माजी मुख्यमंत्री शिवाजीराव  पाटील-निलंगेकर यांचं निधन

eReporter Web Team

१९८५ ते ८६ या कालावधीत भूषवलं होतं मुख्यमंत्रीपद
मुंबई (रिपोर्टर)- कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचं आज पाहाटे पुण्यातील रुग्णालयात निधनात झालं. आज पहाटे किडणीच्या आजारानं त्यांचं निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाल्याची माहितीही समोर आली होती. परंतु त्यांनंतर त्यांनी करोनावर मातही केली होती.
   राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं आज पहाटे पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना किडनीच्या आजारानं निधन झालं. काही दिवसांपूर्वी त्यांनी करोनावर मातही केली होती. त्यानंतर त्यांना नॉन करोना वॉर्डमध्येही हलवण्यात आलं होतं. १९८५ ते ८६ या कालावधीत त्यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. तसंच राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक खात्यांचा कार्यभारही सांभाळला होता. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे त्यांचे नातू आहेत.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचाजन्म ९ फेब्रुवारी १९३१ रोजी नणंद येथे झाला. त्याचं शालेय शिक्षण गुलबर्गा येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण हैद्राबाद व पिछाडी पर्यंत नागपूरात झाले. १९६२ पासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात झाली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे मुख्यमंत्री अशा अनेक जबाबदार्‍या त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत पार पाडल्या. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं, एक मुलगी, नातू आणि पणतू असा मोठा परिवार आहे.

दोन पिढ्यांना जोडणारे, मार्गदर्शक नेतृत्व हरपले’ 
 माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील  निलंगेकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या विकास वाटचालीत योगदान देणारे, दोन पिढ्यांना जोडणारे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात,  स्वातंत्र्यलढ्यात आणि महाराष्ट्राच्या उभारणीत योगदान देणार्‍या नेतृत्वात ज्येष्ठ नेते निलंगेकर यांचा समावेश होता. बाणेदार आणि ठाम विचारसरणीचे नेते अशी त्यांची ओळख होती. मराठवाड्याच्या विकासाला गती देण्यासाठी नेहमी आग्रही असणार्‍या शिवाजीराव पाटील यांनी तितक्याच तडफेने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. निष्ठावंत राजकीय विचारसरणीच्या पाटील यांच्या निधनामुळे दोन पिढ्यांना जोडणारे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे. ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like