पांढर्‍या पाण्याच्या नदीचा शोध

eReporter Web Team

पांढर्‍या पाण्याच्या नदीचा शोध
ग्राऊंड रिपोर्टींग-शेख रिजवान
प्रदुषण नियंत्रण कार्यालय औरंगाबादला असल्याने नदीचे पात्र दुर्लक्षीत
नदी शेजारी औषधाच्या रिकाम्या बाटल्याचे ढिग; रिकाम्या इंजेक्शनच्या बाटल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आल्या कोठून?
त्या इंजेक्शन बाटल्यावरील बॅच नंबरवरून या रिकाम्या बाटल्याचे डिटेल्स काढणे शक्य
एकंदरीत नदीच्या पात्रात प्रदुषणाचे महापुर; महाराष्ट्र प्रदुषण कंट्रोल बोर्ड यांनी लक्ष देण्याची गरज 
नदीत सोडलेल्या पांढर्‍या पाण्याची तपासणी रिपोर्टरचे प्रतिनिधी पंचा समक्ष ते पाणी घेवून त्या पाण्याची प्रयोग शाळेत तपासणी करणार 
गटारीचे पाणी नदीत सोडण्यासाठी अर्धा किलोमीटरची भुयारी गटार; शहरातील गटारीच्या पाण्याने वाहते बिंदूसरा नदी
नदीतील पाण्यात प्रदुषणाची गटार, नदीतील पांढर्‍या पाण्याचे रहस्य तीन तास नदीच्या पात्रात फिरून रिपोर्टरने शोधलेनदीत गटारी व दुषित पाण्याचे 
डबके, मच्छर व दुर्गंधीने नदीकाठचे नागरीक व ग्रामस्थ त्रस्त
नियमाने कोणतीही कंपनी किंवा खासगी व्यावसायिक यांनी नदीत पाणी सोडतांना त्या 
पाण्यावर प्रक्रिया करून किंवा केमिकल मुक्त करूनच परवानगी घेवून नदीत सोडणे गरजेचे
ज्या कंपन्या, दुध ड4ेअरी नदीत पाणी सोडतात त्या पाण्यावर कंपन्यांनी प्रक्रिया करून पाणी 
सोडले का? म्हणून या पाण्याची रासायनिक तपासणी करण्याची गरज
तलावातून,नदीतून पाण्याचा उपसा होतोय, या पाण्याचा अनाधिकृत वापर होवू नये म्हणून प्रशासन नजर ठेवून असते परंतू पाणी चोरी सुरूच असते. त्या पलीकडे जावून पाणी चोरी करण्याऐवजी पाणी नदीत सोडणे हा पण एक प्रकार आहे याकडे कोणाचेही लक्ष नसते. पाणी चोरी समजून येते परंतू नदीत पाणी सोडलेले दिसून येत नाही. दिसले तरी सर्व सामान्य नागरीकांनी नदीत सोडलेल्या पाण्याशी काही देणे-घेणे नसते. म्हणूनच नदीत नेमके सोडलेले पाणी शुद्ध आहे का अशुद्ध याची प्रशासन कधी पाहणी करतांनाही दिसत नाही. नदीत पाणी सोडणारे बिनधास्तपणे नदी पाणी सोडतात. परंतू ते पाणी गल्ली ते दिल्लीपर्यंत पोहचते याचीही जाणीव असली पाहिजे. एकीकडे नदीचे पात्र स्वच्छा करण्यासाठी प्रशासन लाखो रूपये खर्च करते. परंतू नदीत येणारे पाणी हे शुद्ध आहे की अशुद्ध याची सहनिशा मात्र कोणीही करत नाही. सध्या पावसाळा सुरू झाला असला तरी कोणत्याही नदीला पुर येण्या एवढे पाणी आलेले नाही. आजही नदीत शहरातून किंवा एखाद्या कंपनी व दुध डेअरीतून आलेल्या पाण्याने नदीतील डबके तुुडुंब भरलेले आहे. नदीच्या पाण्यात सध्या प्रदुषणाची गटार वाहतांनी दिसते. यात विशेष म्हणजे प्रदुषण कंट्रोल करणारे कार्यालय औरंगाबाद येथे आहे. त्यामुळे नदीत येणारे पाणी याची कोणीही तक्रार करत नाही. तसेच स्वच्छता पर्यावरण व प्रदुषण हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. या दृष्टीकोनातून आणि वाढती लोकसंख्या म्हणून प्रत्येक जिल्ह्यात प्रदुषण कार्यालय असणे गरजेचे झाले आहे. दै.रिपोर्टरच्या प्रतिनिधीने नदीच्या पात्रात सोडण्यात येणारे पाणी नेमके कोठुन येते? या संदर्भात माहिती काढण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर चक्क एका पांढर्‍या नदीचा शोध लागला. या पांढर्‍या नदीचे रहस्य रिपोर्टरच्या प्रतिनिधीने तीन तास नदीच्या पात्रात फिरून शोधून काढले. नदीत येणारे पाणी अशुद्ध आहे असे नाही कारण की नियमाने नदीत पाणी सोडता येते परंतू यात संबंधित कंपनी, दुध डेअरी किंवा शहरातील गटारी यांनी हे पाणी नदीत सोडण्यापुर्वी त्या पाण्यावर प्रक्रिया करावी जेणे करून हे केमिकल मुक्त आहे याची सहनिशा करूनच व प्रदुषण मंडळाकडून परवानगी घेवूनच सोडता येते. परंतू हे पाणी सोडणार्‍यांनी पाणी सोडण्याची परवानगी घेतली का? जर घेतली असेल तर जे पाणी नदीत सोडले जाते त्या पाण्यावर प्रक्रिया केलेली आहे का? याची मात्र प्रदुषण कंट्रोल विभाग कधी पाहणी करतांना दिसून आले नाही. 
सध्या बिंदूसरा पात्र व इतर छोट्या-मोठ्या नद्यात बर्‍याच प्रमाणात डबके भरून असल्याचे दिसून येते. या डबक्यात अत्यंत दुर्गंधीयुक्त व मच्छराने भरलेले असल्याने त्या परिसरातील नागरीकांना व ग्रामस्थांना या डबक्यापासून विविध आजाराचा धोकाही निर्माण झालेला आहे. स्वच्छता हा महत्त्वाचा विषय असला तरी नगर पालिका किंवा ग्राम पंचायत दिसलेला कचरा उचलून घेवून जातात. परंतू मच्छर पैदा करणार्‍या या डबक्याकडे मात्र कोणीही लक्ष देतांना दिसून येत नाही. त्या दृष्टीकोनातून दै.रिपोर्टरने केलेली ही रिपोर्टींग अत्यंत महत्त्वाची असून या शोधात बीडपासून काही अंतरावरच असलेल्या जाधववस्तीजवळील नदीत पांढरे पाणी आढळून आले. नेमके हे पाणी कोठुन येत आहे? याचा शोध घेण्यासाठी तब्बल तीन तास प्रयत्न केले. त्यातून अशी माहिती भेटली की, नदीच्या पाठीमागच्या बाजुला किमान अर्धा किलोमीटर अंतरावर एका दुध डेअरीतून ही भुयारी गटार करून नदीत पाणी सोडल्याचे निदर्शनास आले. कदाचित ते पाणी प्र्रक्रिया करून नदीत सोडले असावे. परंतू पाऊस पडला नसल्याने नदीतील अनेक डबके या पांढर्‍या पाण्याने भरलेले आढळून आले. विशेष म्हणजे हे पांढरे पाणी कोठुन येते? याचेही रहस्य उलगडले. तसेच बिंदूसरा पात्रातही मोठ्या प्रमाणात डबके भरलेले दिसून येतात. बिंदूसरा नदी शहरातून जात असल्याने नदीच्या काठी अनेक राहती घरे आहेत. या डबक्यात शहरातून येणारे पाणी साचते आणि ते डबके नेहमी भरून असतात. त्या डबक्यातून मच्छराची निर्मिती व दुर्गंधी नदीकाठी राहणार्‍या नागरीक व ग्रामस्थांना सहन करावी लागते. पाऊस आल्यानंतर हे डबके वाहून जरी गेले तरी पुढे दुसर्‍या नदीत जावून गल्लीतले पाणी दिल्लीपर्यंत पोहचते. म्हणून नदीत सोडण्यात येणार्‍या पाण्याची दर महिन्याला प्रदुषण विभागाने रासायनीक तपासणी केली ततर नदीत पाणी सोडणार्‍या कंपन्या पाणी सोडतांनी हे केमिकल मुक्त करून सोडतील. परंतू प्रशासनाची उदासिनता व प्रदुषण कार्यालय सहज उपलब्ध होत नसल्याने समाज सेवकही नदीत सोडण्यात येणारे पाणी सोडता येते का? किंवा पाणी सोडण्याचे नियम काय आहे? म्हणून आवाजही उठवीत नाही. पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. विशेष म्हणजे सध्या हात धुण्याचा जोर सुरू आहे. शहरातील गटारीतून कोरोना किटाणू वाहतच असावेत त्या दृष्टीकोनातून किमान सध्या तरी पाण्याकडे दुर्लक्ष करून जमणार नाही. याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. 
डबक्यापासून आरोग्याला गंभीर धोका
सध्या पाऊस नसल्याने नदीत डबके साचलेले दिसून येतात. विशेष म्हणजे शहरातून जाणार्‍या बिंदुसरा नदीत मोठ्या प्रमाणात डबके साचलेले असून या डबक्यातून दुर्गधी व मच्छरांची निर्मीती होते. कोरोनाच्या अनुषंगाने विविध फवारण्या झाल्या असल्या तरी या नदीतील डबक्यात कधीही नगर पालिका कर्मचार्‍याने कोणत्याही प्रकारची फवारणी करुन प्रकिया केलेली दिसत नाही. म्हणून या डबक्यापासून आरोग्याला गंभीर धोका निर्माण झालेला आहे. याकडे नगर पालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.
रासायनिक तपासणीसाठी 
नमुने प्रयोग शाळेत

नदीत सोडलेले पाणी नेमके प्रकिया करुन सोडतात का? त्या पाण्यात कोणत्याही प्रकारचे केमीकल तर नव्हे, अशी शंका कुशंका असल्याने दैनिक रिपोर्टरने बार्शी रोडवरील खजाना विहीरीसमोरील जाधववस्ती शेजारुन जाणार्‍या नदीचे पाणी पांढरे असल्याने त्या पाण्याचे नमूने पंचा समक्ष नदीतून व नदीत येणार्‍या प्रवाहातून काढले. हे पाण्याचे नमूने तपासणीसाठी प्रयोग शाळेत देण्यात येणार आहे. यावेळी धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक अविनाश नाईकवाडे, रोहन गवळी व शहरातील समाजसेवक शेख युनूस (पिंटू शेठ) यांची उपस्थिती होती. यांच्या समक्ष दैनिक रिपोर्टरच्या प्रतिनिधीने पांढर्‍या पाण्याचे नमूने तपासणीसाठी घेतले असून लवकरच पाण्याचा अहवाल आल्यानंतर नदीत सोडण्यात आलेले पाणी हे केमीकल मुक्त आहे का? याची सहनिशा होईल.

नदीत औषधाच्या रिकाम्या बाटल्या
नदीत सोडणारे पाणी प्रकिया करुन सोडले जाते का? या अनुषंगाने रिपोर्टरच्या प्रतिनिधीने शहरातील व शहरा बाहेरील काही नद्यांचे सर्व्हेक्षण केले. त्या नदीत घाण पाणी सोडतातच त्याशिवाय काही डॉक्टर मंडळी आपल्या रुग्णालयात रिकाम्या झालेल्या औषधांच्या बाटल्या पण नदीच्या पात्रात फेकतात. ही अत्यंत गंभीर बाब आहे. शहरापासून जवळच असलेल्या एका नदीत मोठया प्रमाणात इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्या नदीच्या कडेला टाकून देण्यात आलेले आहे.जास्त प्रमाणात पाऊस झाल्यानंतर या बाटल्या नदीत वाहून जातील. विशेष म्हणजे या बाटल्यात थोडे फार औषध शिल्लक आहे. ते औषध नदीच्या पाण्यात विरघळण्याची शक्यता टाळता येणार नाही. ज्या औषधाच्या बाटल्या नदीच्याकडेला टाकून देण्यात आलेले आहे. त्या बाटल्यावरील बॅच नंबरवरुन या बाटल्या नेमक्या कोणत्या मेडीकलवरुन विकण्यात आल्या आणि कोणत्या डॉक्टरांनी खरेदी केल्या याची माहिती सहज उपलब्ध होवू शकते. अशा प्रकारे या रिकाम्या बाटल्या कोणी आणून टाकल्या. याचाही शोध औषध प्रशासन सहज घेवू शकते.


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like