शिवसंग्रामचे छत्रपती शिवाजी महाराज  चौकात दरवाढीसाठी दूध एल्गार आंदोलन 

eReporter Web Team

बीड (प्रतिनिधी):- महायुतीकडून आज राज्यभरात दूध एल्गार आंदोलन करण्यात येत असून बीड जिल्ह्यात देखील शिवसंग्रामकडून ठिकठिकाणी हे आंदोलन सुरु आहे. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसंग्रामच्या वतीने दूध एल्गार आंदोलन करण्यात आले. यावेळी दूध उत्पादक शेतकर्‍यांनी दुधाला दरवाढ मिळालीच पाहिजे या मागणीच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. शिवसंग्रामच्या वतीने दुधाचे वाटपदेखील यावेळी करण्यात आले. संपूर्ण राज्यभरात महायुतीकडून दूध उत्पादक शेतकर्‍यांना वाढीव १० रुपये लिटरमागे दरवाढ व भुकटीला ५० रुपये प्रति किलो अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे. राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या या मागण्या मान्य कराव्यात, शेतकर्‍यांचा संयमाचा अंत पाहू नये असे प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे यांनी म्हंटले. 
दूध उत्पादक शेतकऱयांना दुधाचा दर हा खर्च निघण्यापुरता देखील दिला जात नाही. सध्याच्या दरात शेतकर्‍यांना दूध व्यवसाय परवडत नाही म्हणून महायुतीकडून राज्यभरात दूध पिशव्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्या होत्या. मात्र तरीही शासनाने त्याची दखल घेतली नसल्याने आज राज्यव्यापी दूध एल्गार आंदोलन पुकारण्यात आले आहे. यामध्ये शिवसंग्राम देखील महायुतीसोबत राज्यभरात आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे. बीड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दूध उत्पादक शेतकर्‍यांसमवेत शिवसंग्राम पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हलगी वाजवून दुधाचे वाटप केले. यावेळी दूध दरवाढीसाठी शेतकर्‍यांनी घोषणाबाजी देखील केली. दूध आंदोलकांचा प्रश्न या सरकारला सोडायचा नाही का? शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेले सरकार असे म्हणत महाविकास आघाडी सत्तारूढ झाली मात्र यांना शेतकर्‍यांचेच काही देणेघेणे आहे कि नाही? शेतकर्‍यांचा अंत या सरकारने पाहू नये व मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे यांनी म्हंटले आहे. यावेळी सरचिटणीस अनिल घुमरे, सुहास पाटील, महिला जिल्हाध्यक्ष मीराताई डावकर, तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे, राजेंदर माने, योगेश शेळके, ज्ञानेश्वर कोकाटे, गणेश साबळे, गणेश मोरे, विनोद कवडे, अश्विन शेळके, अक्षय माने, पंडित माने, हावळे दाजी, सचिन काळकुटे, मछिंद्र कुटे, विजय सुपेकर, बळीराम थापडे, नागोराव बोर्गे, शेसेराव तांबे,हनुमान पवार, सातेराम ढोले, महादेव बहिर, कल्याण जाणवले, अनिकेत देशपांडे, दत्ता गायकवाड, नितीन बुढणर, पिनू शिंदे, कुतुबभाई आदींसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like