ताज्या बातम्या

देशातल्या पहिल्या वृक्ष संमेलनाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद राज्यातील अनेक जिल्ह्यातले विद्यार्थी देवराईत डेरेदाखल, मी वड बोलतोय, म्हणत अभिनेते सयाजी शिंदेंनी केलं अध्यक्षीय भाषण, वृक्ष सुंदरी स्पर्धेत शेकडो मुलींचा सहभाग 

देशातल्या पहिल्या वृक्ष संमेलनाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
राज्यातील अनेक जिल्ह्यातले विद्यार्थी देवराईत डेरेदाखल, मी वड बोलतोय, म्हणत अभिनेते सयाजी शिंदेंनी केलं अध्यक्षीय भाषण, वृक्ष सुंदरी स्पर्धेत शेकडो मुलींचा सहभाग 
बीड (रिपोर्टर):- देशातील पहिल्या वृक्ष संमेलनाचे उद्घाटन आज पालवण नजीकच्या देवराई येथे झाले. या वेळी या संमेलनाचे अध्यक्ष असलेल्या वडाच्या झाडाच्या माध्यमातून दस्तुरखुद्द अभिनेते सयाजी शिंदे यांनी ‘मी वड बोलतोय,’ म्हणत आजच्या पर्यावरणाची माहिती सांगत भविष्याचे धोके ओळखा म्हणत वृक्षारोपणासह वृक्षांचे संगोपन करण्याचे आवाहन केले. मी ही चळवळ गेल्या अनेक दिवसांपासून उभी केली असून जे माझ्या सोबत येतील त्यांच्या सोबत मी ही चळवळ पुढे नेणार असल्याचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी या वेळी सांगितले. 
  या कार्यक्रमाला अभिनेते सयाजी शिंदे, लेखक अरविंद जगताप, आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सीईओ अजित कुंभार, अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे, वन अधिकारी सातपुते, तेलंग, माजी आ. उषाताई दराडे, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. 
   देशातले पहिले वृक्षसंमेलन पालवणनजीकच्या देवराईमध्ये होत असून काल वृक्ष दिंडीने सुरुवात झालेल्या वृक्ष संमेलनाचे आज मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. या वेळी जिल्ह्यासह राज्यभरातून अनेक शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेकडो एकरच्या माळरान डोंगरावर लाखो झाडांची लागवड आणि संगोपन गेल्या काही दिवसांपासून केली जात आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वडाचे झाड असून उद्घाटन झाल्यानंतर अध्यक्षीय भाषणात अभिनेते सयाजी शिंदे यांनी ‘मी वड बोलतोय, म्हणत अध्यक्षीय भाषणाला सुरुवात केली. माझा म्हणजेच वडाचा जन्म 1857 चा असून माझ्या आजोबाचा जन्म त्यापूर्वीचा आहे. वडाचे झाड हे सर्वात जुने झाड असून वनस्पतीमध्ये सर्वात जास्त ऑक्सीजन देणारे वडाचे झाड आहे. जेव्हा जीव गुदमरतो तेव्हा ऑक्सीजनची किंमत कळते. वडाचे झाड हे सर्वात श्रीमंत झाड असल्याचे सांगून सयाजी शिंदे यांनी पर्यावरणाचे धोके ओळखा, आपलं गाव, शहर , राज्य आणि देश हिरवेगार करण्यासाठी झाडे लावा आणि ते जगवा असे आवाहन करत मी ही चळवळ गेल्या अनेक वर्षांपासून उभी केली आणि राबवत आहे. जे लोक माझ्या सोबत येतील त्यांच्या सोबत मी या चळवळीत कायम राहील आणि जास्तीत जास्त जंगल कसे उभे राहतील यासाठी मी प्रयत्न करील, असे सयाजी शिंदेंनी म्हटले. या वेळी आ. संदीप क्षीरसागर म्हणाले की, बीड जिल्ह्यासाठी आजचा क्षण हा मौल्यवान आहे. चांगल्या कामाची सुरुवात बीड येथून होत आहे. यापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे आणि प्रत्येकाने झाडे लावण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन या वेळी त्यांनी केले. तर अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे म्हणाले, तापमानात वेगाने बदल होत आहे त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडू लागलाय, हा समतोल बिघडू द्यायचा नसेल तर झाडे हाच एकमेव पर्याय आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी म्हटले की, साधू-संतांनी यापूर्वी झाडांचे महत्व आपल्याला सांगितलेले आहे, त्यामुळे त्यातून आपण प्रेरणा घेण्याची गरज आहे. सीईओ अजित कुंभार यांनी सांगितले की, माणसाचे आयुष्य हे पुर्णत: निसर्गावर अवलंबून आहे, निसर्गाला कोणी चॅलेंज करू शकत नाही. निसर्ग वाचवण्यासाठी झाडे लावण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले. या संमेलनाला बीड जिल्ह्यासह राज्यातील वृक्ष प्रेमी, विद्यार्थी, नागरिक व वृक्षप्रेमी नागरिक उपस्थित होते. येथील वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी कुटे ग्रुपच्या वतीने 5 लाख रुपयांची मदत घोषीत करण्यात आली आहे. 

अधिक माहिती: online beed reporter

Best Reader's Review

<

Related Posts you may like

Ad

व्हिडिओ बातमी

व्हिडिओ बातमी:-REPORTER CHASHAK BEED, ADFC VS SRK

रिपोर्टर कौल