जिल्हाधिकार्‍यांनी केले माजलगावचे नगराध्यक्ष पद रिक्त

eReporter Web Team

माजलगाव (रिपोर्टर) गेल्या तीन महिन्यापेक्षा जास्त कार्यकाळापासून माजलगाव नगर पालिकेत गैरहजर असलेले नगराध्यक्ष सहाल चाऊस यांचे पद रिक्त केल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी घोषीत केले असून याबाबतचा आदेश मुख्याधिकार्‍यांना पाठवण्यात आला आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गेल्या काही महिन्यापासून नगराध्यक्ष सहाल चाऊस हे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. माजलगाव नगरपरिषद बरखास्त करण्यासाठी आ.प्रकाश सोळंकेंनी गेल्या काही दिवसापासून आपली प्रतिष्ठापणाला लावलेली असताना हा निकाल लावला असून जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षची बरखास्ती प्रकरण राज्यात हे एकमेव असेल.
माजलगावचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या विरोधात माजलगाव नगरपरिषदेतील नगरसेवकांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे अविश्‍वासाचा प्रस्ताव दाखल केलेला होता. जिल्हाधिकार्‍यांनी विशेष सर्वसाधारण सभा बोलावली होती. मात्र जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षावर असा अविश्‍वास आणता येत नसल्याचे आदेश सहाल चाऊस यांनी औरंगाबाद खंडपीठाकडून आणले. त्यानंतर हि सभा रद्द झाली. याप्रकरणी उपनगराध्यक्ष सुमन मुंडे यांनी २७ मे रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज करून नगराध्यक्षांचा पदभार उपनगराध्यक्षांकडे देण्यात यावा अशी मागणी केली. यामध्ये त्यांनी नगराध्यक्ष ४ मार्चपासून अटकेत असल्याचे कारण दिले. तीन महिन्यापेक्षा जास्त कार्यकाळ नगराध्यक्ष गैरहजर असल्यास ते बरखास्तीस पात्र ठरतात. महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत अधिनियम १९६५ चे कलम ५६(१), (२), (३) या कलमाच्या आधारावर आणि कलम ५७(२) नुसार नगराध्यक्ष पदभार उपनगराध्यक्षांकडे देण्यात यावा अशी विनंती उपनगराध्यक्ष मुंडे यांनी केली होती. जिल्हाधिकार्‍यांनी या अर्जास तत्वत: मान्यता दिली आहे. मात्र नगराध्यक्षपदाचा कार्यभार उपनगराध्यक्षांकडे देण्यात यावा असे स्पष्टपणे म्हटले नाही. परंतू हे पद रिक्त असल्याचे जाहिर केले असून जिल्हाधिकार्‍यांनी नगराध्यक्षपद रिक्त करताना महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत अधिनियम १९६५ चे कलम ५६(३) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे माजलगावचे नगराध्यक्ष पद सध्या रिक्त असून तसा आदेश मुख्याधिकार्‍यांना पाठवण्यात आला आहे. रिक्त पदाबाबतची माहिती निवडणूक आयोगाला कळवावी असेही मुख्याधिकार्‍यांना सांगण्यात आले आहे.

अपडेटसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like