क्षीरसागर ही नाटक कंपनी, त्यांच्या ढोंगीपणाला बळी  पडू नका-आ.विनायक मेटे

eReporter Web Team

पंकजा मुंडेंना टार्गेट करण्याचा प्रश्‍न येत नाही,त्यादिवशी त्यांनी थांबायला हवं होतं
क्षीरसागर ही नाटक कंपनी, त्यांच्या ढोंगीपणाला बळी 
पडू नका-आ.विनायक मेटे

माझ्या मंत्रीपदाला बीडमधून विरोध झाला, भाजपाने शब्द दिला होता तो पाळायला हवा होता. मात्र तो पाळला नाही. अशी खंत व्यक्त करत महाजनादेश यात्रेत पंकजा मुंडेंनी थांबायला हवं होतं, त्यांचाही सत्कार करायचा होता. पंकजांना टार्गेट करण्याचा प्रयत्नच येत नाही. उलट त्यांनीच वेळोवेळी माझ्याबाबत कटकारस्थान केले म्हणून मला एखाद्या वेळेस काही तरी करावं लागलं. जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेच्या दारात प्रवेश देता का? म्हणत प्रवेशाचं कटोरा घेवून जावं लागलं. त्यांनी बीड शहराचं आणि मतदार संघाचं वाटोळं केलं आहे. बीड विधानसभा मतदार संघावर शिवसंग्रामचा हक्क आहे आणि महायुतीत ही जागा शिवसंग्रामलाच सुटणार आहे. शिवसंग्राम राज्यात १२ जागावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे असं म्हणत बीडचा विकास पुरूष नाही तर भकास पुरूष आहे अशा एकना अनेक रिपोर्टरच्या थेट सवालांना शिवसंग्रामचे सर्वासर्वे विधान परिषदेचे आमदार विनायक मेटेंनी उत्तरे दिली. सायं.दै.बीड रिपोर्टरचे कार्यकारी संपादक गणेश सावंत यांनी घेतलेली ही मुलाखत वाचकांसाठी.

सरकारमध्ये शिवसंग्राम घटक पक्ष असतांना बीडमध्ये भाजपा तुमचे कार्यकर्ते फोडतय?
दुर्दैवाने ते खरंय! जेंव्हा मित्र म्हणून घेतो घटक पक्ष एकमेकांना म्हणून घेत असतो तेंव्हा एकमेकांचे लोक फोडायचे नसतात. हा सरळ संकेत असतो, तो संकेत भारतीय जनता पक्ष बीडमध्ये पाळत नाही. पायदळी तुडवतात, त्याला नाईलाज आहे. ते असं का करतात हे त्यांनाच माहित. 
पंकजा मुंडेंना टार्गेट करण्यासाठी 
मुख्यमंत्री तुमचा वापर करतायत काय? 
मुळात जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडेंना कोणी टार्गेट करतय हे म्हणणं चुकीचं आहे. मी त्यांना टार्गेट करत नाही आणि मुख्यमंत्र्यांचा तर विषयच येत नाही. प्रश्‍न असा आहे, मुख्यमंत्री हे मा.स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले आहे. त्यांच्या हाताखाली त्यांनी काम केले आहे. मुख्यमंत्र्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी मुंडे साहेबांचे मोलाचे योगदान आहे. पंकजाताई आणि मुख्यमंत्र्यांनी आमदार म्हणून सोबत काम केले आहे. सहकारी म्हणुन काम केले आहे. त्यामुळे ताईंना टार्गेट करण्याचा प्रश्‍नच येत नाही. जेंव्हा बीड जिल्हा परिषदेच्या निवडणूका झाल्या. साठ सदस्यांच्या जिल्हा परिषदेमध्ये फक्त अठरा जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडूण आल्या तेंव्हाच कळालं होतं बीड जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता येत नाही. तेंव्हा ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला, विनायकराव जे झालं ते वाईट झालं. तुम्ही अनुभवी आहात, समजदार आहात, तुमच्या दोघातले जे मतभेद असतील ते बाजुला ठेवा आणि पंकजाताईंच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आणण्यासाठी जे करता येत असेल ते करा. त्यांनी हा निरोप दिला, खरो तर ही गोष्ट सांगण्यासारखी नाही तरीही सांगतो आणि त्यामुळेच मी त्यावेळी कामाला लागलो. हे पालकमंत्र्यांनाही माहित नव्हतं. नंतर मी सुरेश धसांना, बदामराव पंडितांना आणि अन्य लोकांना भेटलो. त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करून दिली. त्यानंतर पंकजाताई यांच्यासोबत बैठकी झाल्या हे तुम्ही धस-बदामरावांनाही विचारू शकता. नंतरच जिल्हा परिषदेमध्ये भाजपाची सत्ता आली यात नाव कोणाचं मोठं झालं, पालकमंत्र्याच ना. मुख्यमंत्र्यांच्या मनात पालकमंत्र्यांबाबत किंतुपरंतू असते तर त्यांनी प्रयत्न केले असते का? अन् मलाही सांगितलं असतं का? त्यामुळे मा.मुख्यमंत्र्यांवर हा अन्याय आहे. मुख्यमंत्र्यांचं वागणं हे अत्यंत प्रांजळ असतं, मी गेल्या अनेक वर्षापासून त्यांना ओळखतो, ते माझे चांगले मित्र आहेत, ते अत्यंत सरळ आहेत. गटबाजीला त्यांच्याकडे थारा नाही, आपण म्हणताय तो मुख्यमंत्र्यावर आणि माझ्यावर हा आरोप होईल. माझ्याबद्दल बोलायचं झालं तर एखादं असं उदाहरण द्या किंवा कोणीही द्यावं की मी पालकमंत्र्यांना विरोध केलांय. उलट त्यांनीच माझ्या विरोधात अनेक वेळा कटकारस्थान केले. मी त्याकडे दुर्लक्ष केलं, जेंव्हा त्यांच्याकडून अति होत गेलं तेंव्हा नाईलाजास्तव आम्हाला काही गोष्टी कराव्या लागल्या ही वस्तूस्थिती आहे. 
महाजनादेश यात्रेत आपण मुख्यमंत्र्याचं स्वागत केलं त्यानंतर पालकमंत्र्यांचा त्र्यागा तुम्हाला योग्य वाटतो का?
मुख्मंत्र्यांनी महाजनादेश यात्रा काढण्याचा निर्णय घेतला तेंव्हाच त्यांची माझी चर्चा झाली होती. त्यावेळी मी त्यांना म्हणालो होतो, ही यात्रा भारतीय जनता पार्टीपुरती मर्यादीत आहे की सर्वांसाठी आहे. तेंव्हा ते म्हणाले होते, महाराष्ट्रातील जनतेचे अशिर्वाद घेण्यासाठी मी जातोय. त्यामुळे या यात्रेत कोणीही येवू शकते, स्वागत करू शकते, तुम्हाला स्वागत करायचे असेल तर तुम्ही करू शकता असं सांगितल्यानंतर आम्ही स्वागताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाबाबत मुख्यमंत्र्यांसह यात्रेचे प्रमुख सुजितसिंह ठाकूर यांना ही बोललो होतोे. तेही घ्या म्हणाले होतेे नंतरच हा कार्यक्रम घेतला. त्यानंतर मला माहित झालं बीडमध्ये भाजपाकडून सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे बीड शहराच्या वेशिवर मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचा कार्यक्रम घेण्याचे ठरवले. कार्यक्रमाची तयारी सुरू केली तेंव्हा मुख्यमंत्रीच नाही तर त्यांच्यासोबत असलेल्या पालकमंत्री, खासदार, आमदार या प्रत्येकांचं स्वागत आणि सत्कार करण्याचं नियोजन केलं, तशी तयारीही केली. मात्र यात्रा माझ्या कार्यक्रमास्थळी थांबू नये म्हणून इथल्या भाजपाने प्रयत्न केलेे. पालकमंत्र्यांच्या आजूबाजूच्या ज्यांना कवडीची किंमत नाही आशांनी कार्यक्रम रद्द व्हावा यासाठी प्रयत्न केले. पोलीसांकडून दाबदडप करण्याचा प्रयास झाला. मात्र तरीही आम्ही तो कार्यक्रम घेतला. जेंव्हा सत्काराच्या कार्यक्रमाला सुरूवात झाली तेंव्हा पालकमंत्री वर येतील असं वाटत होतं पण कोणीच आलं नाही. त्या रागारागाने निघून गेल्याचे मला नंतर समजलं. पंकजाताई थोडा वेळ थांबल्या असत्या तर त्यांना कळालं असतं मी असेल किंवा मुख्यमंत्री असतील आम्ही जेंव्हा-जेंव्हा स्व.मुंडे साहेबांचं नाव घेतलं तेंव्हा-तेंव्हा शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या. त्यादिवशीचे तुम्ही व्हिडीओ पाहू शकता, हे पाहण्यासाठी त्यांना थांबू वाटले नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्या का थांबल्या नाहीत? कशामुळे थांबल्या नाहीत? हे माझ्या ऐवजी तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे. छोट्या-गोष्टीचा मोठा बाऊ करण्याची काहीच गरज नव्हती. तो बाऊ झाला, ते त्यांचे जसे मुख्यमंत्री आहेत तसेच ते महाराष्ट्रातील जनतेचे मुख्यमंत्री आहेत. घटक पक्ष म्हणून सत्तेत असलेले आमचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे. 
मुख्यमंत्र्यांसोबत चांगले संबंध असतांना अद्याप तुम्हाला मंत्रीपद का दिले गेले नाही?
घटक पक्ष एकत्र करत असतांना सर्वांना सत्तेमध्ये सामावून घेतलं. आम्हालाही सामावून घ्यायला पाहिजे होतं पण दुर्दैवाने घेतलं नाही. ज्यावेळेस युती झाली होती त्यावेळेस भाजपाकडून आम्हाला लेखी देण्यात आलं होतं. अनेकवेळा आम्हाला तोंडी आश्‍वासने दिली गेली होती. तुम्हाला मंत्री पद दिलं जाईल असं वेळोवेळी सांगितलं होतं. पण त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. तो शब्द का पाळला नाही त्या मागची सर्व कारणे आपल्याला माहित आहेत. यासाठी बीडमधूनही खूप विरोध झाला. आम्हाला आमच्या मंत्री पदाला. 

बीड विधानसभा मतदार संघ शिवसेेनेचा,आता तर जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत आले आहेत, तरी तुम्हाला जागा सुटण्याची आशा वाटते?
मुळात तुमच्या प्रश्‍नाची मांडणीच चुकीची आहे. हक्क कसा? मुळात या मतदार संघात सेनेचे कोण आमदार निवडूण आले. एक तर नवले साहेब, दुसरे ते धांडे साहेब. हे दोघच बाकी कोणी निवडूण आलं नाही. या आधी क्षीरसागर, सिराज भाई, जगताप, सलीमभाई हे लोकही इतर पक्षाचे निवडूण आले आहेत. भाजपा सेनेची जेंव्हा युती झाली होती तेंव्हा स्व.प्रमोद महाजन, स्व.गोपीनाथराव मुंडे, स्व.बाळासाहेबजी ठाकरे यांनी युती केली तेंव्हा मुंडे-महाजनांचा जिल्हा असल्यामुळे त्यांनी जिल्ह्यातल्या सात विधानसभा मतदार संघापैकी चार जागा भाजपाला तीन जागा शिवसेना लढवेल असे ठरले. नंतर सेनेच्या जागा कमी होत गेल्या, इथे बीडची जागा सेनेकडे राहिली. त्याकाळी शिवसेनेचा एकच जिल्हाप्रमुख असल्याने आणि जिल्हाप्रमुख पदावर नवले, बहीर, धांडेंसारखे मोठे लोक असल्याने बीड परिसरामध्ये शिवसेनेची ताकद वाढली. त्या अर्थाने बीडची जागा आम्हाल सोडा म्हणत ती शिवसेनेकडे राहिली. निवडणूक लढवली म्हणजे निवडूण आलं असं होत नाही ना? मागच्या २०१४ ला युती तुटली होती. ही जागा शिवसंग्रामला देण्यात आली त्यावेळी मला ७४ हजार मते पडली तर शिवसेनेच्या उमेदवाराला ३२ हजार मते पडली. त्यांच्या आणि माझ्या चक्क ४२ हजार मतांचा फरक आहे. मुळात ही जागा शिवसेनेची आहे हे म्हणणं चुकीचं आहे. २०१४ मध्ये ज्यांना जास्त मते पडली त्याचा तो मतदार संघ असं महायुतीत ठरलेलं आहे. आता काय झालं? इथले जे आमदार जयदत्त क्षीरसागर आहेत. राष्ट्रवादीकडून निवडूण आले, त्यांना राष्ट्रवादी मानसन्मान देत नाही, जवळ करत नाही. कारण त्यांनी जसे लोकांची घरे फोडली तसं त्यांचंही नियतीने घर फोडलं. खर तर राजकारणामुळे कोणाचे घर फुटू नये या मताचा मी आहे. या सर्व प्रकरणात जयदत्त क्षीरसागरांवर त्यांचा पुतण्या भारी ठरला. तो त्यांच्यावर हावी झाला. त्यामुळे जयदत्त क्षीरसागरांना राष्ट्रवादीत असुरक्षित वाटू लागले. आपण आमदार होणार नाही, आपलं अस्तित्व संपेल या भितीने ते ज्या शिवसेनेला जातीयवादी म्हणायचे, ज्या शिवसैनिकावर त्यांनी खोटे-नाटे गुन्हे दाखल केले. शिवसैनिकावर पोलीसांकडून हल्ले चढवले, शिवसैनिकांना पाण्यात पाहिले, जेवढा त्रास देता येईल तेवढा त्रास सत्तेत असतांना शिवसैनिकांना दिला त्याच शिवसेनेच्या दारात मला प्रवेश देता का? म्हणत जयदत्त क्षीरसागरांना जावं लागलं. विनवण्या कराव्या लागल्या, हा नियतीने उगवलेला सुड आहे. तेंव्हा सेना जातीयवादी होती, आता त्याच सेनेकडे क्षीरसागरांना प्रवेशाचा कटोरा घेवून जावं लागलं. प्रवेशाची भीक मागावी लागली, भाजपात जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेे. भाजपाने क्षीरसागरांची दाळ शिजू दिली नाही. आता शिवसेना आमच्याकडे विद्यमान आमदार आहे असा दावा करू शकते. परंतू मी या जागेसाठी आग्रह धरलेला आहे आणि भाजपाने या जागेवर तुम्हीच लढणार असं सांगितलेलं आहे. 
समजा ही जागा शिवसेनेला सुटली तर 
आपण बीडमधून निवडणूक लढवणार का?

मला असं वाटत नाही, भारतीय जनता पार्टी माझ्यावर तशी वेळ आणेल. कारण निवडणूक तर मी लढणार आहे आणि भाजपाने तसा मला शब्दही दिलाय. 
राज्यात शिवसंग्राम किती 
जाग्यावर निवडणूक लढणार आहे?

आम्ही भाजपा युतीकडे १२ जागेची मागणी केलेली आहे. या जागांबाबत भाजपासोबत तीन ते चार वेळेस बोलणी झालेली आहे. ती सकारात्मक झालेली असून भाजप आपला मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला विश्‍वासात घेवून त्यांच्या सहमतीने आमच्या जागांबाबत निर्णय घेतील, आम्हाला चांगल्यापैकी सात ते आठ जागा मिळतील असा आम्हाला विश्‍वास आहे. 
क्षीरसागरांना तुम्ही कडवा विरोध करता,मात्र मध्यंतरी त्यांच्याशी सुत जुळून घेतले,नगर पालिकेत जावून सत्कार स्विकारला आणि आता पुन्हा विरोध करताय याला काय म्हणायचं?
मुळात सत्कार स्विकारणं म्हणणं चुकीच आहे. गेल्या अनेक वर्षापासून बीड नगर पालिकेमध्ये क्षीरसागरांची सत्ता आहे. २०-२५ वर्षापासून अध्यक्षाचे सुत्र भारतभूषण यांच्याकडे आहे. भारतभूषण यांनी स्वत:चा भाऊ आमदार, मंत्री असतांना कधी न.प.त येवू दिला नाही, कोणालाही न.प.चा कारभार माहिती होवू दिला नाही, त्या न.प.मध्ये अजबगजब कारभार चालू आहे म्हणून हा कारभार पाहता यावा, लोकांचा त्रास दूर व्हावा, तिथली मनमानी बंद व्हावी, नगर पालिकेत पारदर्शकता आणावी म्हणून मी स्वत: अध्यक्षांना नव्हे तर नगर पालिकेच्या सिओंना पत्र लिहिले. मी भेट द्यायला येणार आहे, परंतू ही भेय जाणीवपूर्वक दोन-तीन महिने टाळली गेली. नंतर मी जिल्हाधिकार्‍यांना याबाबत माहिती दिली त्यांनतर जिल्हाधिकार्‍यांनी न.प.ला आदेश काढला, त्या आदेशावरून नगर पालिकेत माझ्या उपस्थितीमध्ये बैठक लावण्यात आली. ही बैठक व्हावी याबाबत क्षीरसागरांची अजिबात इच्छा नव्हती म्हणूनच मला अनेकांच्या माध्यमातून सांगण्यात आले, तुम्ही नगर पालिकेत जावू नका. पण तरीही मी बैठक घेतली, या बैठकीला सर्व पक्षांचे सभापती, गटप्रमुख यांच्या उपस्थित बैठक सुरू झाली. यावेळी कुठलेही हारतुरे नव्हते, सत्काराचा कार्यक्रमही नव्हता. मी आलो आहे म्हणून सिओंनी मला गुच्छ दिला. त्याठिकाणी चार तासाची आढावा बैठक घेतली. तेंव्हा नगर पालिकेतला अनागोंदी कारभार माझ्या लक्षात आला. बैठक झाल्यानंतर बीड न.प.बाबत मी मुख्यमंत्र्यांसह संबंधितांना पत्र लिहिले. न.प.चे स्पेश ऑडीट करण्याची मागणी केली. न.प.ला सुतासारखं सरळ करण्याची भूमिका घेतली. हे सगळं लोक विसरतात आणि माझ्याबाबत संभ्रम निर्माण करण्याची संधी माझे विरोधक सोडत नाहीत. माझ्याबाबत संभ्रम निर्माण करण्यामागं वेळोवेळी क्षीरसारचं असतात. त्या भेटीबाबतही असा संभ्रम क्षीरसागर घराण्यानेच घडवून आणला. आज त्यांचे पुतणे जे नगर पालिकेविरोधात बोलतात हा सर्व गोंधळ आम्हीच बाहेर काढलेला आहे. क्षीरसागरांचे घरातले भांडण हे नाटकी आहे.
क्षीरसागर काका-पुतण्यातला 
वाद तुम्हाला नाटक का वाटते?

आहो साधासोपा विषय आहे, आपल्या घरात भांडण झालं तर लगेच घरामध्ये भिंत येते, घर वेगळे होतात उलट हे लोक एकाच घरात राहतात, एकाच किचनमध्ये त्यांचा स्वयंपाक होतो, एकाच डायनिंग टेबलवर जेवन करतात, पाणीही एकाच ठिकाणी पितात, कधी-कधी गाडीही एकच वापरतात आणि तरीही म्हणता आमचा एकमेकांना विरोध आहे. माझं तर स्पष्ट मत आहे, लोकांना वेड्यात काढण्याचा हा चुलता-पुतण्याचा विरोध आहे. त्यांना हे माहित आहे आता बीडमध्ये आणि जिल्ह्यात क्षीरसागर या नावाला जनता कंटाळली आहे. म्हणून त्यांनी पर्याय काढला, आपल्यावर नाराज असलेला वर्ग विनायक मेटेंकडे जावू नये, अन्य कोणाकडे जावू नये म्हणून त्यांनी घरातच विरोध सुरू केला. आता बघा ना, नगर पालिकेत एक क्षीरसागर आणि एक पद असायचं आणि आता अनेक पदे नगर पालिकेत, जिल्हा परिषदेत क्षीरसागरांच्या घरातले आहेत. सगळ्यांकडे भांडणे झाली की वेगळे होतात, क्षीरसागर आजही एकत्र आहेत, क्षीरसागर ही एक नाटक कंपनी आहे. लोकांना वेड्यात काढलं जातयं. बीडच्या जनतेला माझं आवाहन आहे, खास करून तरूणांना. या ढोंगीपणाल बळी पडू नका. भविष्यामध्ये विकासाची भूमिका घेवून क्षीरसागर हटाव हा अजेंडा सर्वांचा असेल. 
निवडणूकीला सामोरे जातांना 
प्रचारातील मुद्दे कोणते असतील?

माझी निवडणूक ही विकासाच्या मुद्यावर असणार आहे. विकास-विकास म्हणून क्षीरसागरांनी बीड जिल्ह्याची वाट लावली आहे. शहरात पहावं तिकडं गहाण आहे, अस्तव्यस्त पडलेल्या कचरा कुंड्या दिसून येत आहे. त्यामुळे रोगराई पसरली आहे, पिण्यासाठी वेळेवर पाणी येत नाही, लोकांच्या मुलभूत गरजा पूर्ण होत नाहीत. भ्रष्टाचार जिथं तिथं फोफावलेला आहे. वृक्षारोपण करण्यात नगर पालिकेने कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार केला आहे. आता १६०० कोटी रूपयांचे काम झाले म्हणून सांगितले जाते. कुठ आहेत ते १६०० कोटी रूपये? कुठयत ते झालेले कामं, रस्ता केला की पाईपलाईनसाठी तो खोदायचा आणि पाईपलाईन झाली की रस्ता करून पैसे कमवायचे एवढाच धंदा या क्षीरसागरांचा असल्यामुळे या शहराचा आणि मतदार संघ भकास झाला आहे. आता जे रस्ते चालू आहेत या कामात मी आणि पंकजाताईंनी मदत केली म्हणून शंभर कोटी मंजूर झाले. पण हे पैसे सत्कर्मी लागत नाहीत. ग्रामीण भागातही जयदत्त क्षीरसागरांनी काहीच केले नाही. ग्रामीण भागाचं वाटोळं करून टाकलं आहे आणि पुन्हा म्हणायचं विकास पुरूष. कसला डोंबल्याचा विकास केलाय का? बीडमध्ये आणि मतदार संघामध्ये मला विकास करायचा आहे, चांगले रस्ते करायचे आहेत, पिण्यासाठी पाणी द्यायचं आहे, आरोग्य सुविधा द्यायच्या आहेत, लोकांच्या मुलभूत गरजांकडे प्रामुख्याने लक्ष द्यायचं आहे आणि या सगळ्या विकासाचा अजेंडा घेवून मी निवडणूक लढवणार आहे. 
मराठा आरक्षणाचं श्रेय कोणाला देणार? 
मराठा आरक्षण मिळवण्यासाठी हजारो, लाखो लोकांचे सहकार्य लागलेले आहे. जेंव्हा कोणाच्या मनातही नव्हतं, कोणाच्या डोक्यातही नव्हतं तेंव्हा विनायक मेटे आणि शिवसंग्रामने हा  विषय हातामध्ये घेतला आणि तो तडीस नेला. तेंव्हा आम्हाला वेड्यात काढले जायचे. २००५ पासून लोक जागृत होत गेले. मराठा आरक्षणाची मागणी होवू लागली. त्यानंतर २०१६ ला मराठ्यांची क्रांती, राज्यभरात मराठ्यांची त्सुनामी उसळून आली, प्रचंड मोठे मोर्चे निघाले पण मी सांगू इच्छितो मराठा आरक्षणामध्ये शिवसंग्रामचा मोठा वाटा आहे. 
छत्रपतींचा आशिर्वाद घेवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने अद्याप शिवस्मारक उभारले नाही, तुम्ही त्या स्मारकाचे अध्यक्ष आहात, शिवस्मारक कधी उभारण्यात येईल?
एक पहा स्व.अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये मी झेंडा घेवून होतो. तेंव्हाचा विषय होता आरक्षण जातीपातीवर नको तर आर्थिक निकषावर असावा ही भूमिका घेवून आरक्षणाचा मागणी लावून धरली होती. मात्र पुढे चालून या भूमिकेमुळे आरक्षण तर मिळत नाही तर अन्य समाजाचे लोक अंगावर येत आहेत. नाराज होत आहेत, विरोधाता जात आहेत तेंव्हा आम्ही भूमिका बदलली. ज्यांना आरक्षण द्यायचं त्यांना द्या पण आम्हालाही आरक्षण हवं अशी मागणी शिवसंग्रामने लावून धरली. त्याच पद्धतीने अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत भव्य दिव्य स्मारक उभे करावे ही मागणी आम्ही लावून धरली आणि हे स्मारक मुंबईत व्हावे म्हणजेच राज्य, देश आणि जगातले लोक ते पाहतील. त्यासाठी जागा शोधण्याचं काम १९९५ पासून सुरू केलं. अनेक जागा पाहिल्या तेंव्हा अरबी समुद्रामध्ये स्मारक उभं करावं तेही गिरगाव चौपटीच्या मधोमध जिथं चंद्रकोर आकार आहे त्या ठिकाणी. इथं जर स्मारक उभारलं तर हे स्मारक अरबी समुद्रातल्या या चंद्राकोर आकारात मुकूट मण्यासारखं शोभून दिसेल. ती मागणी मान्य झाली, १९९७ पासून या समितीचा मी सदस्य आहे. आता अध्यक्ष झालो, स्मारकाच्या कामाची प्रक्रिया पूर्ण झाली, कामही सुरू झालं. आठ दिवस काम सुरू राहिलं पण काही विघ्न संतोषी लोकांनी, पिलावळांनी महाराजांना विरोध करत कोर्टात गेले. मुंबई कोर्टाने त्याचंं म्हणणं ऐकून घेतलं नाही पण सुप्रिम कोर्टाने पुढच्या तारखेपर्यंत काम बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या. म्हणून सध्या ते काम स्थगित आहे. कारण मी आपल्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला सांगू इच्छितो. तुम्ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आहोत, महाराज हे आपले दैवत आहे त्या दैवताचे स्मारक होणार म्हणजे होणार. आम्ही ते उभे केल्याशिवाय गप्प बसणार नाही. पावसाळा संपला, स्थगिती उठली की लगेच स्मारकाचे काम सुरू होईल. कुठल्याही परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे. हे माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं स्वप्न आहे. 


अधिक माहिती: beed

Related Posts you may like