ताज्या बातम्या

बीड जिल्ह्याला उडीद आणि मूग पिकांना विमा मंजूर मदतीपोटी आले  ५५ कोटी 

बीड जिल्ह्याला उडीद आणि मूग पिकांना विमा मंजूर
मदतीपोटी आले 
५५ कोटी 
बीड (रिपोर्टर):- गेल्या वर्षी ओरिएन्टल इन्शूरन्स कंपनीच्या गोंधळानंतर या वर्षी राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने राज्यासाठी ऍग्रीकल्चरल इन्शूरन्स लिमिटेड या कंपनीला खरीप हंगामाच्या इन्शूरन्सचे टेंडर दिले होते. त्यानुसार सन २०१९ आणि २०२० या खरीप हंगामामध्ये नुकसान झालेल्या उडीद आणि मूग या कडधान्य पिकांना विमा मंजूर करण्यात आला असून यासाठी बीड जिल्ह्याला ५५ कोटी रुपये आलेले आहेत. त्यामुळे या वर्षीच्या खरीप हंगामात या कडधान्य उत्पादक शेतकर्‍यांचे झालेले नुकसान थोड्या प्रमाणात का होईना भरून निघणार आहे. 
   या वर्षी अवकाळी पाऊस लांबल्याने जवळपास कडधान्यासोबत बाजरी, तूर आणि कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. शेतकरी मेटाकुटीला आला होता. राज्य सरकारसोबत केंद्र सरकारनेही या नुकसान झालेल्या पिकांच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक पाठवले होते. केंद्र आणि राज्य सरकारने तुटपुंजी मदत करत शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली होती. त्यामुळे शेतकर्‍यांची नुकसान भरपाई भरून निघण्यासाठी विमा कंपनीकडे डोळे लागले होते. मात्र कृषी विभागाच्या गलथान कारभारामुळे बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील कृषी नुकसानीचा अहवाल अगोदर फक्त तीनच तालुक्यात गेला होता. मात्र लोकप्रतिनिधी आणि शेतकर्‍यांनी याबाबत आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर उशीरा का होईना बीड जिल्ह्यातील अकराही तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचा अहवाल विमा कंपनी आणि कृषी आयुक्तांना पाठविण्यात आला होता. या अहवालाची दखल घेत गेल्या दोन दिवसापूर्ंवी ऍग्रीकल्चरल इन्शूरन्स कंपनी लिमिटेड यांनी जिल्ह्यातील उडीद आणि मूग उत्पादक शेतकर्‍यांना विमा मंजूर केला आहे. या विम्यापोटी बीड जिल्ह्याला ५५ कोटी रुपये विमा कंपनीने मंजूर केले आहेत. कालपासून उडीद आणि मूग या पिकांचा ज्यांनी विमा भरला त्या शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुुरुवात झाली आहे. विमा कंपनीने या पिकांसाठी मंडलनिहाय वेगवेगळा विमा मंजूर केला असून कमीत कमी हेक्टरी ३ हजार ते ९ हजार रुपये विमा कवच मंजूर केलेला आहे. या विम्यामुळे थोड्या प्रमाणात का होईना शेतकर्‍यांचे नुकसान भरवण्यास मदत होणार आहे. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review

<

Related Posts you may like

Ad

व्हिडिओ बातमी

व्हिडिओ बातमी:-REPORTER CHASHAK BEED, ADFC VS SRK

रिपोर्टर कौल