साहेबरावांचं आज श्राद्ध, लोक अन्नत्याग करतायत, फडणवीस तुम्ही ढेकूर द्या

eReporter Web Team

मुख्यमंत्र्यांना आमचा सवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हमी घेतली का? 

विशेष संपादकिय...
-गणेश सावंत -9422742810
ज 19 मार्च. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील काळ्या खडकाला अश्रू फोडणारा दिवस. जगाचा पोशिंदा, जिगरबाज काळजाच्या शेतकर्‍याच्या उरात गरिबीचा नांगर खुपसवणारा दिवस. ‘मढे झाकुनी करतीय पेरणी कुणबीयाचे वाहि लवलाही’ असे धैर्य ठेवणार्‍या शेतकर्‍याला मरणदारी नेणारा दिवस. संकट कुठलंही असो, त्या संकटाला सामोरे जाणार्‍या शेतकर्‍यांचे हात-पाय गाळायला लावणारा दिवस. हो हो हाच तो दिवस. 19 मार्च 1986 चा तो दिवस. यवतमाळच्या साहेबराव करपे नावाच्या शेतकर्‍याने आपल्या तीन लेकरांसह पत्नीला जेवणात विष घालून इहलोकी जाण्याचा निर्णय घेतलेला आणि अवघ्या महाराष्ट्राला काळवंडून टाकणारा हा दिवस. आज साहेबराव करपेंची पुण्यतिथी. परंतु आम्ही पुण्यतिथी हा शब्द प्रयोग करणार नाही. 31 वर्षांच्या कालखंडात महाराष्ट्रात पहिली आत्महत्येची घटना 1986 साली झाली. तेथून शेतकर्‍यांच्या आत्महत्या कायम होत राहिल्या. प्रत्येक दिवसाला महाराष्ट्रात कुठल्या ना कुठल्या शेतकर्‍यांचं श्राद्ध येतय. म्हणूनच आम्ही महणतोय, आज साहेबरावांचं श्राध्द आहे. श्राध्दाला गोडधोड जेवण असतं. परंतु शिवबांच्या नावावर महाराष्ट्रात राजकारण करणार्‍या आजपर्यंतच्या सरकारांना शेतकर्‍यांचा शिवबा कळाला नाही. म्हणूनच शेतकर्‍यांची दैना होतेय. ते आत्महत्या करतायत. साहेबरावांची पहिली आत्महत्या आज त्यांचं श्राद्ध. त्यांची आठवण म्हणून काही लोक अन्नत्याग करतायत. आम्ही एक दिवसाचा अन्नत्याग करतोय, शिवबाचे नाव घेऊन सत्तेवर आलेले देवेंद्र फडणवीस तुम्ही ढेरीवरून हात फिरवा. पोटभर जेवा आणि मनोसक्त सत्तेच्या मदमस्तेचा ढेकुर द्या. तुम्ही विरोधी पक्षात असताना शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर पोटतिडकीने बोलायचात. सत्ताधार्‍यांवर 302 चा गुन्हा दाखल करा, म्हणायचात. कर्जमाफी झालीच पाहिजे, आणि ती कशी योग्य पटवून द्यायचात. मग गेल्या तीन वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्राच्या मातीत मनभर सोडा कणभरही पिकलं नाही. तीन वर्षे प्रचंड दुष्काळ पडला. शेतकर्‍यांवर कर्जाचा डोंगर झाला. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांचे कर्ज माफ व्हायला हवेत की नाही, परंतु तुम्ही सत्तेत आल्यानंतर कर्जमाफीची व्याख्या बदलली. आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. अच्छेदिनच्या स्वप्नाळु दुनियेत जिथं तिथं मुंगेरीलाल होऊन बसलात. तर कुठं-कुठं स्वत: शेखचिल्लीची भूमिका बजावत आहेत. म्हणूनच आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांची बाजु न घेता दुबळ्या शेतकर्‍यांची बाजु न घेता कर्जमाफी केल्यानंतर आत्महत्या होणार नाहीत, अशी फडणवीस तुम्ही हमी मागतायत. मग आमचा म्हणजेच रिपोर्टरचा तुम्हाला जाहीर सवाल आहे, उत्तर प्रदेशच्या निवडणूक प्रचारात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशात सत्ता आल्यानंतर कर्जमाफी करू, अशी घोषणा करतात त्या वेळेस तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा शेतकर्‍यांची आत्महत्या होणार नाही, अशी हमी मागितली का? नसेल मागितली तर आज जो प्रश्‍न तुम्ही विरोधकांना आणि अखंड महाराष्ट्राच्या शेतकर्‍यांना विचारलात तोच प्रश्‍न पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारणार आहात का? तुम्ही म्हणताय, शेती विकासासाठी पैसा शिल्लक राहणार नाही. आम्ही म्हणतो, शेती आणि शेतकर्‍यांच्या विकासासाठी पैसा तेव्हाच गरजेचा जेव्हा शेती असेल, शेतकरी जिवंत असेल तेव्हाच शेतीविकासाचा पैसा बचत केलेला बरा. आज शेती उद्ध्वस्त होतेय, शेतकरी उद्ध्वस्त होतोय, शेतकर्‍यांच्या दारी तोरण तर सोडा ते दार मरणदार होतय. अशा स्थितीतही तुम्ही कर्जमाफी करणार नसाल तर शिवबांच्या नावावर राज्य करण्याचा अधिकार फडणवीस तुम्हाला नाही. अरे ज्या जगद्गुरू संत तुकोबांनी दुष्काळाला सामोरे गेल्यानंतर आलेल्या संकटावर भाष्य करताना 
बाईल मेली मुक्त झाली । देवे माया सोडविली ॥
विठो तुझे-माझे राज्य । नाही दुसर्‍याचे काज ॥
पोरं मेले बरे जाले । देवे माया विरहीत केले ॥
माता मेली मज देखता ॥तुका म्हणे हरली चिंता ॥
आपलं दु:ख अंत:करणात साठवून ठेवलं. इंद्रायणीच्या डोहाशेजारी आले आणि आपल्याकडील शेतकर्‍यांचे कर्जखाते डोहात बुडवून टाकले आणि कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय पुणे परगणा, देहू, प्रांतात घेतला. ती कर्जमाफी पुन्हा आत्महत्या होणार नाहीत याची हमी देऊन नव्हती तर ती कर्जमाफी शेतकर्‍यांचं अपार दुख: पाहून होती. त्याच तुकोबांच्या महाराष्ट्रात त्यांच्याच नावावर फडणवीस तुम्ही राज्य करतायत. त्याच शेतकर्‍यांच्या बळावर त्यांच्याच घामातून उगवलेल्या अन्न-धान्याचं जेवण करत ढेकर देताय. म्हणून कर्जमाफी हा पर्याय नसला तरी दुबळ्या शेतकर्‍यांना तो सर्वात मोठा आधार आहे. म्हणूनच आम्ही कर्जमाफीच्या बाजुने बोलतोय. अरे आम्ही तर म्हणू, पारदर्शकता आणि परिवर्तनाची भाषा करणार्‍या फडणवीस सरकारला पुन्हा आत्महत्या होणार नाही याची हमी हवीय तर शेतकरी आत्महत्या करणार नाही यासाठी तजवीज हवी आणि त्यासाठी कायमचा बंदोबस्त हवा आणि 
परिवर्तन 
हवच हवं. माझ्या महाराष्ट्रामध्ये शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळच येणार नाही, असे परिवर्तन करून टाका. मग आत्महत्येचा प्रश्‍न उरणार नाही. एक रुपयात झुणका-भाकर काय देता, माझ्या महाराष्ट्राच्या लोकांवर एक रुपयाच्या झुणका-भाकर काण्याची वेळच येऊ देऊ नये, अशी परिस्थिती निर्माण करा. भिकार्‍याला रोज एक रुपयाची भीक देण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये भिक मागायलाच माणूस उतरणार नाही, असे परिवर्तन घडवून आणा, तेव्हाच कुठं हमीची भाषा करा. अच्छे दिनचे स्वप्न दाखवणार्‍या भाजप सरकारकडून महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने कुठली हमी घेतली, टाकलं ना तुमच्या पदरात भरभरून माप, म्हणाला होतात ना, ‘ना खाऊँगा ना खाणे दुँगा,’ म्हणाला होतात ना, ‘भ्रष्टाचार्‍यांना देऊ चाप,’ यापैकी एक तरी वचन तुम्ही पूर्ण करू शकलात? आज कुठल्या कार्यालयामध्ये भ्रष्टाचार नाही, कुठल्या क्षेत्रात लाच घेतली जात नाही ? हे एकदा सांगून टाका नाहीतर दाखवून द्या. उगाच बाजारात तुरी अन् ..... अशी पद्धत राबवू नका. परिवर्तन करायचंय, परिस्थिती बदलायचीय, शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखायच्यात, 86 सालात साहेबराव करपेची पहिली आत्महत्या आणि आजपर्यंतच्या आत्महत्येचा आकडा पाहितला तर ताठर मानेने उभा राहिलेल्या महाराष्ट्राला अक्षरश: मान खाली घालावी लागेल, अशी स्थिती आहे. या सर्व घडामोडींवर जालीम उपाय तो केवळ आणि केवळ शेतकर्‍यांच्या उद्धारासाठी शेतीला महत्त्व देण्यासाठी उपाययोजना आखणे नितांत गरजेचं आहे. संघटित लोक हाबूक ठोकतात, सरकारच्या गचुर्‍याला धरतात, त्यांचं तात्काळ भलं केलं जातं. शेतकरी बिचारा आपल्या घामाचं रक्त ओकतो, आस्मानी संकटाला सामोरे जातो, बोगस बी-बियाणाला बळी पडतो, त्यातही ओढून ताणून तो पिक आणतो, तर बाजारात दलाल त्यांना नागवं करतात, सरकार शेतकर्‍यांचं बळी देतं, अशा वेळी 
संघटित लोकांना जो न्याय 
तो शेतकर्‍यांना दिलाच पाहिजे
भारताला स्वातंत्र्य मिळालं, पारतंत्र्याच्या साखळदंडातून भारतीय मुक्त झाला. तेव्हापासून आजपर्यंत देशहितासाठी, देशसेवेसाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला माणूस तत्पर राहिला. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देशभरात अनेक लोक आपआपल्या माध्यमातून लाभाने देशसेवा करतायत. चपराशीपासून कलेक्टरपर्यंत तर मंत्रालयातल्या आयुक्तापासून देशाच्या पंतप्रधानापर्यंत प्रत्येक दहा-पाच वर्षाला कधी महागाई भत्त्यात वाढ होते तर कधी पगारात वाढ करतायत. वेतनवाढीवर भर दिली जाते, हे सर्व लोक संघटित आहेत. लाभाने देशसेवा करतायत, परंतु जगाच्या पाठीवर शेतकरी असा एक व्यक्ती आहे तो लाभाने देशसेवा करत नाही तर प्रेमाने देशसेवा करत आपले कर्तव्य बजावतोय. मग ज्या वेळी महाराष्ट्रामध्ये संघटित लोकांच्या महागाई भत्त्यात वाढ होते , त्यावेळेस शेतकर्‍यांच्या शेतीमालाच्या भावातही वाढ व्हायलाच हवी. संघटित लोकांना महागाईची झळ आहे, ती झळ शेतकर्‍यांना नाही. हे कुठलं गणित? कृषि मूल्यांमध्ये आजही बदल केला जात नाही. तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी कृषि मूल्यांमध्ये बदल केला होता, त्यावेळेस महाराष्ट्रात कापसाचा भाव सात हजाराच्या पुढे गेला. अन्य पिकांनाही चांगला भाव मिळाला. शेतकर्‍यांचं भलं व्हावं, असं वाटत असेल तर संघटित लोकांप्रमाणे शेतकर्‍यांकडे लक्ष देणे गरजेचं आहे. शेतकर्‍यांना वीज आवश्यकतेनुसार हवी. सिंचनाचा अभाव असलेल्या भागात सिंचनक्षेत्र वाढवणे गरजेचं आहे. बोगस बी-बियाणे शेतकर्‍यांच्या पदरात पडणार नाहीत याची दखल घेणे महत्त्वाचे आहे. अन्न-धान्य साठ्यांसाठी मुबलक शासकीय गोडाऊन असणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांच्या शेतीमाला उत्पादित खर्चापेक्षा दोन पैशे जास्त मिळतील, याची दखल घेणे गरजेचं आहे. जोपर्यंत शेतकर्‍यांच्या या छोट्यामोठ्या गरजांकडे लक्ष दिलं जाणार नाही तोपर्यंत आस्मानी संकटांसह मानवनिर्मित लबाडांच्या संकटांना सामोरे जाण्याची ताकत शेतकर्‍यांत येणार नाही. आज कर्जमाफी ही शेतकर्‍यांची आधारयुक्त योजना असू शकते आणि तो आधार राज्य सरकारने द्यायलाच हवा. परंतु त्यानंतर शेतकर्‍यांकडे आणि त्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष देणे हे ध्येय-धोरण आखणं महत्त्वाचं ठरेल तेव्हाच साहेबराव करपेंपासून आजपर्यंतच्या शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर जे तुम्ही-आम्ही श्राद्ध घालतोय ते घालणं बंद होईल नसता महाराष्ट्र हा शेतीनिष्ठ राहिलच हे सांगणे कठीण.


अधिक माहिती: Blog Ganesh swant

Related Posts you may like