आनंदी आनंद गडे... जिल्हा कोरोना मुक्तीकडे 

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्याने कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु केली असून  तब्बल 111 रुग्ण असलेल्या बीड जिल्ह्यात आतापर्यंत 98 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यात आज धारूर येथील दोन तर बीड जिल्हा सामान्य रुग्णालयातून 8 रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याने सध्या जिल्हा रुग्णालयात 10 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 37 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 
   जिल्ह्यात गेल्या तीन महिन्याच्या कालखंडात तब्बल 111 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. मात्र सुरुवातीपासूनच बीड जिल्हा प्रशासनासह आरोग्य प्रशासन आणि पोलिस प्रशासन कोरोना महामारीत सतर्क असल्याने कोरोनाचा आकडा आटोक्यात राहिला. अशा स्थितीतही रेड झोनमधून आलेल्या लोकांमुळे हा आकडा तब्बल 111 वर जावून पोहचला. मात्र गेल्या महिना-दीड महिन्यापासून कोविड रुग्णालयात उपचार घेणार्‍या कोरोनाबाधीत रुग्ण मोठ्या प्रमाणावर बरेही झाले. दहा ते वीस दिवसांच्या उपचारानंतर बीडमध्ये कोरोनाबाधीत रुग्ण बरे होत असल्याचे चित्र असून आज तब्बल दहा रुग्णांना घरी पाठविण्यात आले. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील आठ तर धारूर येथील दोघांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 111 पैकी 98 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे तर तिघांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे, सध्या कोविड रुग्णालयामध्ये दहा रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना महामारीला रोखण्यासाठी आरोग्य प्रशासन, जिल्हा प्रशासन शर्थीचे प्रयत्न करून बाधीतांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेत त्यांचे स्वॅब रोजच्या रोज पाठवत आहेत. गेल्या आठवडाभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमालीची घटल्याने समाधान व्यक्त केले जात असून गेल्या आठ दिवसांपासून केवळ दोन रुग्ण आढळून आले आहेत. आज 37 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यामध्ये बीड जिल्हा सामान्य रुग्णालय 10, आष्टी ग्रामीण रुग्णालय 9, माजलगाव ग्रामीण रुग्णालय 4, अंबाजोगाई स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातील 14 संशयितांचा समावेश आहे. 
    मसरतनगरमधील 
संचारबंदी उठवली

शहरातील मसरतनगर येथे कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे या परिसरात संचारबंदी लागू करून हा परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला होता. गेल्या चौदा दिवसात या भागात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नसल्याने सदरील भागातील संचारबंदी आज शिथील करण्यात आली आहे. 

अपडेटसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like