Blog-स्वराज्य निर्माता

eReporter Web Team

-गणेश सावंत -9422742810
आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महराजांचा जन्मदिवस. महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि स्वाभिमान जागवणारा दिवस. निखारा असलेला पण राखेत निपचित पडलेल्या चिंगारीला फुंकार घालून मराठी माणसाच्या तना-मनाला धगधगता निखारा बनवणारा आजचा दिवस. म्हणूनच यादिवशी नरवीर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होत आमच्या लक्ष-लक्ष वाचकांकडून अभिवादन करत आहोत. शिवजयंतीच्या शुभेच्छा -संपादक
कुठून तरी ललकारी कानावर पडते. छत्रपती शिवाजी महाराज की... आणि आपसुक ओठातून ‘जय’ कधी बाहेर पडतं हे समजतच नाही. शिवाजी नावाने महाराष्ट्रातल्या कणा-कणाला, तना-तनाला आणि मना-मनाला सं व्यापून टाकलं आहे की कर्तव्य, निष्ठा आणि कर्म याची एकमेव व्याख्या ती म्हणजे शिवाजी. म्हणूनच गेल्या चारशे वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं स्वराज्य डोळ्यांसमोर आलं की आजच्या नतद्रष्ट पैदासींचीही सिद्धांत ममगात्रानी मुखप्रशिश्यती होती. हेही तेवढच खरं. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वात आणि नेतृत्वात असं होतं तरी काय, तर त्याचं उत्तर कर्तृत्व आणि नेतृत्वाचं सर्वोच्च शिखर म्हणून ज्यांच्याकडे पाहितलं जातं त्या जिजाऊ मॉ साहेबांचं मातृत्व तेवढं मोठा होतं. मुलांना जन्म दिल्याने मातृत्व सिद्धीस जातं असं नव्हे तर जन्म दिल्यानंतर त्या मुलाच्या कतृत्वाकडे, कर्माकडे ज्या ध्येयाने, ज्या संघर्षाने पाहितलं जातं, त्याला घडवलं जातं आणि त्या मुलाचं कर्तृत्व आणि नेतृत्व ज्या वेळेस सिद्धीस जातं त्याच वेळेस त्या मातृत्वाच्या पान्हा एकप्रकारे मोक्ष मिळतो. जिजाऊ मॉ साहेबांचं मातृत्व तेवढच मोक्ष मिळवणारं होतं म्हणून महाराष्ट्राच्या मातीला सह्याद्रीच्या पर्वत रांगेला डोंगरदर्‍यांना आणि पाना - फुलांना आणि इथल्या माणसा-माणसांना शिवाजी महाराजांसारखं नेतृत्व मिळालं हे महाराष्ट्राचं परम भाग्य मानायला हरकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी किती लढाया केल्या, किती किल्ले जिंकले, कोणाचा कुठे मुडदा पाडला, राजकीय लढाया कशा केल्या, गनिमी कावे कुठं केले हे इतिहासाच्या पाना-पानामध्ये लिहिलं गेलं असलं तरी माझा शिवबा शेतकर्‍यांचा कसा होता, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजुरांचा कसा होता, सिंचनाबाबत दूरदृष्टी ठेवणारा कसा होता, समुद्रमार्गी हल्ले रोखण्यासाठी आरमार उभा करणारा कसा होता, सातबारा देणारा शेतसारा लोकांना परवडेल, असा घेणारा कसा होता हे समजून घेणं आणि उमजून घेणं अधिक महत्त्वाचं. ज्याच्या जिवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जिवन चरित्र असेल आणि ज्याचा गुरू ‘शिवाजी द मॅनेजमेंट गुरू’
ज्यांचा असेल तो व्यक्ती, तो तरुण त्याच्या भविष्यात अपयशी कधीच ठरणार नाही हे आम्ही छातीठोकपणे सांगू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क होता. कारण इथली रयत, इथली माती, स्वाभिमानापासून कोसो दूर गेलेली होती. महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या निधड्या छात्या धडधडायच्या, मनगटे शिवशिवायचे परंतु अन्याय सहन करण्यासाठी आणि चारही पातशहांना मुजरे घालण्यासाठी. पण जेंव्हा शिवजी राजेंनी स्वराज्याची संकल्पना मांडली, स्वराज्याचं तोरण तोरणा गडावर बांधलं आणि महाराष्ट्राच्या दर्‍याखोर्‍यातून, सहयाद्रीच्या पर्वतरांगातून आणि माळरानातून एक एक मावळा सोबतीला घेतला आणि स्वातंत्र्याचा श्‍वास महाराष्ट्राच्या मातीबरोबर माणसांना देण्याचा निश्‍चय केला तेव्हा बघता-बघता महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांचा बंडाचा झेंडा फडकत राहिला. सत्य-असत्याशी मन केले ग्वाही मानलिया नाही बहुमता हा सिद्धांत डोळ्यांसमोर ठेवून आणि आम्ही झालो गावगुंड अवघ्या पुंडभुताशी हा निश्‍चय मनी बाळगून राजेंनी अन्याय-अत्याचाराविरुद्ध आवाज बुलंद केला आणि बघता बघता महाराष्ट्राचं चित्र पलटत गेलं. पातशाहीच्या टाचाखाली रगडल्या जाणार्‍या रयतेला बळ मिळालं आणि जो तो स्वातंत्र्याच्या, स्वाभिमानाच्या, अभिमानाच्या, संस्काराच्या, संस्कृतीच्या सौभाग्यात नांदू लागला. हे तेंव्हा झालं जेंव्हा लाचारपण सोडलं. हे तेव्हा झालं जेव्हा अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. भ्रष्टाचाराला मूठमाती दिली. अठरापगड जातींना एकत्रित आणलं. जगात फक्त दोन जाती आहेत ती म्हणजे स्त्री आणि पुरुष असं जेव्हा मानलं तेव्हाच जिजाऊ मॉ साहेबांच्या स्वप्नातलं स्वराज्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण झालं. रक्तपात करणं आणि राजेपण मिळवणं हे तेव्हाच्या तथाकथीत राजांचं हुकुमशहापण होतं, परंतु छत्रपतींनी हे रयतेचं राज्य आहे आणि इथला राजा ही रयत आहे. हे जेव्हा ठणकावून सांगितलं तेव्हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला स्वराज्य हे माझं आहे, असं वाटू लागलं. म्हणूनच राजेंच्या दरबारात असलेल्या हिरोजी इंदोरकरांनी रायगड बांधताना पैसा कमी पडल्यानंतर स्वत:चं शेतपोत विकून, वाडा विकून स्वराज्याची राजधानी बांदून काढली आणि पैशाचा मोह सोडला. माझ्या संपत्तीपेक्षा स्वराज्य मोठं हे दाखवून दिलं. हिरोजींसारखे मावळे राजेंना मिळाले तेव्हा कुठं स्वराज्याच्या मस्तकी स्वातंत्र्याचा आणि संस्काराचा टिळा लागला गेला. चारशे वर्षानंतर शिवाजी महाराजांच्या नावामागे जी ताकत आहे ती त्यांच्या कर्तव्य-कर्मामुळे हे जेवढं निश्‍चित तेवढच या देशाने आणि महाराष्ट्राने शिवाजी महाराज 
विस्मरणात गेले की पारतंत्र्य
या देशावर पुन्हा येते. हे अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकामध्ये अवघ्या जगाने पाहितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाळ हा सोळाव्या शतकातला आणि अठराव्या व एकोणिसाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज विस्मरणात होते, तेव्हा या देशामध्ये एक वर्ष नव्हे दोन वर्षे नव्हे दीडशे ते दोनशे वर्षे इंग्रजांनी राज्य केलं. मुठभर इंग्रज व्यापारासाठी या देशात आले आणि आमचे मालक बनले. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मातीपासून ते दिल्लीच्या तकतापर्यंत आमचा स्वाभिमान कुठेतरी अंधाराच्या कोपर्‍यात जाऊन बसला. आम्ही लाचार झालो, परंतु त्याचवेळी महात्मा ज्योतीबा फुलेंनी रायगडवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सापडून काढली. महाराजांची जयंती सुरू केली आणि त्यापाठोपाठ लोकमान्य टिळकांनी इंग्रजांविरोधात आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तरुणांच्या मनातला स्वाभिमान जागृत करण्यासाठी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,’ हे ठणकावून सांगण्यासाठी शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली. महात्मा फुलेंनी समाधी सापडून काढली, पहिली शिवजयंती त्यांनी सुरू केली आणि विस्मरणात गेलेले छत्रपती महात्मा फुलेंमुळे महाराष्ट्राच्या आिण देशाच्या स्मरणात आले. स्वाभिमानाची चिंगारी पेटली. लाचार बनलेले देशवासी इंग्रजांच्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध बोलू लागला. पेटून उठू लागला. तळपायाची आग मस्तकाला जाऊ लागली. मस्तकाच्या नसा ताणल्या जाऊ लागल्या. हाताच्या मुठी वळल्या जाऊ लागल्या आणि देशभरातून एकच आवाज बाहेर पडू लागला, इन्कलाब झिंदाबादा. विस्मरणात गेलेले छत्रपती स्मरणात आल्यानंतर दीडशे वर्षे राज्य करणार्‍या इंग्रजांना पळताभुई थोडी होईल, असं करू शकतात. मग सांगा छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या-आमच्या आणि नव्या पिढीच्या स्मरणात रोज राहिले तर त्याचं भविष्य कसं होईल. आज पारतंत्र्याची भिती नाही. आज स्वातंत्र्यासाठी लढाया करायच्या नाहीत, रक्तपात करायचा नाही पण जे स्वराज्य, जे स्वातंत्र्य मिळालं आहे ते टिकवण्यासाठी छपिती शिवाजी महाराजांचा नेकीचा मावळा म्हणून आणि माणसातला माणूस म्हणून राहायचं आहे. तेवढा तरी तुम्ही-आम्ही राहतोय काय? याचं आत्मचिंतन खरच आपल्याला करावसं वाटतय. तानाजी मालुसरेंनी काय केलं, येसाजी कंकने काय केलं, मदारी-मेहतर काय करत होता, बाजी प्रभू देशपांडेंनी कुठली खिंड लढवली, मोरार जगदेव सराख्या मोगली सरदाराचा नितपात करण्यासाठी आणि धार्मिक दहशतवाद निपटून काढण्यासाठी जिजाऊ मॉ साहेबांनी स्वत:च्या पंडिताला काय सांगितलं याची आता गरज नाही तर गरज आहे ती स्वत: येसाजी कंक, मदारी-मेहतर, तानाजी मालुसरे, हिरोजी इंदोरकरसारखे इमान राखणारे मावळे होण्याची. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की, त्यांना डोक्यावर घेऊन नाचणं म्हणजे शिवाजीचे मावळे होणे नाही तर शिवाजी महाराजांना डोक्यात घेऊन जगणं म्हणजे शिवाजी महाराजांचे मावळे होणे होय. 
सेवापेक्षा परिवर्तन महत्वाचे
आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन महाराष्ट्रात राज्य करणार्‍यांची संख्या कमी नाही. ज्याला-कोणाला सत्तेत यायचं तो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, बेंबीच्या देठापासून ललकारी सोडतो आणि छत्रपतींना मुजरे घालतो. परंतु निवडणुका झाल्या, सत्तेत आले की, छत्रपती शिवाजी महाराजांची आठवणही काढत नाही किंवा छत्रपतींच्या स्वराज्याची री ही ओढत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सेवेपाक्षा परिवर्तनाला महत्त्व दिले आणि आजचे राज्यकर्ते परिवर्तनाच्या नावावर निवडणुकीच्या काळामध्ये सेवेला महत्त्व देतायत. कर्जमाफी करणं ही सेवा झाली आणि या महाराष्ट्रातला माणूस कर्जबाजारी होऊच नाही यासाठी प्रयत्न करणं हे परिवर्तन झालं. एक रुपयात झुणका भाकर ही सेवा झाली पण माझ्या महाराष्ट्रातल्या माणसाला एक रुपयाची झुणका भाकर खाण्याची वेळच येऊ नये, त्याच्या घरात अन्न-धान्याचे साठे असावेत अशी काही उपाययोजना करणं हे परिवर्तन झालं. एखाद्या भिकार्‍याला चार-आठ आणे भिक देणे ही सेवा झाली पण माझ्या राज्यात एखाद्यावर भिक मागण्याची वेळच येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणे हे परिवर्तन झाले आणि हेच परिवर्तन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात होते, देवेंद्र फडणवीसांच्या राज्यात नाही हेही या ठिकाणी ठणकावून सांगावेसे वाटते. छत्रपतींचं नाव घ्यायचं तर परिवर्तन करा, परिवर्तनाची भाषा आणि भाषणं बंद करा.

 —


अधिक माहिती: shivaji maharaj blog Ganesh swant

Related Posts you may like