माजलगाव धरणात नाथसागरातून मोठी आवक

eReporter Web Team

माजलगाव (रिपोर्टर)-गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने व जायकवाडी धरणातुन मागील आठ दिवसांपासुन येत असलेल्या पाण्यामुळे माजलगाव धरणात ९३ टक्के पाणीसाठा झाला असुन धरण ९९ टक्यांच्या पुढे गेल्यास कोणत्याही क्षणी धरणातुन सिंधफणा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील आठ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
    माजलगाव शहर व बीड शहराला माजलगाव धरणातुन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. धरणाच्या पाण्यावर नांदेड, परभणी, बीड या तिन जिल्ह्यातील शेकडो हेक्टर जमिन सिंचनाखाली येते. धरणात असलेल्या पाण्याच्या आशेवर तालुक्यातील शेतक-यांनी नव्याने पंधरा हजार हेक्टरवर उसाची लागवड केलेली आहे तर तालुक्यात असलेल्या बागायतदार शेतक-यांना देखिल या पाण्याचा मोठा फायदा होणार असल्याने शेतक-यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. परतीच्या पावसावर धरण भरण्याचा इतिहास आहे. सध्या परतीचा पाउस पडत आहे तर धरण कार्यक्षेत्रात पडत असलेल्या पावसावर आणि जायकवाडी धरणातुन कालव्याव्दारे येत असलेल्या पाण्यामुळे धरणाची पाणीपातळी ९३ टक्यांवर गेली आहे. सध्या ८०० क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरण कधीपण भरण्याची शक्यता असुन कोणत्याही क्षणी धरणातुन सिंधफणा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गोविंदपुर, मंजरथ, नागडगाव, रोषणपुरी, लुखेगाव, मनुर, आळशेवाडी या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. माजलगाव धरणाची पाणीपातळी ४३१.८० मिटर एवढी असुन सध्या ही पाणीपातळी ४३१.४१ मिटर एवढी आहे.


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like