कोरोनाच्या महामारीत भाजपाच्या तोंडाला काळ्या पट्ट्या

eReporter Web Team

पंकजा मुंडेंच्या परळीत सरकारविरोधात आंदोलन नाही 
बीड, आष्टी, गेवराई, अंबाजोगाई, केजमध्ये भाजप कार्यकर्त्यांसह पदाधिकार्‍यांनी केला ठाकरे सरकारचा निषेध
बीड, आष्टी, गेवराई, परळी, अंबाजोगाई (रिपोर्टर)- कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यामध्ये राज्य शासनाला अपयश आल्याचा ठपका ठेवत भाजपाने राज्यभरात काळ्या फिती लावून आंदोलन केले असून या आंदोलनात बीड भाजपाने सहभाग नोंदवला. आष्टी, गेवराई, बीड, अंबाजोगाई, केज तालुक्यात भाजपा कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले मात्र राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री तथा भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीत आंदोलन झालं नाही. 
कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यामध्ये राज्यातल्या ठाकरे सरकारला अपयश आल्याचा ठपका भाजपाने ठेवून ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन आंगण हेच रणांगण’ हे आंदोलन राज्यभरात केलं. या आंदोलनामध्ये बीड जिल्हा भाजपाने सहभाग नोंदवला. बीडमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयासमोर दहा-पाच कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावत आणि हातात बोर्ड घेत सरकारविरोधात घोषणाबाजी केली तर तिकडे आष्टीमध्ये आ. सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. आ. धसांनी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. तर माजी आ. भीमराव धोंडेंनी आपल्या निवासस्थाना समोर काळ्या फिती लावून आंदोलन केले. इकडे गेवराईमध्येही आ. लक्ष्मण पवार यांनी घोषणाबाजी करत काळ्या फिती लावून सरकारचा निषेध नोंदवला. केजमध्ये भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. अंबाजोगाईत भाजपाकडून सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. जिल्ह्यात भाजपाचे कार्यकर्ते आंदोलन करत असताना राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री तथा भाजप नेत्या पंकजा मुंहे यांच्या परळीत मात्र भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं नसल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले. 
भाजपाच्या आंदोलनाला सर्वसामान्यांची टीका 
देशासह महाराष्ट्र कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भावासोबत लढा देत असताना या अदृश्य शत्रू सोबत लढा देण्यासाठी शासन-प्रशासन व्यवस्थेसह जनतेच्या खांद्याला खांदा लावून लढण्यापेक्षा महाराष्ट्र भाजपाने ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन आंगण हेच रणांगण’ करून तोंडाला काळ्या पट्ट्या लावल्या. भाजपाच्या या आंदोलनाबाबत सर्वसामान्यांनी मात्र नाराजी व्यक्त करत भाजपाच्या वृत्तीवर टीकेचा आसूड ओढला.

मातीशी इमान न राखणारे महाराष्ट्र 
द्रोही भाजप -ना. धनंजय मुंडे

एकीकडे अखंड महाराष्ट्र कोरोनासारख्या अदृश्य शक्तीश लढा देत असताना दुसरीकडे मात्र भाजपाने आज आंदोलन सुरू केलं. यावर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनी ट्विटद्वारे जहरी टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाला मोठ्या धिराने सामोरे जात असताना मातीश्री इमान न राखणारे काही जण आंदोलन करत आहेत. राज्य कोरोनामुक्त करण्यासाठी आपले प्राणपणाला लावणार्‍या सर्वांचाच हा अपमान आहे. मातीश्री केलेली गद्दारी महाराष्ट्र कधी विसरणार नाही, असं म्हणत ‘ञ्च्महाराष्ट्रद्रोही बीजेपी’ अशी पोस्ट ना. धनंजय मुंडेंनी केली. 

केजमध्ये समर्थनार्थ शिवसेनेचे झेंडा हाती घेवून आंदोलन
भाजपाने राज्य शासनाच्या निषेधार्थ आंदोलन केले तर दुसरीकडे केज येथे शिवसेनेच्या तालुकाप्रमुखाने समर्थनार्थ आंदोलन केले. रत्नाकर शिंदे यांनी आपल्या घरीच झेंडा हाती घेवून राज्य सरकारला समर्थन दिले. 
राज्य सरकार कोरोना रोखण्यात अपयशी -आ.धस
महागोतावळा विकास आघाडीचं हे सरकार कोरोनासारखी महामारी रोखण्यात सपशेल अपयशी ठरलं आहे. राज्याच्या चीफ सेक्रेटरी पासून तहसीलदारापर्यंत यांच्यात कोणाचे कोणाला ताळमेळ नाही. राज्यात अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीने अत्यंत योग्य पद्धतीने हे आंदोलन पुकारला आहे. शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार, सर्व घटक, बारा बलुतेदार या सर्वांना आर्थिक मदतीची गरज आहे. या बाबतीत सरकारने काही तरी करणं गरजेचं आहे मात्र हे सरकार सपशेल अपयशी ठरलं असल्याने मी या सरकारचा धिक्कार करतो, असं आ. सुरेश धस यांनी म्हटलं. 


अधिक माहिती: beed online reporter

Related Posts you may like