अवैध वाळू वाहतूक करणार्‍या हायवासह तीन ट्रॅक्टर जप्त स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाची कारवाई

eReporter Web Team

अवैध वाळू वाहतूक करणार्‍या हायवासह तीन ट्रॅक्टर जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाची कारवाई
बीड (रिपोर्टर):- बीडमध्ये वाळुचे कंत्राट नसतानाही अवैध वाळू उपसा व वाहतूक केली जात आहे. ही वाळू उपसा व वाहतूक बंद करण्यासाठी पोलिसांकडून कडक कारवाई केली जाते, मात्र तरीही चोरीचुपके वाळू उपसा आणि वाहतूक सुरूच आहे. यावर काल स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक प्रमुख एपीआय आनंद कांगुणे यांनी धाड टाकून यामध्ये एका हायवासह तीन ट्रक ताब्यात घेतले आहेत. सदरील कारवाई गेवराई पोलिस ठाणे हद्दीत करण्यात आली. 
   स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला अवैध वाळू वाहतूक व उपसा गेवराई पोलिस ठाण्याच्या हद्दीत होत असल्याची माहिती मिळताच त्यांनी 25 फेब्रुवारी रोजी 10 च्या सुमारास तरटेवाडी (ता.बीड) सिंदफणा (डोमरी) नदी पात्रात धाड टाकली असता या वेळी विनापरवाना भरत असताना ट्रक व चालक यांना ताब्यात घेतले. यामध्ये जनार्धन विनायक काळे (वय 42) यांच्या ताब्यातून ट्रॅक्टर (क्र. एम.एच. 23 बी. 9376) व ट्रॉली (क्र. एम.एच. 23 क्यू. 5297) यामध्ये अंदाजे एक ब्रास वाळू दुसरा आरोपी आनंद सुदाम पवळ (वय 23 ) याच्या ताब्यातून ट्रॅक्टर (विना नंबरचा) यातही एक ब्रास वाळू, तिसरा विजय रमेश रडे याच्या ताब्यातील ट्रॅक्टर (क्र. एम.एच. 23 ए.जी. 0717) व नंबर नसलेली ट्रॉली जप्त करण्यात आली. यांना गेवराई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर 26 फेब्रुवारी रोजी खाजा कॉम्प्लेक्स येथे सात वाजता एक अवैध वाहतूक करणारा टिप्पर (एम.एच. 23 ए.यू. 1727) हा मिनी बायपास येथून बीडकडे जात असताना ताब्यात घेण्यात आला. या वेळी टिप्पर चालकाकडे कुठलेही कागदपत्र आढळून आले नाही. चालक चंद्रहार रावसाहेब जामकर (वय 39) याच्यासह सहा ब्रास वाळू असलेला हायवा टिप्पर ताब्यात घेऊन तो बीड शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. सदरील कारवाई पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत, पथक प्रमुख सपोनि. आनंद कांगुणे, पो.ना. गर्जे, पवार, काळे, चालक गर्जे यांनी केली. 


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like