बिंदुसरेला पाणी, नदीकाठच्या नागरिकांनो सावधान

eReporter Web Team

माजलगाव धरणात ९३ टक्के पाणीसाठा; आठ गावांना सतर्कतेचा इशारा
बीड (रिपोर्टर)- पूर्व विदर्भ, छत्तीसगड परिसरात चक्रकार वार्‍याची स्थिती निर्माण झाल्याने राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मंगळवार आणि बुधवारी पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर दुसरीकडे बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून बिंदुसरा धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने बिंदुसरा ओव्हरफुल होऊन वाहत आहे. आज धरणाच्या मोठ्या चादरीवरून पाणी वाहू लागल्याने बिंदुसरा नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले. यामध्ये बीडमधील दगडी पुल पाण्याखाली गेला. 
   गेल्या तीन-चार दिवसांपासून पूर्व विदर्भ, छत्तीसगड परिसरात चक्राकर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले. राज्यातल्या विविध भागात चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार कालपासून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. यापूर्वीच्या पावसामुळे जिल्ह्यातील बिंदुसरासह इतर धरणाला चांगले पाणी आले. बिंदुसरा धरण ओव्हरफुल झाले. त्यातच रात्री धरणाच्या वर पाऊस पडल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. आज सकाळपासून मोठ्या चादरीवरून पाणी वाहू लागल्याने सध्या बिंदुसरा नदी वाहत आहे. बीड शहरातील दगडी पुलावरून पाणी जात आहे.

डोकेवाडा तलाव भरला, 
अनेक गावांचा संपर्क तुटला 
डोकेवाडा तलाव शंभर टक्के भरून ओसंडून वाहू लागल्याने भाळवणी, सुर्याचीवाडी, देवर्‍याचीवाडी, बहिरवाळ वस्ती, सटवाई वस्ती, पिंपळवंडी-बीड रोडवरील अनेक गावांचा संपर्क तुटला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. 


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like