अगदी मनावर दगड ठेवून साहेबांचे दर्शन  ३ जूनला घेऊ शकत नाही -पंकजा मुंडे 

eReporter Web Team


बीड (रिपोर्टर)- भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ३ जून स्मृती दिनी गोपीनाथ गडावर दरवर्षी मोठे कार्यक्रम होत असतात. लाखो अनुयायी याठिकाणी येत असतात. परंतु यावर्षी कोरोनाचं संकट आणि संचारबंदी यामुळे गोपीनाथ गडावर कोणीही येऊ नये. स्व. मुंडेंची पुण्यतिथी घरी साजरी करावी, असे आवाहन यापूर्वी पंकजा मुंडे यांनी केले होते. आज दस्तुरखुद्द पंकजा मुंडेंनी ३ जून रोजी गोपीनाथ गडावर येणार नसल्याचे त्यांनी फेसबुक पोस्ट करून सांगितले असून अगदी मनावर दगड ठेवून साहेबांचे दर्शन ३ जूनला घेऊ शकत नाही, अशा आशयाचे भावनिक पोस्ट पंकजा मुंडेंनी केले आहे. 
   बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची ३ जूनला पुण्यतिथी आहे. या निमित्ताने गोपीनाथ गडावर दरवर्षी मोठे कार्यक्रम होत असतात. महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राबाहेरून मोठठ्या संख्येने मुंडे साहेबांचे अनुयायी समाधी दर्शनासाठी उपस्थित राहतात मात्र यावर्षी स्व. मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजीत सर्व कार्यक्रम यापूर्वीच रद्द करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि संचारबंदी या कारणामुळे राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे ३ जूनला गोपीनाथ गडावर उपस्थित राहणार नाहीत. आज पंकजा मुंडे यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती आपल्या समर्थकांना दिली. लोकांच्या आरोग्यासाठी आणि प्रशासनाच्या सूचनेवर आपण येत नसल्याचे सांगून अगदी मनावर दगड ठेवून साहेबांचे दर्शन ३ जूनला घेऊ शकत नसल्याचे पंकजा मुंडेंनी म्हटले आहे. ३ तारखेला आपल्या घरीच पुण्यस्मरण करावे, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी या पोस्टमध्ये केले आहे. 

अपडेटसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like