ताज्या बातम्या

का पेटली तरुणाई?

का पेटली तरुणाई?
दिल्लीचे जीएनयु विद्यापीठ पुन्हा चर्चेत आले. अंधार्‍या रात्री तोंड बांधून येवून काही गुंडांनी हौदोस घालत विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्याचे पडसाद देशभरात उमटले, हल्लयाच्या निषेधार्थ अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. एवढ्या मोठ्या विद्यापीठात विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला होतो हे कायदा,सुव्यवस्थेसमोर आव्हान आहे. हा हल्ला राजकीय द्वेषातून घडवून आणल्याचा आरोप होत आहे. या आरोपात तथ्य असू शकतं? विचाराची लढाई विचाराने जिंकणे शक्य नसल्यानेच असे भ्याड हल्ले करुन एक प्रकारची दहशत निर्माण केली जात आहे. जामियात ही असाच निंदनीय प्रकार घडला होता. विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडवण्याऐवजी त्यांना जाणीवपुर्वक टार्गेट करणे हे काही चांगले वर्तन नाही, हे भ्याड आणि षंढ वृत्तीचं काम आहे. विद्यार्थी देशाचा आत्मा असतो. देशाची जडण-घडण विद्यार्थ्यांच्या हातात असते. विद्यार्थी चांगले घडले तर देशाचं भवितव्य उज्जवल होत असतं. विद्यार्थ्यांना जाणीव पुर्वक त्रास देणं व त्यांच्यावर नको ते घाणेरडे आरोप करणे म्हणजे आपल्या संकुचीत वृत्तीचं प्रदर्शनचं म्हणायचं. तुकडे-तुकडे गॅग म्हणुन जीएनयुचा उल्लेख केला जातो. जीएनयुमध्ये काही चुकीचं होत असेल तर मग त्यावर केंद्र सरकार का कारवाई करत नाही. केंद्रात सरकार भाजपाचे आहे. दोषी विरोधात कारवाई करायला कुणी रोखलं आहे. कारवाईतून खरं काय आणि खोटं काय हे समोर तरी येईल?
भुमिका घेणारे ट्रोल
भुमिका घेतल्याशिवाय समाजाला कुठल्याही प्रकारचे योगदान देणं आपल्याला अशक्य आहे. ठामपणा आणि अडेलतट्टपणा, किर्ती आणि लोकप्रियता यांच्यात एक पुसट सीमारेषा आहे. भुमिका घेणे म्हणजे एखाद्या मुद्दयाच्या बाजुने किंवा विरोधात आपल्या खर्‍या मतावर ठाम राहणं. जेव्हा-जेव्हा थोर नेत्यांनी भुमिका घेतलेल्या आहेत. तेव्हा-तेव्हा त्यांनी त्यामुळे येणार्‍या वेदनांचाही स्वीकार केलेला आहे. त्या वेदना सहन करण्याची तयारी ही दर्शवली आहे. कधी त्यांचा प्रचंड छळ केला गेला. कधी त्यांना हद्दपार केलं गेलं तर कधी त्यांना तोफेच्या तोंडी देण्यात आलं, परंतु समाज हिताच्या कुठल्याच मुद्दयावर तडजोड केली नाही.तुम्ही किती वर्ष जगलात हे महत्वाचं नाही, तुम्ही कोणती तत्वे अंगीकारली हे महत्वाचे आहे. आज ही ठामपणे भुमिका घेणारे बहुतांश आहेत. त्यात पत्रकार, कलाकार, साहित्यीक, राजकारणी इत्यादींचा समावेश आहे. भुमिका घेणारांना ट्रोल करण्याचा ट्रेड मोठ्या प्रमाणात पुढे आला आहे. याला खतपाणी घालण्याचं काम केंद्रातील सत्ताधारी भाजपा करु लागला. पेड असलेले आणि स्वत:ला भक्त म्हणुन घेणारे सोशल मीडीयाच्या माध्यमातून भुमिका घेणार्‍यांच्या विरोधात अक्षरशा विष ओकत असतात. अशा पध्दतीचं विष ओकणं ही आराजकतेची नांदी म्हणावी लागले.
काय हे संस्कार?
जीएनयुच्या हल्याबाबत अनेकांनी चिंता व्यक्त केली. तशीच चिंता सिनेअभिनेते व काही अभिनेत्रींनी केली आहे. हा विषय चिंता व्यक्त करण्यासारखाच आहे. समाजात घडणार्‍या वाईट घटनाबाबत ज्यांना अस्वस्थ वाटत नसेल तर तो माणुस कसला? अभिनेत्री दिपीका पदुकोन हीने जीएनयुमध्ये जाऊन तेथील परस्थितीची पाहणी केली. त्यात वाईट काय आहे? दीपिका जीएनयुमध्ये गेल्याने जातीयवाद्यांचे टाळके हालले. तिला सोशल मीडीयावर प्रचंड प्रमाणात कोसले जावू लागले. काहींनी अगदी खालच्या पातळीवर जावून तिच्या बद्दल लिहलं गेलं. एका महिलेचा कसा अनादर केला जातो याचं हे जिवंत उदाहरण आहे. एका भाजपाच्या आमदाराने तर तिला ’नाचणेवाली’ असे म्हटलं. या आमदाराच्या बुध्दीची आणि विचाराची कीव करावी तितकी कमीच आहे. हे महाशय आमदार कसे झाले हेच कळच नाही. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या कुठल्या क्षेत्रातून राजकारणात आल्या? स्मृती इराणी यांना कुठलाही राजकीय अनुभव किंवा त्यांच्याकडे शिक्षणाची डिग्री नसतांना त्यांची २०१४ साली देशाच्या शिक्षण मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती, त्यांना एवढी मोठी जबाबदारी देणं हे कुठल्या विचारात बसत होतं? आज त्याच स्मृती इराणी आपल्या विरोधकांना थेट देशद्रोहीच्या पंक्तीत बसवून मोकळ्या होतात. त्यांची ही कृती विचाराला आणि संविधानीक पदाला शोभणारी आहे का?
वादाला सुरवात
२०१४ साली भाजपाचे सरकार केंद्रात सत्तेत आल्यानंतर भाजपावाल्यांनी खुनसी आणि अविचाराच्या राजकारणाला सुरुवात केली. जीएनयु हे विद्यापीठ डाव्या विचारांचे म्हणुन ओळखले जाते. या विद्यापीठात हास्तक्षेप करुन विद्यापीठात नको ते राजकारण करण्यात आले. कन्हेैय्याकुमार हा विद्यार्थी नेता याच विद्यापीठातील होता. त्याला झालेल्या मारहाणीमुळे तो चर्चेत आला. त्यानंतर डावे आणि उजवे समोरा समोर येवून वादाला जास्तच तोंड फुटत गेले. ह्या लढाया अगदी शिक्षणक्षेत्रात गेल्या. भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व भाजपावाले जीएनयु बाबत नेहमीच नकारार्थी आणि आकस बुध्दी ठेवत आले. भाजपाचे काही नेते तर जीएनयु व जामिया विद्यापीठाला दहशतवादाचा अड्डाच म्हणतात. असं बोलल्यावर तेथील शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या मनावर बोलणार्‍यांच्या विरोधात संंताप व्यक्त होणार नाही का? जीएनयुमध्ये देशभरातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात. हजारो विद्यार्थी येथूनच घडलेले आहेत. आता नुकत्याच झालेल्या हल्याच्या अनुषंगाने भाजपाचे नेते व मंत्री जिभेला हाड नसल्यासारखं वक्तव्य करुन आपलचं हासं करुन घेवू लागले,वाचाळवीर असलेले सुब्रम्हण्यम स्वामी यांनी तर हे विद्यापीठच बंद करा अशी मागणी केली. अशा विचार श्रेणीचे नेते राजकारणात असल्यावर कसा विकासाचा झेंडा लागायचा? स्वामी सारखे नेते नेहमीच आग लावू वक्तव्य करुन वातावरण पेटवण्याचा प्रयत्न करतात. अशा नेत्यांना समाज हिताचं काही देणं घेणं नसतं. पक्ष ही अशांवर कुठलीही कारवाई करत नाही, म्हणजे पक्षांनीच ह्यांच्या जीभा मोकळ्या सोडलेल्या आहेत. हे सिध्द होतं.
साहित्यीकाकडून दखल
९३ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे पार पडले. संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आपल्या भाषणात समाजात घडणार्‍या घटना विषयी चिंता व्यक्त करत आपले परखड मत मांडले. विद्यार्थ्यांची डोके फुटत असतांना गप्प कसे बसायचं असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. सध्याचं वातावरण किती दुषीत आहे हे त्यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे. गायीवरुन लोकांचा बळी घेणं हे कितपत योग्य आहे? समाजातील काही अपप्रवृत्ती कशा पध्तीने जातीयतेला खतपाणी घालून समाज दुभंगण्याचे काम करत आहे असं त्यांनी म्हटले आहे. फादर दिब्रिटो यांना ही जातीय राजकारणाचा त्रास झालेला आहे. त्यांच्या निवडी बाबत अनेकांच्या पोटात गोळे आले होते. त्यांना थेट धमक्या देण्या पर्यंत मजल काहींची गेली होती. त्यामुळे दिब्रीटो यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त करुन दडपशाहीच्या राजकारणावर टिका केली आहे. कधी नव्हे ते साहित्य संमेलनाला सुरक्षेचं कवच उभा करावे लागत आहे. याला कारण आजची बिघडत असलेली परस्थिीत आहे. साहित्यांतुन माणुस घडत असतो. साहित्यकांनी समाजात घडणार्‍या घटनाची दखल घेवून व्यक्त व्हायला हवे, साहित्यीकांना झुंडशीचा त्रास सहन करावा लागत आहे. जातीय झुंडी व्यक्त होणार्‍या साहित्यीकांवर बेछुट आरोप करुन आपल्या आकलेचे दिवे पाजळत असतात. आज साहित्यीक गप्प बसले तर येणारा काळ धोक्याचा ठरु शकतो.
चळवळी आणि युवक
जगात आणि देशात आज पर्यंत ज्या काही चळवळी झाल्या, त्या फक्त आणि फक्त युवकांनीच केल्या आहेत. मग त्या चळवळी सामाजीक असो किंवा राजकीय असो, युवकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. देशातील युवकांच्या हाती काम देण्याचे आश्‍वासन केंद्रातील भाजपा सरकारने दिले होते. युवकांच्या हाती काम नाही पण त्यांच्यावर विविध शिक्के मात्र मारले जात आहेत. जाणीवपुर्वक कुणी त्रास देण्याचे काम करत असेल तर त्याला विरोध व्हायलाच हवा, आज विरोध केला नाही तर भविष्यात युवकांचे जगणे मुश्किल होेईल. विरोध संविधानीक मार्गानेच व्हायला हवा. जीएनयु, जामिया या विद्यापीठात घडलेल्या घटनानंतर देशातील विद्यार्थी, युवक संतप्त झाला. युवक दडपशाहीच्या व हुकूमशाहीच्या विरोधात रस्त्यावर आले, विनाकारण रस्त्यावर येवून कुणाला आंदोलन करण्याची थोडीच होैस आहे. सत्ताधार्‍यांनी राजकारण हे राजकारणापुरत मर्यादीत ठेवलं पाहिजे. नको त्या ठिकाणी राजकारण केले जात असल्याने त्याचे पडसद उमटू लागले. आज पर्यंत आपला इतिहास बघितला तर ज्या-ज्या सत्ताधार्‍यांनी चुकीचे पाऊल टाकले त्यांना युवकांनी विरोधच केलेला आहे. इंदिरा गांधी यांच्या विरोधातही देशातील हजारो युवक रस्त्यावर उतरले होते, याची आठवण ठेवायाला हवी. युवक एक शक्ती आहे. या शक्तीने भल्या-भल्यांचे सत्तातर उलथून टाकलेले आहेत. त्या शक्तीशी खेळणं म्हणजे आगीशी खेळणं आहे. युवकांच्या हाताला काम देवून त्यांचा देश हितासाठी वापर होईल असंच राजकारण करायला हवं.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review

<

Related Posts you may like

Ad

व्हिडिओ बातमी

व्हिडिओ बातमी:-REPORTER CHASHAK BEED, ADFC VS SRK

रिपोर्टर कौल