धस उमेदवारीच्या स्पर्धेत असण्याचा प्रश्‍नच येत नाही-आ.भीमराव धोंडे

eReporter Web Team

अडचणीच्या काळात मुंडे साहेबांसोबत कायम राहिलो
धस उमेदवारीच्या स्पर्धेत असण्याचा
प्रश्‍नच येत नाही-
आ.भीमराव धोंडे

सुरेश धसात आणि माझ्यात वैयक्तिक भांडण नाही, वृत्तपत्रामधून ज्या बातम्या येतात त्याला मी सौम्य उत्तर देतो. मतदार संघात मी सक्षमपणे काम करत असून मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांनी मलाच कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. महाजनादेश यात्रेत खाली काय झालं हे मला माहित नव्हतं. तर विकास कामासाठी गडकरींनाच काय तर कुठल्याही मंत्र्यांना भेटणं गैर नाही. सुरेश धसांना पक्षात घेतांना मला विचारण्यात आलं होतं, मला विचारूनच त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. कुठल्याही क्षेत्रात स्पर्धा असते, विधानसभेच्या तिकीटासाठी स्पर्धा आहे. सुरेश धस हे विधान परिषदेचे सदस्य असल्याने त्यांचा स्पर्धेत असण्याचा प्रश्‍नच येत नाही. पाच वर्षाच्या कालखंडात आष्टी मतदार संघात सर्वात जास्त रस्त्याचे काम झाले. मुंडे साहेब जेंव्हा अडचणीत होते तेंव्हा मी त्यांना मदत केली. धस यांनी त्यांना विरोध केला परंतू मी त्यांच्या सोबत राहिलो. असे एक ना अनेक उत्तर देत आ.धोंडे यांनी मतदार संघात आपलीच उमेदवारी निश्‍चित असल्याचे थेट सवालमध्ये सांगितले. सायं.दै.बीड रिपोर्टरचे कार्यकारी संपादक गणेश सावंत यांनी धोंडेंना केलेले थेट सवाल या मुलखतीतून देत आहोत. 
पंकजा मुंडेंच्या पाठीवरील भात्त्यातले बाण सध्या आष्टीमध्ये एकमेकांसोबत भांडतांना दिसून येतात?
त्यांच्या आणि माझ्यात वैयक्तिक असं कुठलंही भांडण नाही. वृत्तपत्रामधून काही बातम्या वाचायला मिळतात. तेंव्हा मी सौम्य भाषेत उत्तर देतो. यापलीकडे आमचं काहीच नाही.

तुमच्या उमेदवारीला पंकजा मुंडे यांनी
हिरवा कंदील दाखवला ते खरे आहे का?
दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या भाजपाच्या सर्व आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. जे आमदार आपआपल्या मतदार संघात सक्षमपणे काम करत आहेत त्या सर्वांना आम्ही तिकीट देणार आहोत. जे आमदार आजारी आहेत, ज्यांचे काम चांगले नाही, ज्या आमदारांचा मतदार संघात परफॉर्मन्स चांगला नाही अशा आमदारांना २०१९ च्या निवडणूकीत संधी देण्यात येणार नाही. माझं काम चांगलं आहे की नाही हे भारतीय जनता पार्टीने सर्व्हे करून तपासलं आहे. आजपर्यंत पक्षाने जेंव्हा-जेंव्हा माझ्या मतदार संघात कामाची पाहणी केली तेंव्हा-तेंव्हा माझ्या कामाला बी किंवा बी प्लस असा ग्रेड मिळालेला आहे. जिल्हा परिषदेमध्ये माझे नऊ सदस्य आहेत. जेंव्हा महाजनादेश यात्रा काढण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला होता तेेंव्हाही आमदारांसोबत एक बैठक झाली होती. त्यावेळेसही मलाच नाही तर या मतदार संघात ज्या आमदारांचं चांगलं आहे त्या सर्वांना कामाला लागण्याबाबत आदेश मुख्यमंत्र्यांनीच दिले होते. महाजनादेश यात्रेचा प्रोग्रामही मलाच देण्यात आला होता. याचा अर्थ असाच आहे, माझी उमेदवारी निश्‍चित आहे. या सर्व बैठकांना स्वत: पालकमंत्रीही उपस्थित होत्या. कोअर कमिटीमधील जे सदस्य आहेत आणि त्या सदस्यांच्या अंतर्गत जे आमदार काम करत आहेत त्यांना काम करण्याचे आदेश सुरूवातीलाच देण्यात आले आहेत. त्यामुळे मी कामाला लागलो आहे. मतदार संघात रोज गाठीभेटी देत आहे आणि आज निवडणूका आल्यात म्हणून मी लोकांमध्ये जात नाही तर पुर्वीपासूनच माझा लोकांसोबत संपर्क आहे. 

आ.सुरेश धस मध्यंतरी म्हणाले होते, 
हिरवा कंदील दाखवायचा की नारळ 
द्यायचं हे पंकजाताईंच्या हातात आहे?
हो ते बरेाबरच आहे, ते आम्हालाही मान्य आहे. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनीच एकाच बैठकीत आम्हाला कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता धस हे तीन जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व विधान परिषदेच्या माध्यमातून करत आहेत. ते त्यांच्या पद्धतीने बोलत आहेत, वक्तव्य करत आहेत करू द्या ना. 

रिपोर्टरच्या थेट सवालमध्ये धस असेही म्हणाले, 
धोंडेंना सोडून कोणालाही तिकीट द्या?
म्हणू द्या ना त्यांनी त्यांचं मत सांगितले. ते बोलले, त्यांनी मत व्यक्त केलं याचा अर्थ पक्षश्रेष्ठी त्यांचं ऐकतीलच असं नाही ना. कुठल्याही क्षेत्रामध्ये पार्टीस्पेंड करण्यासाठी चार महिन्यापासून तयारी करावी लागते. कुठल्याही क्षेत्रामध्ये स्पर्धा आहेत. मी गेल्या चार महिन्यापासून २०१९ च्या विधानसभा निवडणूक कामाला लागलो आहे. ते त्यांचं मत मांडत आहेत. धस हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यांचा तर स्पर्धेत यायचा प्रश्‍नच येत नाही. अहो त्यांना विधान परिषदेेची उमेदवारी देतांना सुद्धा माझ्यासोबत पक्षाने चर्चा केली होती. त्यावेळी पालकमंत्री पंकजाताई मुंडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धसांना उमेदवारी द्यायची की नाही? यावर बोलावून घेवून चर्चा केलीच ना. त्यावेळेस माझं मत धसांबाबत थोडं वेगळं होतं. पण पक्षाने सांगितलं, आम्ही त्यांना विधान परिषदेवर घेत आहोत. तुम्हाला तुमची विधानसभा आहेच ना. उलट विधानसभेला तुम्हाला त्यांची मदत होईल असा विश्‍वास पक्षाने दिला. तेंव्हा मी शांत राहिलो, या उलट विधान परिषदेसाठी त्यांचं काम ही केलं. 

म्हणजे तुम्हाला विचारून,विश्‍वासात घेवूनच धसांना उमेदवारी दिली,पक्षात प्रवेश दिला?
हो, जेंव्हा सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीत येण्याच्या हालचाली करत होते त्यावेळी पालकमंत्र्यांनी माझ्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देतांनाही मला विचारण्यात आलं. 

गेल्या पाच वर्षात मतदार संघात 
आपण कुठले विकास कामे केले?
या पाच वर्षाच्या कालखंडात आष्टी, पाटोदा, शिरूर या तीन तालुक्याच्या मतदार संघामध्ये अनेक विकास कामे झाले आहेत. त्यामध्ये जलयुक्त शिवार योजनेचे कामे असोत, रस्ते असतील, अनेक गावामध्ये उभारण्यात आलेले सभागृह असतील, त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे कुकडीच्या पाण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय झाला. ज्या कुकडीच्या पाण्यासाठी मी मुंबईला पायी मोर्चा काढला होता ती योजना गेल्या पाच वर्षात अर्धवटच होती. मी आमदार झाल्यावर सदरची योजना ही पूर्ण झाली. या मतदार संघात नॅशनल हायवे भरपूर झाले. मी तर असं म्हणेल आष्टी, पाटोदा, शिरूर या मतदार संघात असं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये डांबरी रोड झालेला नाही. ज्या गावामध्ये आत्तापर्यंत डांबर रोड झाला नसेल त्या गावचा रस्ता नक्कीच मंजूर झालेले असेल. या उलट मागच्या पाच वर्षात या मतदार संघात रस्त्याचे कामं झालेले नव्हते. मी तर म्हणेल या मतदार संघात म्हणण्यापेक्षा आष्टी, पाटोदा, शिरूर या तीनही तालुक्यात जेवढे रस्ते या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये झाले तेवढे रस्ते अन्य कुठल्याही तालुक्यात अथवा मतदार संघात झालेले नसतील. प्रत्येक गावाला रस्त्याने जोडण्याचे काम मी आवर्जुन केले आहे.

म्हणजे सुरेश धसांच्या कार्यकाळात
मतदार संघाचा विकास झाला नाही?
ते तीन वेळा आमदार होते, दोन वेळा भाजपाकडून एक वेळा राष्ट्रवादीकडून. त्यांनी दोन वेळा माझा पराभवही केला. परंतू मतदार संघाचा विकास झालाच असं म्हणता येणार नाही. त्यावेळी मी मुंडे साहेबांना भरपूर मदत केली होत. आठ जि.प.सदस्य दिले होते, साहेब जेंव्हा-जेंव्हा अडचणीत येत होते तेंव्हा-तेंव्हा या मतदार संघातून मी त्यांना मदत करत आलो आहे. या उलट सुरेश धस हे मुंडेे साहेबांच्या विरोधात होते. जेंव्हा सुरेश धसांनी मुंडे साहेबांना विरोध केला तेंव्हा आम्ही मुंडे साहेबांना मदत केली. साहेबांच्या राजकीय जीवनात आम्ही वेळोवेळी त्यांच्या सोबत राहिलो. 

तुम्ही मुंडे साहेबांसोबत काम केलं,आज पंकजा 
मुंडेंसोबत काम करत आहात. दोघांमधली काम 
करण्याची कार्यप्रणाली कशी आहे?
मुंडे साहेबांची कार्यप्रणाली अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. आज ताईही काम करत आहेत, ते तरूण नेतृत्व आहे, ताई त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत. 

आ.धोंडे जेंव्हा गडकरींना भेटतात तेंव्हा चर्चा होते, महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांनी मेटेंचा सत्कार स्विकारला तेंव्हा सर्व आमदार ताईंसोबत निघून जातात पण तुम्ही मुख्यमंंत्र्यांसोबतच राहतात? 

अहो जेंव्हा मी गडकरींना भेटलो तेंव्हा माझं वैयक्तिक काहीच काम नव्हतं. सार्वजनिक कामासाठी मी त्यांच्याकडे गेलो होतोे. जेंव्हा-केंव्हा सार्वजनिक काम असतात तेंव्हा सत्तेमधील अन्य मंत्र्यांकडे जावं लागतं. कामासाठी अनेक मंत्र्यांची भेटही होत असते. आणि चांगल्या कामासाठी मंत्र्यांना भेटणं अथवा त्यांच्याकडून काम करून घेणं यात काहीच गैर नाही. केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीच सरकार आहे. महाराष्ट्रात भाजपाचं सरकार आहे त्या सरकारचं मी मतदार संघात प्रतिनिधीत्व करत आहे. अशा वेळी आमच्याच पक्षाच्या केंद्रातील मंत्र्यांना भेटण्यासाठी मला कोणी बंधन घातलेलं नाही. मेटेंच्या बाबतीत बोलायचंच झालं तर त्यादिवशी मला बीडचं काहीच माहित नव्हतं. मेटेंनी लोकसभेच्या निवडणूकीमध्ये काही वक्तव्य केले होते, जे ताईंना आणि आम्हाला सुद्धा अवडलेले नव्हते. मेटेंनी तसं बोलायला नको होतं, पण ते बोलले. आता मुख्यमंत्र्यांनी थांबावं की नाही? मेटेंचा सत्कार स्विकारावा की नाही हा त्यांचा प्रश्‍न आहे. मी त्यांच्यासोबत गाडीत होतो. यांचं खाली काय चाललयं हे मला महित नव्हतं. खाली ताई गाडीतून उतरल्या, निघून गेल्या. त्यांच्यासोबत अन्य जण गेले परंतू मी वरी मुख्यमंत्र्यांसोबत होतोे. खाली काय चाललयं हे वरी लक्षात सुद्धा आलं नाही. नंतर मी रेस्ट हाऊस जवळ आलो, फ्रेश होण्यासाठी गेलो. शंका कुशंकेचं कारणच नाही आणि प्रश्‍नच उपस्थित होत नाही. 

उद्याची निवडणूकी आपण कुठल्या 
मुद्यावर लढवणार आहात?
आष्टी, पाटोदा, शिरू हा मतदार संघ अत्यंत दुष्काळी भाग आहे. बीड जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस या मतदार संघात पडतो. आज ऑक्टोबर महिना उजडला आहे. पावसाचा पत्ता नाही, गेल्या पाच-सात वर्षापासून पिण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. पडलेल्या पावसाच्या पाण्यावर या भागातली शेती होवू शकत नाही. पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जावू शकत नाही. म्हणून आम्ही या मतदार संघासाठी बाहेरचे पाणी मागत आहोत. हा भाग समुद्र सपाटीपासून उंच आहे. त्यामुळे या भागात बाहेरून पाणी लिफ्टने आणावे लागेल. आमची मागणी अशी आहे, कोकणातलं पाणी आम्हाला सरळ पाईपलाईनने द्यावं. पाण्याचा मुद्दा हा या भागातला प्रमुख मुद्दा आहे आणि ते सोडवणं माझं लक्ष आहे. यासह अन्य विकासाचे मुद्दे या निवडणूकीमध्ये असणार आहेत.

मराठवाड्याचा दुष्काळवाडा 
झालाय असं नाही वाटत का?
आता दुष्काळवाडा नाही तर हा म्हातारवाडा झालायं, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. या भागामध्ये पिण्यासाठी पाणी नाही, त्यामुळे शेतात काही पिण्याचा प्रश्‍नच येत नाही. त्यामुळे लोकांच्या हाताला काम नाही, लोक प्रचंड प्रमाणात स्थलांतर करत आहेत. मराठवाड्यातले गावची गाव ओस पडत आहेत. मी तुम्हाला माझ्या गावचं उदाहरण देतो. दहा वर्षापूर्वी माझ्या गावची मतदार संख्या ही १८०० होती आज ती १६०० झाली आहे. दहा वर्षाच्या कालखंडात मतदान वाढायला पाहिजे की कमी होयला पाहिजे? यातून हे दिसून येतं, ग्रामीण भागातला तरूण वर्ग पोटापाण्यासाठी गावाबाहेर जात आहे, राज्याबाहेर जात आहे. केवळ पाणी नाही म्हणून इथं बेरोजगारी वाढली आहे. म्हणून हा भाग दुष्काळवाड्याच्या पुढे जात म्हतारवाडा झाला आहे. गावागावात आता फक्त वयोवृद्ध माणसं राहत आहेत आणि जो थोडा फार तरूण वर्ग या ठिकाणी राहतो, जो अशिक्षीत आहे तो ही सहा महिन्याासाठी ऊस तोडणीला निघून जातो. घरात जे म्हतारे माणसं असतात एक तर त्यांना शासनाकडून दोन-पाच रूपयांच्या पागरी आहेत. कोपणवरून रेशन मिळतं, तेवढ्यावरच ते उदरनिर्वाह करतात. परंतू तरूण पोरांना केवळ दुष्काळ आहे म्हणून इथं काम मिळत नाही. दुष्काळवाड्याचा म्हातारवाडा होवून भविष्यात या मराठवाड्याला ओसाडवाडा म्हणून ओळखलं जाईल. पुढच्या २५ वर्षात पाणी नसल्यामुळे इथं माणूसही राहणार नाही. आजची परिस्थिती पहा ना, मुंबई, पुणे, महाबळेश्‍वर यासह अन्य भागामध्ये काम करण्यासाठी या भागातलाच तरूण दिसून येईल. आपल्या बायका पोरासह तो तिकडं हाताला मिळेल ते काम करतो, जागा मिळेल तिथे राहतो, पुलाखाली राहतो या स्थलांतरामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर घटली आहे. 

आजच्या या भयावह परिस्थितीला सर्वच राजकीय पुढाकारी जबाबदार आहेत?
असं नाही म्हणता येणार, परंतू काही प्रमाणात ते ही जबाबदार आहेत. आता राज्यात आणि देशात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. या भयावह परिस्थितीत मतदार संघात पाणी कसं आणता येईल याकडे लक्ष देणार आहे. सरकारची वॉटरग्रीड ही महत्त्वकांक्षी योजना राबवली जाणार आहे. त्यातून जास्तीत जास्त पाणी मतदार संघात कसं आणलं जाईल यासाठी माझे प्रयत्न असतील. 

म्हातारवाडा होत चाललेल्या मराठवाड्याला तरूण करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल?
हा मोठा विषय आहे, मी माझ्या मतदार संघापुरते सध्या बोलत आहे. तुम्ही पहा ना मराठवाड्यात ज्या भागात पाणी आहे, मोठी नदी आहे, त्या नदीला वरून पाणी येतं, तो भाग आज चांगला स्थिरावलेला दिसून येतो. पैठणचाच विषय घ्याना म्हणून मराठवाड्यामध्ये पाणी आणनं अत्यंत गरजेचं आहे. मराठवाड्यातल्या प्रत्येक भागात सिंचन क्षेत्र वाढवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सरकारकडे मी वेळोवेळी पाणी प्रश्‍नावर बोललो आहे. यापुढे मी बोलत राहणार आहे. या सरकारच्या काळात मराठवाड्यातला सिंचन क्षेत्र नक्कीच वाढेल अशी मला आशा आहे.

मागच्या काळात हरणाच्या बंदोबस्तासाठी मोर्चा काढला होता, तुमच्या काळात हरणाच्या बंदोबस्तासाठी काय केलं?
हे पहा कायद्याने हरणाला अभय दिलं आहे. त्यांना मारण किंवा पकडून ठेवणं हा कायद्याने गुन्हा आहे. परंतू जेंव्हा हरणे शेतकर्‍यांच्या पिकांची नासाडी करतात तेंव्हा वन विभागामार्फत त्या शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे पंचनामे करून त्या शेतकर्‍याला नुकसान भरपाई मिळवून दिली जाते. आता हरणापेक्षा रानडुकरांचा प्रश्‍न गंभीर आहे. ते मारण्यास सरकारने परवानगी दिली आहेे परंतू मारणार तरी किती? त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यांची उत्पत्तीही मोठ्या प्रमाणावर आहे. या परिस्थितही हरण आणि डुकरांकडून ज्या शेतकर्‍यांचे नुकसान होते त्यांना मदत मिळून दिली जाते. 

तुमच्यावर असाही आरोपात होतात, तुम्ही महाजनादेश यात्रेपासून मतदार संघापासून जास्त सक्रीय झालात?
हा राजकीय द्वेषातून केलेला आरोप आहे. वास्तविक पाहता दोन वर्षापासून मतदार संघाचा दौरा माझा सुरू आहे. मी मतदार संघात तब्बल २० दिवस पायी फिरलो आहे. सक्रीय म्हणजे काय हो? त्यावेळेस मी रोज पंचवीस किलोमीटर पायी चालायचो, लोकांना भेटायचो, त्यांच्या अडीअडचणी समजून घ्यायचो. गावातल्या प्रत्येक विकास कामाबाबत माहिती घ्यायचो. काय आहे काय नाही हे जेंव्हा लोक सांगायचे, निवेदन द्यायचे तेंव्हा त्याचा पाठपुरावा करायचो आणि आजही करत आहे. हो पण मला माझच बडवून घेता येत नाही. राईचा पर्वत करता येत नाही. मीच केले मीच केले हे सांगता येत नाही. काम करायचं असतं, लोकांचे प्रश्‍न सोडवायचे असतात, विधानसभेतही मी अनेक वेळा बोलत राहिलो. अनेक लेखी प्रश्‍न देत राहिलो, कधी तारांकित प्रश्‍न तर कधी लक्षवेधी केल्या. आजही सर्वात जास्त छावण्या याच मतदार संघात आहेत. टँकरद्वारे पाणी पुरवठा आजही गावागावांना चालू आहे. दुष्काळात जे-जे करता येईल तेवढे मी करत आहे. मी तर म्हणेल माझ्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर कामे झाली. लोकांचा संपर्क ही तेवढाच आहे. विधी मंडळातही मी सर्वात जास्त बोललो, माझे सहकारी जेंव्हा मला तुम्ही सर्वच विषयावर बोलतात कसे? असं विचारतात तेंव्हा मी त्यांना म्हणतो, मी सर्वच क्षेत्रातून आलो आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, भौगोलीक, शेती विषयक, सिंचनाचा विषय मी मांडत आलो आहे. 

समजा तुम्हाला उमेदवारी मिळाली तर 
पक्षांतर्गत विरोधकांना तुम्ही कसे तोंड द्याल?
मला असं वाटत नाही, एकदा उमेदवारी जाहीर झाल्या कोणी विरोध करेल. ठिक आहे, यातूनही जर कोणी विरोध करणार आहे तर ही लोकशाही आहे. विरोध करणारे विरोध करत राहतील. पण विरोध कोण करणार? सुरेशराव आहेत तर त्यांना विधान परिषद आहे. त्यांच्या निवडणूकीला आम्हीही प्रचार केला आहे. आज तर मी म्हणेल ज्याला कोणाला माझा विरोध करायचा असेल ते करू शकतात. मला त्याची अडचण नाही. 

मतदारांना काय आवाहन कराल?
मतदार संघातील लोकांना माझं एवढच सांगणं आहे, जो जास्त काम करतो त्याला मतदान करा. आज कोणत्याही गावात गेला तर मी केलेल्या कामाची यादी मोठी असेल. आष्टी मतदार संघात जेवढी मुले जन्म घेतात त्यापैकी ८० ते ८५ टक्केच मुले माझ्याच शिक्षण संस्थेत शिकतात. मी आजपर्यंत या मतदार संघात सर्व अंगाने काम करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांनीही मला आजपर्यंत स्विकारलं आहे. आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी लोक पुन्हा मला संधी देतील असा मला विश्‍वास आहे. 


अधिक माहिती: beed

Related Posts you may like