इंदुरीकरांचं पत्रक, आंदोलन, मोर्चे नको इंदुरीकर समर्थकांची ‘चलो नगर’ सुरू होती मोहीम

eReporter Web Team

इंदुरीकरांचं पत्रक, आंदोलन, मोर्चे नको
इंदुरीकर समर्थकांची ‘चलो नगर’ सुरू होती मोहीम

संगमनेर (रिपोर्टर):- मुलगा-मुलगीच्या जन्माबाबत वक्तव्य केल्यामुळं वादात अडकलेले लोकप्रिय कीर्तकार निवृत्तीमहाराज इंदुरीकर यांच्या समर्थनार्थही आता लोक पुढं येऊ लागले आहेत. त्यांच्यासाठी आंदोलनं करण्याची चाहत्यांची तयारी सुरू आहे. मात्र, खुद्द इंदुरीकर महाराजांनी चाहत्यांना त्यापासून रोखलं आहे. आपल्यासाठी कुणीही मोर्चे, आंदोलनं करू नये, असं आवाहन त्यांनी पत्रकाद्वारे केलं आहे.

सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य इंदुरीकरांनी एका कीर्तनात केलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाला असून त्यांच्यावर चहूकडून चौफेर टीका होत आहे. इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळं वैतागलेल्या इंदुरीकरांनी नुकतेच कीर्तन सोडून शेती करण्याचे संकेत दिले. त्यांच्या या पवित्र्यामुळं चाहत्यांमध्ये नाराजी पसरली असून इंदुरीकरांच्या समर्थनाची मोहीमच सुरू झाली आहे. त्यासाठी ’चलो नगर’ अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.   
इंदुरीकर महाराजांनी तात्काळ याची दखल घेत पत्रक काढलं आहे. ’आपण कोणीही, कुठेही मोर्चा, रॅली, एकत्र जमणे, निवेदन देण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन त्यांनी समर्थकांना केलंय. ’चलो नगर’ म्हणून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे. आपण सगळी माझ्यावर प्रेम करणारी भक्त मंडळी आहात. वारकरी संप्रदाय शांतताप्रिय आहे. त्यामुळं आपण कोणीही, कुठेही मोर्चा, रॅली, एकत्र जमणे, निवेदन देणे असे काहीही करण्याचा प्रयत्न करू नये. अशामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आपण आपली बाजू कायदेशीररित्या शांततेच्या मार्गाने मांडणार आहेत. 
एका चुकीमुळं इंदुरीकर वाईट ठरत नाहीत -चंद्रकांत पाटील
प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर  यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात नवा वाद उफाळून आला आहे. मागील दोन तीन दिवसांपासून या वक्तव्यावरून वेगवेगळे मतं मांडली जात आहे. राजकीय नेत्यांसह अनेकांनी इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याचा निषेध केला. तर अनेकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. या सगळ्या वादविवाद भाजपानंही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केला होता. ओझर येथे झालेल्या किर्तनात सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते  असं इंदुरीकर महाराजांनी म्हणाले होते. इंदुरीकर महाराज यांनी केलेलं वक्तव्य हे गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात आहे. हे वक्तव्य म्हणजे गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार कलम २२ चे उल्लंघन असल्याचा आरोप या समितीच्या सदस्यांनी केला होता. या आरोपानंतर महाराष्ट्रात वाद निर्माण झाला.


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like