पराभवातून राष्ट्रवादी सावरेल का

eReporter Web Team

       जिल्हयाचं राजकारण कालही मुंडे भोवती होतं आणि आजही आहे. पुर्वी स्व. गोपीनाथराव मुंडे हे विरोधकांशी एकटे लढत होते. आज सत्तेत मुंडे आणि विरोधातही, त्यामुळे मुंडे विरुध्द मुंडे अशीच लढाई गेल्या पाच वर्षापासून जिल्हयात पहावयास मिळत आहे. धंनजय मुंडे यांच्याकडे महत्वाचं पद आल्याने धनंजय मुंडे हे जिल्हयातच नव्हे राज्यात चर्चीले जावू लागले. २०१४ च्या सत्तेत पंकजा मुंडे यांना मंत्रीमंडळात महत्वाचे खाते मिळाले. त्यामुळे त्या ही राजकारणात प्रभावी ठरल्या. विधीमंडळात जशी मुंडे यांची जुगलबंदी असते तशी ती जिल्हयाच्या राजकारणात ही पहावयास मिळत आहे. डावे आणि कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बीड जिल्हयात स्व. गोपीनाथराव मुंडे यांना जम बसवण्यात यश आलं. १९९५ नंतर सत्ता नसतांना मुंडे यांचे वर्चस्व जिल्हयात २०१४ पर्यंत कायम होतं. राज्याच्या सत्तेत असतांना राष्ट्रवादीला सुंपर्ण जिल्हा आपल्या ताब्यात ठेवण्यात शंभर टक्के यश आले नाही. स्व. मुंडे यांच्या नंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना बीड जिल्हा आपल्या ताब्यात ठेवण्यात यश येतं की नाही असा प्रश्‍न अनेकांना होता. मात्र पंकजा मुंडे यांनी राजकारणात चांगली झेप घेतली फक्त झेपच घेतली नाही तर त्यांनी त्यांचे कर्तृत्व सिध्द करुन दाखवले. 
लोकसभेत राष्ट्रवादीचा पराभव 
लोकसभा निवडणुक जिंकणं तसं सोप काम नाही. विधानसभेत आणि लोकसभेच्या मतात मोठा फरक असतो. लोकसभेत मतांचा आकडा मोठा असतो. १९९५ नंतर लोकसभेत स्व. मुंडे यांनी आपली ताकद दाखवून लोकसभेत आपले वर्चस्व सिध्द करुन दाखवलेले आहे. अपवाद जयसिंग गायकवाड एकदा राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. त्यानंतर राष्ट्रवादीला विजय मिळाला नाही. १९९९ साली राष्ट्रवादीची स्थापना झाली. पक्षाच्या स्थापनेनंतर राज्यात राष्ट्रवादी पॉवरफुल होती. मात्र जिल्हयात राष्ट्रवादीला जम बसवण्यात अपयश आलं. विशेष करुन जिल्हयाचं नेतृत्व सुरवातीपासून जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे होतं. स्व. विमलताई मुंदडा ह्या राज्याच्या मंत्रीमंडळात अनेक वर्ष मंत्री होत्या. सत्ता असतांना जिल्हा राष्ट्रवादीमध्ये करता आला नाही. २०१९ च्या लोकसेभच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने चांगलाच जोर लावला. अगदी अटीतटीचा सामना पहावयास मिळाला. सर्वसामान्य कार्यकर्ता असलेल्या बजरंग सोनवणे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने सोनवणे यांच्यासाठी राष्ट्रवादीने चांगलीच वातावरण निर्मीती केली. शरद पवार एक दिवस बीडमध्ये मुक्कामी होते. निवडणुकीच्या प्रचाराची धुरा धनंजय मुंडे यांच्या खांद्यावर होती. जुने आणि ज्येष्ठ असलेले जयदत्त क्षीरसागर यांनी वेगळी भुमिका घेतली आणि भाजपाच्या उमेदवार प्रितम मुंडे यांना आपला पाठींबा जाहीर केला. त्यामुळे राजकारणात बरेच बदल होत गेले. जसे क्षीरसागर भाजपाच्या बाजुने गेले तसे भाजपाचा घटक पक्ष असलेले आ. विनायक मेटे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठींबा दिला. त्यामुळे जिल्हयाचं राजकारण चांगलचं तापत गेलं. लोकसभेचा निकाल काय लागेल याची उत्सूकता सगळ्यांना लागून होती, पण राष्ट्रवादी कमी पडली आणि भाजपाचा विजय झाला. प्रितम मुंडे विजयी झाल्या. हा पराभव राष्ट्रवादीला चांगलाच जिव्हारी लावणारा आहे. 
यशाची हुलकावणी 
राष्ट्रवादी पक्षाला जिल्हा परिषद निवडणुकीपासून घरघर लागली. जि.प.त राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला बहुमत असतांना केवळ राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीमुळे वाद उफाळला आणि हा वाद भाजपाच्या पथ्यावर पडला. सुरेश धस यांनी बंडखोरी करुन जिल्हा परिषद भाजपाच्या ताब्यात दिली. त्यात जयदत्त क्षीरसागर यांची मदत मिळाली. जिल्हा परिेषद हातची ताब्यातून गेल्यानंतर बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादीने कराड यांना उमेदवारी दिली. मात्र त्यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने राष्ट्रवादीची चांगलीच नामुष्की झाली. राष्ट्रवादीला अपक्ष असलेल्या अशोक जगदाळे यांना पुरस्कृत करण्याची वेळ आली. भाजपाकडून सुरेश धस यांना उमेदवारी दिली गेली. बीड, लातूर, उस्मानाबाद या तिन्ही जिल्हायाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा आकडा तसा राष्ट्रवादी-कॉंग्रेसला विजय मिळवून देणारा होता. मात्र मतांची फोडाफोडी झाली आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुन्हा पराभूत झाला. या ठिकाणी पंकजाताई मुंडे ह्या राष्ट्रवादीला भारीच ठरल्या. भाजपाचे सुरेश धस विजयी झाले. जिल्हा परिषद, बीड,लातूर,उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य आणि बीडची लोकसभा निवडणुक या तिन्ही निवडणुकीत राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे राष्ट्रवादीच्या गोटात अगदी अस्वस्थता निर्माण झाली. 
जिल्हा परिषद ते लोकसभा 
प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे गणीत असतात. जिल्हा परिेषद निवडणुकीत राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या होत्या. विशेष करुन परळी आणि अंबाजोगाईतून भाजपाला एकाही गटात विजय मिळाला नव्हता. लोकसभेत परळी मतदार संघात भाजपाला लीड आहे. माजलगाव तालुक्यात जि.प.च्या सर्वच जागा प्रकाश सोळंके यांच्या ताब्यात आल्या होत्या. बीड मध्ये फक्त एकच जागा जयदत्त क्षीरसागर यांना मिळाली. संदीप क्षीरसागर यांनी तीन जागा मिळवल्या होत्या. गेवराईत अमरसिंह पंडीत यांना तीन जागा मिळाल्या होत्या. आष्टीत धसांना ज्या जागा मिळाल्या होत्या. ते सगळे उमेदवार राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने बाजी मारली होती पण ही बाजी कायम राष्ट्रवादीच्या सोबत राहिली नाही. लोकसभेच्या निवडणुकीची आकडेवारी पाहितली तर ग्रामीण भागात भाजपाच पुढे आहे. राष्ट्रवादी सगळीकडेच पाठीमागे पडलेली आहे. आष्टी मतदार संघात सुरेश धसांनी कमालच केली. भाजपाला सत्तर हजाराची लीड मिळवू दिली. त्यानंतर गेवराई मतदार संघाचा दुसरा क्रमांक आहे. ज्या माजलगावमध्ये जिल्हा परिेषदेचे सगळे उमेदवार निवडून येतात त्या माजलगावमध्ये भाजपाला लीड मिळाली आहे. एकुण सगळेच राष्ट्रवादीचे शिलेदार लोकसभेत आप-आपल्या मतदार संघातून लीड देण्यास अपयशी ठरले. जिल्हा परिेषद निवडणुकीची लीड लोकसभेत दिसली नाही. लोकसभेला जिल्हयातील जनतेने भाजपाला स्विकारून राष्ट्रवादीला सरळ-सरळ नकार दिला हे या निकालावरुन दिसून येत आहे. 
शिवसेना बळकट होतेय 
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा हे दोन्ही पक्ष वेगळे निवडणुक लढले होते. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या दोन्ही पक्षांनी युती केली. त्यामुळे दोन्ही पक्षांचे नुकसान टळले. बीडमध्ये शिवसेनेचा बरा जनाधार आहे. बीड मतदार संघात शिवसेनेला तीनदा गुलाल लागलेला आहे. त्यामुळे बीडमध्ये शिवसेनेचं वर्चस्व चांगलं आहे. युती बीड भाजपासाठी चांगलीच निर्णायक ठरली. जिल्हा परिेषद निवडणुकीच्या वेळी गेवराईचे माजी. आमदार बदामराव पंडीत यांंनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेची जिल्हयात ताकद वाढली. त्यातच बीडमधील राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेले जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपाच्या उमेदवार प्रितम मुंडे यांना पाठींबा दिल्याने भाजपाचा विश्‍वास अधिकच वाढला. जिल्हयातील शिवसेना ही भाजपाच्या बाजुने उभी राहिली. त्यामुळे भाजपाच्या उमेदवाराचा विजय सोपा झाला. जशी भाजपाला शिवसेनेची साथ मिळाली तशी कॉंग्रेस पक्षाची राष्ट्रवादीला कितपत साथ मिळाली? आज पर्यंत कॉंग्रसेच्या भुमिकेबाबत संशयच व्यक्त करण्यात आलेला आहे. जिल्हा परिषद सदस्य असलेले देशमुख यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाला समर्थन दिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा जो महत्वाचा घटक पक्ष कॉंग्रेस आहे तो कितपत राष्ट्रवादीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला याचं आत्मचितंन कॉंग्रेसवाल्यांनी केलं पाहिजे? गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कॉंग्रेसची अवस्था बिकट आहे तशी बीड जिल्हयातील कॉंग्रेस पुर्वीच सलाईनवर होती. आता तर अगदी नामशेष होण्याची वेळ या पक्षावर आली. कॉंग्रेस सारखीच शिवसेनेची अवस्था होती, पण बदामराव पंडीत यांच्या नंतर जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने जिल्हयात शिवसेना वाढेल हे नाकारुन चालणार नाही. शिवसेनेचा दबदबा वाढला. बदामराव यांच्यामुळे शिवसेनेचे चार जिल्हा परिषद सदस्य आहेत. आज पर्यंत एका तालुक्यातून शिवसेनेचे इतके सदस्य कधीच निवडून आले नव्हते. प्रा. सुरेश नवले यांनी जिल्हयात शिवसेना चर्चेत आणली होती. नवले यांच्या रुपाने जिल्हयात पहिला आमदार बीड मतदार संघातून शिवसेनेचा निवडून आला होता. अनेक वर्षानंतर जिल्हयात शिवसेनेची ताकद वाढत असल्याचे दिसून येऊ लागले. दोन बडे नेते शिवसेनेत आल्याने नक्कीच भाजपाच्या बरोबरीने शिवसेना वाढू शकते? 
विधानभेचा प्रवास कठीण 
लोकसभेत भाजपाचा उमेदवार निवडून आल्याने जिल्हयातील भाजपामध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले. सगळयाच मतदार संघात भाजपाला लीड मिळाल्याने कुठलेच मतदार नाराज नाही असं दिसून आलं. लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेचं गणीत ठरत असतं. आपण का हारलो? कुठं कमी पडलोत याचं आत्मचितंन राष्ट्रवादीला करावे लागेल. लोकसभेत पराभव झाला. खचुन जावू नका असं आवाहन शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केलेलं आहे. येत्या काही महिन्यावर राज्याच्या विधानसभा निवडणुका होणार आहे. राष्ट्रवादीच्या इच्छूकांना प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. लोकसभेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे अशीच लढत होती. जिल्हयात नेमकं कोणाचं वर्चस्व हे सिध्द करण्याची संधी लोकसभेत होती. पण लोकसभेचा निकाल पाहता भाजपाचेच वर्चस्व जिल्हयात कायम राहिलं. आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा मुंडे विरुध्द मुंडे लढत रंगणार आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला आपली ताकद दाखवण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. विधानसभा दोन्ही मुंडेचं भवितव्य ठरविणारी निवडणूक ठरणार आहे. लोकसभेचा निकाल पाहता विधानसभेची वाट राष्ट्रवादीसाठी कठीणच आहे. वंचीत बहुजन आघाडी राष्ट्रवादीच्या विजयाचा मार्ग रोखणारी ठरु शकते? वंचीत बहुजन आघाडी वेगळी लढली तर अवघडच आहे. बीड जिल्हयात ९२ हजार मते वंचीतला पडलेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात कमलाची अस्वस्थता असून राष्ट्रवादीसाठी विधानसभेचा घाट सर करणे मोठे आव्हान ठरणार आहे.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like