संसर्गरोध छावण्या 

eReporter Web Team

संसर्गरोध छावण्या 
गणेश सावंत
काळ मोठा कठीण आहे. कोरोना व्हायरसचा समूहसंसर्ग प्रचंड वाढताना दिसून येत आहे. कोरोनासारख्या अदृश्य शत्रुशी लढा देताना आरोग्य विभागातील योद्धांना नाकीनऊ येत आहेत. रोज कोरोना बाधीतांचा आकडा वाढताना दिसून येत आहे. तसा बीड जिल्ह्यात कोराना बाधीत रुग्णांच्या मृत्युचा आकडाही तेवढाच वाढताना दिसून आला आहे. जे धडधाकट आहेत ते कोरोनाच्या चिंतेत आहेत आणि जे कोरोनाला बळी पडले आहेत ते थेट चितेवर गेले आहेत. अशा भयावह परिस्थितीला बीड जिल्ह्यातला नागरिक सध्या तोंड देताना दिसून येतोय. ही परिस्थिती भयावह का होतेय?या परिस्थितीला आटोक्यात आणता येणार नाही का? कोरोनाचा वाढता आलेख रोखता येणार नाही का? असे एक ना अनेक प्रश्‍न प्रत्येक जण उपस्थित करतो परंतु ही परिस्थिती रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात मात्र कचरतोय. कोरोनाला रोखण्याचा एकमेव पर्याय हा सोशल डिस्टन्सिंगचा असतानाही त्या पर्यायला मात्र मुठमाती मात्र दिली जातेय. अन् कोरोना रुग्ण वाढतायत, मृत्युमुखी पडतायत म्हणून केवळ चिंता आणि आरोप करण्यात आजचा माणूस धन्यता माणून घेतोय. हे नुसते दुर्दैवच नव्हे तर चिंताजनक आणि विदारक चित्र म्हणावे लागेल. कठीण काळ असलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचे असेल तर एकत्रीत उपाययोजने बरोबर दिशादर्शक मार्गदर्शनाची गरज असताना आरोप-प्रत्यारोपाला महत्व दिलं जातं आणि राजकारण करण्याचा जेव्हा प्रयत्न होतो तेव्हा त्या भागाचे हाल हाल होणार हे निश्‍चित असते. हे उघड सत्य नाकारता येणार नाही. बीड जिल्हा रुग्णालयामध्ये भोंगळ कारभार चालतो, हा आरोप कोरोना परिस्थिती मधला नाही तर कित्येक वर्षापासून कोणाच्या तरी तोंडातून हा ऐकण्यात येतो. परंतु कोरोनाच्या स्थितीला रोखण्यासाठी 
बीडमध्ये कोविड सेंटर 
उभारण्यात आल्यापासून आरोग्य विभागाचे डॉक्टर, कर्मचारी रात्रंदिवस कोरोना बाधीतांच्या सेवेत आहेत, हे नाकारता येणार नाही. बीडच्या कोविड सेंटरमध्ये भोंगळ कारभार चालत असेलही, डॉक्टर दुर्लक्ष करत असतीलही, सेवांचा आभाव असेलही, परंतु याच रुग्णालयातून आजपर्यंत ३०० पेक्षा जास्त कोरोनाबाधीत बरे होऊन गेल्याचे नाकारता येण्यासारखे नाही. परंतु मृत्युचा दर जो वाढलेला आहे, दहशतीने लोक जे मरत आहेत ते चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभागावर, जिल्हा प्रशासनावर आरोप करणार्‍यांना बळ मिळते हे निश्‍चित. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने या कठीण काळात ज्या पद्धतीने सेवा सुरू केली आहे त्यापेक्षा झोकून देऊन सेवा करण्यास सुरुवात केली अन् मृत्युचा दर रोखण्यात यश मिळवलं तर नक्कीच कोरोना योद्धांकडे बघण्याचा दृष्टीकोन अधिक अधिक चांगला होईल. बीडमध्ये ज्या पद्धतीने रुग्ण वाढ होत आहे त्या पद्धतीला आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन दोषी की सर्वसामान्यांचा बेशिस्तपणा? याचा विचारही तुम्ही-आम्ही नक्कीच करायला हवा. कोरोनाने दुसर्‍या टप्प्यात  गेल्या महिना-दीड महिन्यापासून गुणाकार करायला सुरुवात केली आहे. हे शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी अत्यंत धोकादायक आहे, या परिस्थितीला तोंड द्यायचे असेल तर आधी कोरोनाचा गुणाकार थांबवण्याच्या इराद्याने शासन-प्रशासनाच्या सूचना पाळणे आणि त्याची अंमलबजावणी करणे हे नितांत गरजेचे आहे. डॉक्टर सेवा देत असतील, प्रशासन काम करत असेल मात्र रुग्णाला, रुग्णाच्या नातेवाईकांना आणि बीड जिल्ह्यातील जनतेला आत्मिक उर्जा मिळावी, यासाठी 
आत्मविश्वास 
निर्माण करावा, असे कार्य करणे प्रशासन व्यवस्थेच्या हाती आहे. मात्र बीड जिल्हा प्रशासनाकडूनही आणि आरोग्य विभागाकडूनही लोकांचा आत्मविश्‍वास वाढेल, असे कार्य करण्यापेक्षा त्यांचं आत्मबल कमी होईल, असे कृत्य जेव्हा उघडकीत येतात आणि एखाद-दुसरे प्रकरण नकारात्मक समोर येते आणि ते जेव्हा मृत्युचे दार असते तेव्हा मात्र लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडतो आणि तेच बीडमधल्या कोविड सेंटरबाबत सध्या तरी पहावयास मिळत आहे. बीडच्या कोविड सेंटरमध्ये उपाययोजना होत नाहीत, अतिजोखमीच्या कोरोनाबाधीताला मृत्यूच्या दाढेतून याठिकाणी बाहेर आणता येत नाही, त्यामुळे बीडच्या रुग्णालयात उपचार घ्यायचच नाही अशी मानसिकता आता बीड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आणि कोरोनाबाधीत रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये पहावयास मिळते तेव्हा बीडचे रुग्णालय अथवा रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर, कर्मचारी यांनी लोकांचा विश्वास गमावलाय का? तर त्यावर आज उत्तर हो! असच येईल. या प्रकरणामध्ये जे सेवा देतायत, आपल्या जिवाची परवा करत नाहीत त्या आरोग्य विभागातील डॉक्टर, कर्मचार्‍यानंा नैराश्येता येईल की आम्ही काम करतोय, सेवा करतोय तरीही लोक आमच्यावर विश्वास ठेवत नाहीत किंवा लोक आम्हाला भलेबुरे म्हणतात. तर याची जबाबदारी नेतृत्व करणार्‍या व्यक्तीची आहे. मग जिल्हा शल्यचिकित्सक असतील, जिल्हा आरोग्य अधिकारी असतील किंवा या महामारीशी लढाई करणार्‍यांचे नेतृत्व करणारे जिल्हाधिकारी असतील. काम चांगलं होतय, तर मग लोकांपर्यंत चुकीची माहिती का जातेय. लोक आरोग्य प्रशासनाविरोधात अविश्‍वासाने का वागतायत? याचा विचार होणेही गरजेचे आहे. ज्या रुग्णांचा आत्मविश्‍वास दृढ आहे तो नक्कीच कोरोनावर मात करू शकतो हे उघड सत्य आहे. तेव्हा आरोग्य प्रशासनाने आणि जिल्हा प्रशासनाने हा विश्वास निर्माण कसा होईल याकडे तीव्रतेने लक्ष देणे गरजेचे आहे. राजकारण करणार्‍यांचीही इथे कमी नाही. बीड जिल्ह्याला राजकारणाचं माहेरघर म्हणण्यापेक्षा उगमस्थान म्हटलं जातं, अशा भयावह परिस्थितीत 
राजकारण 
होऊ नये, कोरोना परिस्थिती राजकारणाची नाही. आरोप-प्र्रत्यारोपाची नाही. लोकांना उपचार मिळत नसतील, लोकांचे हाल होत असतील तर नक्कीच त्यावर उपाय योजना म्हणून मार्गदर्शक सूचना करणे हे राजकारण्यांचे काम आहे. परंतु कोरोना महामारीत राजकारणाचा भाग म्हणून नावडत्या व्यक्तीला उद्ध्वस्त करण्याच्या इराद्याने अथवा गुत्तेदारीच्या अभिलाशेने कोणी जर व्यक्त होत असेल तर या महामारीत तो घाणेरडा प्रकार म्हणावा लागेल. बीड जिल्हा रुग्णालयातले शल्यचिकित्सक चुकीचं काम करतायत, त्यांच्या वरिष्ठांकडे जा, आरोग्य मंत्र्यांकडे जाऊन बसा, मुख्यमंत्र्यांसमोर खरी वस्तूस्थिती मांडा, परंतु भ्रष्टाचाराचे आणि शिष्टाचाराचे वक्तव्य करून बीड जिल्ह्यातील जनतेत अफवा, अविश्वास निर्माण करू नका, कारण कोरोना बेरोना काहीच नाही म्हणणार्‍या महाभागांमुळे बेशिस्तपणा, बेजबाबदारपणा वाढत चालला त्यामुळे समूहसंसर्ग वाढत राहिला आणि आज जिथं दहा-वीस रुग्ण रोज येत होते तिथे ३० ते ४० येऊ लागले आणि आता ८० ते १०० चा टप्पा रोज पार केला जातोय. जेव्हापर्यंत कोरोनाला गांभीर्याने घेतलं जात होतं, तेव्हापर्यंत बाधीतांचा आकडा कमी येत होता जसच आरोग्य विभागाकडे संशयाने पाहितलं जाऊ लागलं, कोरोनाकडे संशयाने पाहिले जाऊ लागले तेव्हा कोरोनाने आपली जात दाखवायला सुरुवात केली. सध्याच्या स्थितीला कोरोनाची जात जितकी भयानक आहे तितकीच राजकारण्यांच्या राजकारणाची जात दाखवण्याची पद्धतही जनतेसाठी धोकादायक आहे. 
संसर्गरोधक छावण्या 
म्हणजेच क्वॉरंटाईन सेंटर, आयसोलेशन सेंटर, संसर्गरोधक छावण्या हा शब्दप्रयोग आमचा नाही, अठराशे शतकाच्या शेवटच्या टप्प्यात जेव्हा देशात प्लेग आला तेव्हा लोकमान्य टिळकांनी संसर्गरोधक छाण्या असा शब्द प्रयोग वापरून पारतंत्र्यात असताना प्लेगसारख्या आजारावर लोकांचे प्रबोधही केले, त्यातले गांभीर्यही त्यांनी लोकांना समजावून सांगितले. इंग्रजांच्या उपचार पद्धतीवर आक्षेप घेतले. जे चांगलं असेल ते लोकांना पटवून सांगितले. प्लेगवरची लस लोक घेत नव्हते त्यावेळी लोकमान्यनीच आधी ही लस लोकांसाठी चांगली आहे का? या लसीमुळे लोकांना अन्य इफेक्ट होऊ शकतात का? ही लस घेतली तर पुन्हा प्लेग होणार नाही याची खात्री आहे का? असे प्रश्‍न इंग्रज सरकारला विचारले. तसेच संसर्गरोधक छावण्या केेंद्र आणि राज्य सरकारने आयसोलेशन आणि क्वॉरंटाईन सेंटरच्या माध्यमातून उभारल्या आहेतच. नक्कीच काही शंका असतील तर बुद्धीजिवांनी जिल्हा प्रशासनाला आणि आरोग्य प्रशासनाला विचारायलाच हव्यात. त्यात त्रुटी असतील त्या दाखवून द्यायलाच हव्यात. परंतु राजकारण करून कोरोनाचं गांभीर्य कमी करण्याचं पाप कोणी करू नये. लोकांची दिशाभूल होईल, कोरोनासारख्या महामारीकडे त्यांचे दुर्लक्ष होईल, त्यांचा बेजबाबदारपणा वाढेल या पद्धतीने कोणी वागू नये. कारण उंदरं आणि घुशी घर पोखरतात म्हणून कोणी घर बांधणं सोडत नाही. संकटे येत असतात आणि त्यावर मात करणं, धैर्य ठेवून संघर्ष करणे हे तुमचं आमचं काम आहे. 
 


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like