विद्यापीठातलं  भूत कुणाचं?

eReporter Web Team

हलवूनी खुंट | आधी करावा बळकट
मग तयाच्या आधारे | करने ते अवघे बरे 

विद्यापीठातलं 
भूत कुणाचं?

गणेश सावंत
माहिती तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या आविष्काराने प्रफुल्लीत झालेल्या आजच्या युगात आम्ही चंद्रावर जावून आलो, मंगळाचाही शोध घेतला. आकाश-पाताळ शोधण्याची किमया केली. परंतु केेंद्रात जेव्हापासून भाजपाचं सरकार आलं आहे तेव्हापासून देशात कुठल्या ना कुठल्या कारणावरून अस्थिरता निर्माण होत आहे, ही अस्थिरता भाजप शासीत प्रदेश असो वा देश असो त्याठिकाणी ती कायम पहायला मिळते. काल-परवा उत्तर प्रदेशात थेट विद्यापीठातच एक खतरनाक निर्णय घेतला गेल्याचे सांगण्यात आले. बनारसच्या बीएचयू विद्यापीठात आता भूत विद्या शिकवली जाणार आहे. आत्मा, भूतबाधा, पछाडणे यावर शिक्षण दिले जाणार आहे. विद्यापीठातच जर असे विषय घेतले जाणार असतील तर खरच आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगाबरोबर चालत आहोत का हा प्रश्‍न पडल्याशिवाय राहणार नाही. ज्या प्राध्यापकांनी हा अभ्यासक्रम रचला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ग्रामीण भारतात आजही अंधश्रध्देचा मोठा पगडा आहे त्यामुळे एखादी व्यक्ती खर्‍या उपचारापासून वंचित राहू शकते. हा कोर्स केलेला व्यक्ती मानसिक उपचार न मिळाल्याने त्या भूतबाधा मानली जाणार्‍या भागात जावून रुग्णांवर उपचार करणार आहे. परंतु भूत हा विषय अभ्यासक्रमात न आणता आजपर्यंत मानसोपचार तज्ञ अशा लोकांचा उपचार करतच आले आहेत. परंतु विद्यापीठात असे विषय घेऊन थेट विद्यापीठातूनच अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचा जोडधंदा तर काही तथाकथीत धर्ममार्तंडांनी सुरू केला नाही ना? असा सवाल पडल्याशिवाय राहत नाही.
  भूत भविष्य कळो
  भूत भविष्य कळो यावे वर्तमान |
  हे तो भाग्यहीन त्याची जोडी ॥
  जगरुढीसाठी घातले दुकान |
  जातो नारायण अंतरुनि ॥
भूत भविष्य वर्तमान या विषयी जाणून घेणे हा तर भाग्यहिनांचा उद्योग आहे. सर्व शक्तिमान अशा हरीला मनामध्ये विराजमान केल्यानंतर याची काय गरज? आपल्या स्वार्थासाठी त्या भाग्यहिनांनी हे दुकान मांडले आहेत, आणि अशा दुकानांचे ग्राहक आपण झालो तर त्या सर्व शक्तिमान हरीपासून आपण दूर जावू असं जगद्गुरू तुकोबांनी सोळाव्या शतकात म्हटलं आहे. भुतांवर अभ्यास थेट विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून करून घेणं किंवा भूत विद्या तरुणांना शिकवणे हे मागासपणाचं लक्षण म्हटलं जाईल. हिंदू धर्मातच नव्हे तर मुस्लिम, ख्रिश्‍चन, ईसाई सह अन्य छोट्या-मोठ्या धर्म-पंथांमध्ये आजही भूतबाधेचा येडगळपणा पहावयास मिळतो. एकीकडे अंधश्रध्देच्या विरोधात राण पेटवलं जातं, विज्ञानाला महत्व दिलं जातं आणि दुसरीकडे उत्तर प्रदेशातलं एक विद्यापीठ भुतांचं विषय घेऊन शिकवायला तयार होतं. भुतांविषयी शिकवणं आणि त्याला मानसिक उपचाराची पद्धत म्हणणं हा तर धादांत खोटारडापणा आणि मागासलेपणा म्हणावा लागेल. जगद्जेता होऊ पाहणार्‍या हिंदूस्तानाला जगाच्या पाठीवर सर्वात तरुण देश असलेल्या या भारतात असा वेडगळपणा विद्यापीठातच होत असेल तर हे भारतीयांचं दुर्दैव नव्हे का? महाराष्ट्रात निपजलेल्या प्रत्येकाला अंधश्रद्धेविरोधात चीड आहे. विद्यापीठातून शिक्षण द्यायचच असेल तर वंश उद्ध्वस्त होण्याची धमकी देणार्‍या तथाकतीत धर्ममार्तंडांच्या उरावर थयाथया नाचून पुण्या परगण्यातील पहार शिवबांच्या हातातून उपसून फेकणार्‍या 
  जिजाऊंचा अभ्यासक्रमात 
   समावेश 
उत्तर प्रदेश सरकारने विद्यापीठात केला असता तर भुतांचा अभ्यासक्रम आणणार्‍यांचे टाळके ठिकाणावर राहिले असते. सोळाव्या शतकामध्ये इंग्रज, पोर्तुगज, डच, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, औरंगजेब महाराष्ट्राचे चोहीबाजुने लचके तोडत होते. आमच्यातलेच काही तथाकथीत पाटीलपांडे आणि उच्चवर्णीय या शाहींच्या घरी मुजरे घालत होते, पाणी भरत होते, परंतु अशा स्थितीत जिजाऊ मॉ साहेब ताठरतेने या सर्वांविरोधात उभा राहिल्या होत्या. त्यांना सर्वाच आधी लोकांची भीती घालवायची होती. ती सुरुवात अंधश्रध्दा दूर करून त्यांनी केली होती. ओसाड पुणे परगण्यावर कोणीही वस्ती करून राहू नये, तिथली जमीन कसू नये म्हणून मोरार जगदेव नावाच्या पातशहाच्या एका सरदाराने लोखंडी पहार त्याठिकाणी रोवली होती. त्यावर फाटके वहान (चप्पल) लटकवली होती. याचा अंधश्रध्देत अर्थ असा होतो जो कोणी हे पहार काढीन आणि या ठिकाणी वस्ती करून राहील अथवा जमीन कसेल त्याचा निर्वंश होईल. जिजाऊ मॉ साहेबांनी पाच-सहा वर्षाच्या शिवबांच्या हाती सोन्याचा नांगर देऊन पुणे परगण्यात जमीन कसली. वस्ती करून त्या राहिल्या. त्या वेळेस निर्वंश होण्याची भीती दाखवणार्‍या तथाकथीत देव बाप्पांना त्यांनी खडसावून सांगितलं, एकाने धार्मिक दहशतवाद माजवायचा आणि दुसर्‍या देव बाप्पाने तो जोपासायचा हे आता चालणार नाही. अंधश्रध्दा दूर करण्यासाठी अभ्यासक्रम आणायचेच असतील तर शाहू, फुले, आंबेडकरांसह जिजाऊ मॉ साहेबांचे अभ्यासक्रम विद्यापीठात आणा,  यापेक्षाही खडे बोल सुनावणारे ‘सत्य आम्हा म्हणी, नव्हे गभाळ्याचे धनी देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावियासे बरे’ म्हणणार्‍या संत तुकारामांचा जिवनपट गाथेच्या माध्यमातून विद्यापीठात मांडा, तथाकथीत धर्ममार्तंडांविरोधात अंधश्रध्देविरोधात आवाज उठवणारे जगदगुरू संत तुकाराम यांनी त्याकाळी समाजाच्या तथाकथीत व्यवस्थेविरोधात विद्रोह केला होता. विद्यापीठातून शिकवायचच असेल तर 
  ‘विद्रोही तुकाराम’ 
  हे विषय शिकवायला हवेत. ‘भुके नाही अन्न मेल्यावरी पिंड दान’ म्हणणार्‍या तुकोबांनी अंधश्रद्धेवर प्रचंड आसुड ओढले आहेत. बाई, बाबा आणि दगडाचा देव भुत दया यावर प्रचंड भाष्य त्यांनी आपल्या गाथेतून केल्याचे दिसून येते. तुकोबांची गाथा अभ्यासक्रमात आली तर भुतबाधा नक्कीच जवळ येणार नाही आणि भुतबाधा म्हणत मानसिक आजारी असणार्‍या माणसाचे ब्रेन वॉश करण्याचे काम तुकाराम गाथेचा अभ्यास करणारे विद्यार्थी नक्कीच करू शकतील, परंतु उत्तर प्रदेशातल्या बनारस  येथील बीएचयू विद्यापीठाने  भुत विद्या शिकवण्याचा जो मानस ठेवला आहे आणि त्याला आयुर्वेदातील आठव्या भागाचा आधार दिला आहे तो धादांत आजच्या तरुण पिढीला मानसिकदृष्ट्या आजारी करावयास लावणारा भाग म्हणावा लागेल. या देशामध्ये एवढे साधू-संत-सुफी आणि समाजसुधारक होऊन गेले की त्यांनी सोळाव्या शतकापासून आणि त्याआधी अंधश्रध्देचं भूत लोकांच्या डोक्यातून उतरवून टाकलं. क्षत्रिय असलेले गौतम बुद्ध जेव्हा जंगलात फिरायला गेले त्या वेळेस त्याठिकाणी यज्ञ चालू होता आणि त्या जळत्या यज्ञात पांढराशुभ्र जीवंत घोडा टाकला जाणार होता त्यावेळी बुद्धांनी उपस्थित ऋषिंना याबाबत विचारले तेव्हा ऋषिमुनींनी सांगितले, ‘हा यज्ञ केला आणि पांढराशुभ्र घोडा या जळत्या कुंडात टाकला तर तो धुरा धुराने स्वर्गात जाईल आणि आपल्या पुर्वजांची भेट घेईल त्यावेळेस गौतम बुद्ध म्हणाले होते, ‘एकतर तुम्ही त्या जळत्या अग्निकुंडात जा आणि तुम्हीच धुरा धुराने तुमच्या आप्तस्वकियांची भेट घ्या. विद्यापीठात अभ्यासक्रम घ्यायचाच असेल तर प्रबुद्ध गौतम बुद्धांचा अभ्यासक्रम घ्यायला काय हरकत आहे. संत नामदेवांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यास काय हरकत आहे. जगद्गुरू संत तुकारामांपासून असे कित्येक विद्रोही आणि जनतेचे हित जोपासणारे समाजसुधारक संत महामुनी या जगाच्या पाठीशी होऊन गेले आहेत त्यांचे ध्येय-धोरण त्यांनीच शब्दबद्ध केलेल्या काव्यातून उघडपणे दिसत आहेत, मग अशा गाथा अभ्यासक्रमात का नसाव्यात? संत तुकारामांनी शेती, अंधश्रध्दा, माणसांचे खानपान, व्यवहार, भाव-भक्ती, ज्ञान-विज्ञान, अध्यात्म यावर प्रचंड लिखान केलं आहे. चार ओळीच्या अभंगातून तुकोबांनी कधीही न भंग पावणारे विचार दिले आहेत. अंगात येणार्‍या लोकांच्या तना-मनात विवेकाची ज्योत पेटवलेली आहे, मग अशा जित्याजागत्या विद्यापीठ असणार्‍या माणसांचे विषय विद्यापीठात न शिकवता तथाकथीत जे कधीही न दिसणारे, अनुभव न येणारे भुतांसारखे दंतकथेचे विषय अभ्यासक्रमात आणून उत्तर प्रदेशातील त्या विद्यापीठाला नेमके काय साध्य करायचे आहे? आणि तेथील सरकारने तरी असे विषय विद्यापीठात शिकवण्यास मान्यता तरी कशी दिली? ज्ञान-विज्ञानचा आवाज वाढवणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तरुणांच्या विषयांव भाष्य करतात, मग उत्तर प्रदेशात स्वत:च्याच पक्षाचं सरकार असताना तेथील विद्यापीठात भुतांचा विषय शिकवला जातो हे प्रगतीचं लक्षण आहे की अधोगतीचं? असे एक ना अनेक प्रश्‍न आता उपस्थित होतात. उत्तर प्रदेशातल्या एका विद्यापीठात हा विषय शिकवला म्हणजे अवघ्या देशामध्ये हा विषय शिकवला जाईल, असं आम्ही म्हणणार नाहीत, परंतु विद्यापीठ हे विद्यापीठ आहे, ते ज्ञानपीठ आहे आणि अशा ज्ञानपीठातून अंधश्रद्धेचे कस बाहेर पडणार असतील तर त्या विद्यार्थ्यांचं काय आणि त्या देशाचं, त्या राज्याचं भविष्य ते काय? जर भूताटकी संपुष्टातच आणायची तर आम्ही डंके की चोटपर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची गाथा उत्तर प्रदेशच नाही तर देशातल्या प्रत्येक विद्यापीठासह शाळा, महाविद्यालयातून शिकवली जावी, ती अभ्यासक्रमात आणली जावी. 
 


अधिक माहिती: beed

Related Posts you may like