विद्यमान आमदार कपाळकरंटा तर मोहनराव बेईमान-प्रकाश सोळंके

eReporter Web Team

माजलगावच्या विकासाची पिचेहाट झाली,
ती पुर्ववत करण्यासाठी लोकहो मला अशिर्वाद द्या

विद्यमान आमदार कपाळकरंटा तर मोहनराव बेईमान-प्रकाश सोळंके
गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात आ.आर.टी.देशमुखांनी माजलगावच्या विकासाला मागे नेवून ठेवलं आहे. साधं तोंडही लोकांना ते दाखवत नाहीत. मी मंजूर करून आणलेले प्रकल्प त्यांनी बंद पाडले आहेत. तो त्यांना कपाळकरंटेपणा आहे. मला वय झाल्याचा सल्ला देणारे मोहनराव यांनी त्यांचं काम करावं. पवार साहेबांमुळेच मोहनरावांचा कारखाना झाला. बेईमान होण्याची त्यांची जूनी सवय आहे. गेल्या पाच वर्षाच्या काळात आमदाराला साधं ३३ के.व्ही.चं सबस्टेशन आणता आलेलं नाही. नोटबंदीमुळे देशाचं वाटोळं झालं. ईव्हीएम मशिनवर माझा विश्‍वास आहे असे सडेतोड उत्तरे माजी मंत्री तथा माजलगाव विधानसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांनी रिपोर्टरच्या थेट सवालमध्ये दिली. सायं.दै.बीड रिपोर्टरचे कार्यकारी संपादक गणेश सावंत यांनी घेतलेली ही मुलाखत.
आपण भाजपात प्रवेश करणार 
अशी चर्चा मध्यंतरी मोठ्या प्रमाणात झाली,खरे काय आहे?

काही वृत्तपत्रांनी माझे नाव न घेता काही बातम्या प्रकाशित केल्या. प्रवेश करणार असल्याचे ते वृत्त होते, परंतू यात माझं कुठंही नाव नव्हतं. तसा काहीच प्रकार नाही, त्या बातम्या का दिल्या, कोणी दिल्या? हे माहित नाही. पण गेल्या दोन-तीन महिन्यापासून मी राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून मतदार संघात फिरत आहे. निवडणूकीचे काम जोरात सुरू आहे. मी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीनेच उद्याची निवडणूक लढवणार आहे. 

गेली पाच वर्षे विरोधक म्हणून जनतेच्या प्रश्‍नावर किती आंदोलने केली,त्यात किती आंदोलनाला यश आले? 
गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात आम्ही खूप मोठी आंदोलने वेळोवेली केली आहेत. याची दखल रिपोर्टर या दैनिकाने घेतलेली आहे. तुम्ही ही अनेक वेळा बातम्या प्रकाशित केल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना हेक्टरी पन्नास हजार रूपये अनुदान मिळावं म्हणून आंदोलन केलं. केंद्र सरकारच्या नोटबंदी विरोधात आंदोलन उभारलं. नोटबंदीच्या निर्णयामुळे रोज लोकांना बँकेच्या दारात रांगेत उभे रहावं लागायचं. अशा क्युमधील लोकांचे राष्ट्रवादी पक्षाकडून स्वातंत्र्य सैनिक म्हणून आम्ही सत्कार केला. नोटबंदी हा देशासाठी सर्वात मोठा आत्मघाती निर्णय होता. या निर्णयामुळे देशात १५६ लोक क्युवमध्ये उभा राहिल्याने हुतात्मा झाले. विमा मिळावा म्हणून आंदोलन केले. विमा मंजूर झाल्यानंतर ११ हजार शेतकर्‍यांना विमा मिळत नसल्याचे पाहून नुसते आंदोलन केले नाही तर शेतकर्‍यांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली. या हेल्पलाईनद्वारे ज्या शेतकर्‍यांना विमा मिळाला नाही, त्यांच्याकडून कागदपत्र घेवून आम्ही पुण्याला विमा कंपनीच्या ऑफीसमध्ये गेलो. त्यांच्यासोबत चर्चा केली तेंव्हा कुठे ९९ टक्के प्रकरणे निकाली निघले. या सर्व खटाटोपामुळे आज विमा मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

ईव्हीएम मशिनबाबत देशभरात शासंकता 
व्यक्त केली जाते,आपल्याला काय वाटते?

ईव्हीएम मशिनबाबत आपल्याला काही शासंकता नाहीये. ईव्हीएममध्ये कुठलाही फेरफार होवू शकत नाही. मतदानाच्या आधिक मॉब व्होटींग घेतली जाते. ते व्होटींग पन्नास मताचं असतं. ते सर्वांसमोर घेतलं जात, मॉब व्होटींगची टॅली केल्यानंतर पुढची मतदान प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे त्याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही. 

मोहन जगताप म्हणतात, सोळंकेंनी छत्रपती साखर कारखाना चालू होवू नये म्हणून पंधरा वर्षे अडचणी आणल्या. त्यांच्या अडमुठ्या धोरणाला 
कंटाळून मी राष्ट्रवादी सोडली?

माझा काय संबंध अडवण्याचा, माझा राग एवढाच होता. माझा कारखाना इथं जुना आहे, त्याच कारखान्याचे संपूर्ण कार्यक्षेत्र त्याने घेतले. याची क्षमता आहे का तेवढी? म्हणून मी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. कार्यक्षेत्र वाटून द्यावं. त्यांचं कार्यक्षेत्र आणि आमचं कार्यक्षेत्र कॉमन ठेवू नये, त्यामुळे हा वाद काही दिवस न्यायालयात चालला. अडचण अणायची असती तर मी मंत्री असतांना आणली असती ना? मी तसं काही केलं नाही, कोणाला अडचण आणण्याचा माझा उद्देशही नव्हता. जयमहेश कारखाना या ठिकाणी उभा राहिला, तेंव्हा सुद्धा आम्ही कुठे काही म्हणालो नाहीत. अथवा व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला नाही. मग मोहनरावच्या कारखान्याला अडचण आणण्याचे काय कारण? मोहनरावला एवढं तरी कळायला पाहिजे. त्यांचा कारखाना आदरणीय पवार साहेबांमुळे उभा राहिला. पवार साहेबांनी कारखान्याला मदत केली नसती तर जन्मभर यांना कारखाना उभा करता आला नसता. त्यामुळे त्यांच्या कारखान्याचा सर्व श्रेय हे पवार साहेबांचं आहे. अन् आता काय झालं की असं म्हणत पलटी मारायची ही त्यांची जूनी रित आहे. पहिलं त्यांच्या कारखान्याचं नाव काय होतं हे माहित आहे तुम्हाला? प्रबोधनकार ठाकरे सहकारी साखर कारखाना हे त्यांचं नावं होतं. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांनी कारखान्याचं नाव बदललं  आणि आता राष्ट्रवादीशी बेईमान झाले. बेईमान होण्याची जूनी सवय आहे त्यांना.

सोळंकेंचं वय झालं आता त्यांनी थांबावं, असा सल्ला मोहनरावांनी काही दिवसापूर्वी दिला,आपण काय म्हणाल? 
माझं वय झालं! सल्ला देणार तो कोण? पाच वर्षे झालं मी काम करतोय, त्यावेळेस त्याला दिसलं नाही का? तेंव्हा का नाही दिला मला सल्ला? आता निवडणूकीच्या तोंडावर काय सल्ला द्यायचा. मी माझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत आठ निवडणूका लढल्या त्यामध्ये दोन जिल्हा परिषदेच्या, पाच विधानसभेच्या, एक लोकसभेची निवडणूक लढवली. मोहनराव जगतापाचं वय आता ५० आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणूकीपुढे त्यांची गाडी सरकलीच नाही. आता माझं वय जरी झालं असलं तरी माझी नाळ मतदार संघातील लोकांशी जोडली गेली आहे. म्हणून तर मी आठ निवडणूका लढवू शकलो, जिंकू शकलो आणि राज्याच्या मंत्री मंडळामध्ये स्थान मिळवू शकलो, त्यातून लोकांचा विकास करू शकलो. मोहनराव तुमची अजून विधानसभेची सुद्धा सुरूवात झालेली नाही. त्यामुळे मला सल्ला देण्यापेक्षा आपआपलं काम करत रहावं. त्याने त्याचं काम करावं आणि मला माझं काम करू द्यावं.

उद्याच्या निवडणूका तुम्ही कुठल्या 
मुद्यावर लढवणार आहात? 

मुद्दे तसे अनेक आहेत, मी पंधरा वर्षे आमदार असतांना या मतदार संघाचा खूप मोठा विकास केला. गोदावरीवरील बॅरीकेट असतील, अप्पर कुंडलीकेचा प्रकल्प असेल ही कामे माझ्या काळात झाली आहे. ३३ के.व्ही. केंद्र १२ ठिकाणी उभारले, प्राथमिक आरोग्य केंद्र मीच केले, माजलगावचे ग्रामीण रूग्णालय माझ्या काळात झाले, न्यायालयाची इमारत माझ्या काळातली आहे, प्रत्येक गावात तलाठी मंडळ कार्यालय उभे केले, पोली क्वार्टर केले, शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचे प्रश्‍न मार्गास लावले, शिक्षण प्रश्‍न मार्गी लावून शिक्षणाची यंत्रणा सुरळीत केली. आमदार या नात्याने जेवढं काही करता येईल तेवढं केलं. जेंव्हा मी मंत्री मंडळात होतो तेंव्हा माझ्याकडे पुर्नवसन खातं होतं. याकाळात २८ गावच्या पुर्नवसनासाठी १५० कोटी रूपयाचा निधी आणला. त्यातून अंतर्गत रस्ते, नाल्या, बस स्टॉप, स्मशानभूमी, शेतीपोट रस्ते केले. महाराष्ट्रात कोठेही काम झाले नसेल असे पुर्नवसनाचे काम मी माझ्या काळात केले. दुर्दैवाने मागच्या निवडणूकीत माझा पराभव झाला. या पाच वर्षात काय विकास कामे झाले हे लोकांना चांगलं माहित आहे. विद्यमान आमदाराने मतदार संघात काडीचाही विकास केला नाही. हा मुद्दा घेवून मी लोकांमध्ये जाणार आहे. मतदार संघाला योग्य नेतृत्व न मिळाल्यास मतदार संघ किती मागे जातो हे मी लोकांना सांगणार आहे. विकासाच्या मुद्यावरच मी निवडणूक लढवणार आहे. 
विद्यमान आ.आर.टी.देशमुखांनी 
गेल्या पाच वर्षात काहीच केलं 
नाही असं म्हणायचं आहे का? 

तुम्ही सांंगा कुठे काय केलंय ते. या पाच वर्षात कुठलचे विकास कामे झाली नाहीत. आमदाराने फक्त गुत्तेदारी करण्याचं काम केलं आहे. रस्त्याच्या गुत्ते स्वत:च्या कन्स्ट्रक्शनला. विकास तर केला नाही, आहो ते लोाकंना उपलब्ध ही नव्हते. लोकांची कामे होत अथवा न होवोत आमदार २४ तास जनेतला उपलब्ध असावा लागतो. आमदाराची भेट-गाठ व्हायला हवी, त्याचं तोंड तर लोकांना दिसायला हवं. पण हे गेल्या पाच वर्षामध्ये काही घडलं नाही. म्हणून माजलगाव मतदार संघाची विकासाबाबत जी काही पिछेहाट झाली आहे ती पुढे दहा वर्षात तरी न भरून निघणार आहे. अनेक प्रकल्प अडकून पडले आहेत. लोणी-सांगवी उपसा सिंचन प्रकल्प तसाच रखडून पडला आहे. सध्या एवढा मोठा दुष्काळ जिल्ह्यात आहे, गोदावरी पात्रातून बाहेरून आलेलं पाणी आंध्रपद्रेशात वाहून जात आहे. उपसा सिंचन प्रकल्प झाला असता तर त्या पाण्यातून माजलगावचे जायकवाडी धरण पन्नास टक्के भरले असते. परंतू ही योजना आमदारांनी बंद पाडली. एमआयडीसीचा प्रकल्प माझ्या काळात मंजूर झाला. बीड जिल्ह्यातली सर्वात मोठी ही एमआयडीसी आहे. त्या एमआयडीचे सगळे कामे झाली आहेत. परंतू मागच्या पाच वर्षाच्या काळात एकही उद्योग आमदाराला आणता आला नाही. पंधराशे कोटी रूपयाचे टेक्सयाईल पार्क उभा करण्याची घोेरा केली होती. अद्याप त्याचंं भूमिपूजन सुद्धा झालेलं नाही. एवढच काय तर माझ्या काळात ५०० खाटाचं उपजिल्हा रूग्णालय मी स्वत: मंजूर करू आणलं होतं. त्यासाठी पाच एक्कर जमीन देण्याचं काम मी केलं, त्याचं बजेट उपलब्ध आहे. एवढं काही असतांना त्या रूग्णालयाचा शुभारंभ कार्यक्रम त्यांना करता आला नाही. अशा अनेक विकासाच्या बाबी आहेत. ज्या आमदाराला करता आलं नाही. अप्पर कुंडलीकेतून अद्यापही शेतकर्‍यांना शेतात पाणी दिलं नाही. अरणवाडीचा प्रकल्प आजही तसाच रखडलेला आहे. तारूगव्हणचं काम अद्याप झालेलं नाही. या तालुक्यात साधं ३३ केव्हीची सबस्टेशन सुद्धा या पाच वर्षात उभा करता आलं नाही. आज वीजेची अशी अवस्था आहे. शेतकर्‍यांना ट्रान्सफार्मर आणण्यासाठी वर्गणी करावी लागत आहे. अधिकार्‍यावर वचक राहिलेला नाही. गुत्देार असल्यामुळे शिपयाला साहेब-साहेब म्हणण्याची सवय आमदाराची आहे. यामुळे मतदार संघाची वाताहात झाली आहे. 

भाजपाकडून तुमच्या विरूद्ध चार नावं येत 
आहेत,तुम्हाला तुल्यबळ कोण वाटतं?

आज चारही इच्छुक उमेदवार मतदार संघामध्ये फिरतांना दिसून येतात. यामध्ये खर तर चारही माझ्यासाठी तुल्यबळ म्हणावे लागतील. विरोकांना कमी लेखून कसं चालणार, सर्वच जण तुल्यबळ आहेत. 
उपसा जलसिंचन प्रकल्पा विरोध करण्याचं 
कारण काय?तुमच्या आमदाराचं? 

माझ्या दृष्टीने आमच्या आमदाराला समजच कमी आहे. हा प्रकल्प कशासाठी केलाय हेच त्यांना माहित आहे की नाही. अहो हा कपाळकरंटेपणा आहे दुसरं काही नाही. ज्या मतदार संघाचं तुम्ही नेतृत्व करता आणि त्याच मतदार संघात चालू असलेल्या योजना बंद करता हे मोठं पाप आहे. या प्रकल्पावर हजारो लोकांचे संसार अवलंबून आहे. त्या लोकांच्या संसारात माती कालवण्याचं काम आमदारांनी केलं आहे. 

ऊसबंदी स्वरूपात हालचाली सुरू असतांना आपण शांत कसे?
मी शांत नाही, आमच्या कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये मी प्रतिक्रिया दिली आहे. हा निर्णय अत्यंत घातकी आहे. शेतकर्‍यांना हमी उत्पन्न देणारं ऊस हे एकमेव पिक आहे. यावर मी पर्याय सांगितला आहे. शंभर टक्के सबसीडीवर शेतकर्‍यांना ठिबक द्या ना, पाण्याचा वापर ५० टक्क्याने कमी होईल. मराठवाड्यामध्ये सातत्याने दुष्काळ पडतो. त्याचे निवारण करण्याचे सोडून या सरकारने वॉटरग्रीड योजना आणली आहे. काय उपयोग आहे या योजनेचा, सगळी धरणे तर रिकामे आहेत. ते एकमेकांना जोडून पाणी कोठून येणार? यासाठी मी मागणी केलेली आहे. पश्‍चिम वाहिणीत ज्या नद्या आहेत, त्यांचं पाणी सुमद्राला जावून मिळतं ते पाणी उचलून गोदावरी पात्रात टाकण्याची आज खरी गरज आहे. या योजनेला सरकारने प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. ही योजना सुरू झाली तर आणि तरच मराठवाड्याचा कायमस्वरूपी दुष्काळ हटेल. तुम्हा आम्हाला जे दुष्काळाचे चटके बसतात ते बसणार नाही. या महत्त्वाच्या कामाला प्राधान्य देण्यापेक्षा केवळ गुत्तेदारी पोसण्यासाठी वॉटरग्रीडचा प्रकल्प पुढे आणला. हा प्रकल्प अत्यंत निकामी आहे. 

मतदार संघातील लोकांसाठी 
काय आवाहन कराल? 

गेल्या तीस वर्षाच्या कालखंडात आमदारकीच्या माध्यमातून आणि कारखान्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसासाठी विकासाचे काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आज जनतेसाठी मी २४ तास उपलब्ध आहेत. आज लोक मला म्हणतात विद्यमान आमदार कुठं दिसत नाही अन्य कोणी तालुक्याला वाली नाही. दादा शेवटी तुमच्याकडच यावं लागतं, तुमच्याकडूनच काम करून घ्यावं लागतं. मी जरी आज सत्तेत नसलो तरी माझ्या परीने जेवढ काम करता येईल तेवढ करत आहे. कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर दीनदुबळ्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी करत आहे. माझ्या कामाचा अनुभव सर्वसामान्य माणसाला आहे. मागच्या काळात नवीन प्रयोग म्हणून नवीन आमदाराला निवडूण देण्याचे काम मतदारांनी केलं असावं. परंतू आता निश्‍चितपणानं सर्वसामान्य माणसे आपल्या निर्णयावर पश्‍चाताप करत आहेत. त्यामुळे मी एवढचं सांगेल, मी या मातीतला आहे, इथल्या माणसातला मी उमेदवार आहे. बाकी जे काही उमेदवार आहेत ते तीनही उपरे आहेत, बाहेरचे आहेत. त्यांनी इथल्या लोकांचं देणंघेणं नाही. आर.टी.देशमुख निवडूण आल्यानंतर थेट परळीला जावून राहिले. तसं आडसकर उमेदवार आले तर ते आडसवरूनच काम करणार, शेटे पण माजलगावात राहतीलच असं सांगता येत नाही आणि मोहनराव ही मुळचे माजगलावचे नाहीत. गुत्तेदारी करण्यासाठी ते या मतदार संघात आले हेाते. मी लोकांना एवढच सांगेल की, गेल्या तीस वर्षाच्या कालखंडात आदरणीय साहेबांचा वारसा चालवण्याचं काम आम्ही सर्व कुटुंबातील सदस्यांनी केलं आहे. त्यामुळे माजलगावत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी पुन्हा एकदा मला संधी द्यावी. मतदार संघाचा जो विकास खंडीत पडला आहे तो पुन्हा चालू करण्यासाठी माझ्या पाठिशी उभा राहावं, जनतेने मला आशिर्वाद द्यावेत एवढीच माझी त्यांना विनंती आहेत. 


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like