केजमध्ये कोरोनाचा दुसरा बळी; सहा दिवसांचा जनता कर्फ्यू

eReporter Web Team

केज (रिपोर्टर):- जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. आत्तापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला. आज सकाळी शहरातील अजीजपुरा भागातील ५५ वर्षीय इसमाचा अंबाजोगाईच्या रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सदरील इसम आडस येथे ग्रा.पं.कर्मचारी म्हणून कार्यरत होते. रात्री पाठवलेल्या स्वॅबमध्ये १७ रूग्ण हे केज येथील आढळून आल्याने केजच्या व्यापार्‍यांनी सहा दिवस शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. आज व्यापारी महासंघाने तहसीलदार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतली आणि या बैठकीत शनिवार ते गुरूवार या दरम्यान शहर बंद राहणार असल्याचे ठरवण्यात आले.
बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रूग्ण वाढु लागले. रात्री जिल्हाभरात ७५ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. यात १७ रूग्ण हे केज शहरातील असल्याने शहरात एकच खळबळ उडाली. शहरातील अजीजपुरा भागात राहणार्‍या ५५ वर्षीय इसमास कोरेानाच्या लागण झाल्याने त्याच्यावर अंबाजोगाई येथे उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान आज सकाळी मृत्यू झाला. शहरात कोरेानाचा संसर्ग वाढत असल्याने आज व्यापारी महासंघाने बैठक घेवून शहर सहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या बैठकीला तहसीलदार दुलाजी मेंडगे,  पीआय त्रिभुवन, मुख्याधिकारी विशाल भोसले यांची उपस्थिती होती. शनिवार ते गुरूवार हे सहा दिवस शहर कडकडीत बंद राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. शहरवासियांनी सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार दुलाजी मेंडगे यांनी केले आहे. 

सीओ कामावर रूजू
नगर पालिकेचे सीओ विशाल भोसले यांना कोरोनाने घेरले होते. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचार घेवून भोसले हे बरे झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या कर्तव्यावर रूजू झाले आहेत. शहरामध्ये कोरोना अटोक्यात आणण्यासाठी भोसले हे प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचा आकडा पोहचला हजाराच्या पुढे
बीड (रिपोर्टर)- दोन रुग्णांपासून सुरू झालेली वाढ आता १०३३ पर्यंत जाऊन पोहचली आहे. त्या तुलनेत बरे होणार्‍यांची संख्या देखील मोठी असून आतापर्यंत ८०५ जणांनी कोरोनावर मात केली असून ४९२ रुग्णांवर उपचार सुरू आहे तर कोरोनामुळे बीडमध्ये ३३ तर जिल्हाबाहेर ४ जणांचा मृत्यू झालेला आहे. तर बीड जिल्ह्यातून आज ३८५ संशयितांचे स्वॅब पाठविण्यात आले आहे. 
    जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असून साखळी तुटता तुटेना असे झाले आहे. काल तब्बल ७५ रुग्णांची भर पडल्याने कोरोनाचा आकडा एक हजाराच्या पुढे गेला आहे. काल आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बीडमध्ये २७, परळीत १४, अंबाजोगाई ४, केजमध्ये १७, गेवराईत ७,  धारूर आणि आष्टी प्रत्येकी दोन तर माजलगाव, पाटोद्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. आजही शेकडो स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. 

अपडेटसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like