारी पदाचा पदभार देऊन त्यांना काम करण्याची संधी दिली होती. मात्र त्यांनी या संधीचा गैरफायदा घेत बीड जिल्ह्याला बदनाम करण्यासाठीच विकास कामाचे आणि लोकप्रतिनिधींचे हजारो प्रस्ताव पेंडिंग ठेवलेले आहेत. लोकप्रतिनिधींच्या या विकास कामांसोबतच रेल्वेचे कामही अतिशय धिम्या गतीने चालू आहे. जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकासाचे प्रस्तावही राज्य शासनाला गेलेले नाहीत. गौण खनिजच्या निधीतून कोणतेही काम या जिल्हाधिकार्‍यांनी प्रस्तावीत केलेले नाहीत.  दुसरीकडे मात्र अवैध मार्गाने गौण खनिजाची सर्रासपणे लूट केली जाते. याकडे मात्र जिल्हाधिकारी महोदयांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. जिल्हाभरात वाळुचे टेंडर बोटावर मोजण्याइतके असताना जिल्ह्याच्या प्रत्येक महामार्गासह अन्य भागातून सर्रासपणे वाळुचा उपसा केला जातो. याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. इकडे मात्र विकास कामाला कुंभार साहेब आडकाठी घालतात, त्यावर नोटींग लिहितात, कुंभार साहेब, तुम्ही जिल्ह्याचे मायबाप आहात, जिल्ह्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य द्या, लोकांचे कामे अडवू नका, विकास कामे कसे होतील, त्याला तात्काळ मंजुरी द्या आणि जिल्हा कसा विकसित होईल याला आकार द्यायचे बघा. 


अधिक माहिती: beed

Related Posts you may like