आप ’बाप ’

eReporter Web Team

’शहा’णपणा कुठेही चालत नसतो, काही ’भक्त’आपल्या सोबत आहेत, म्हणजे संपुर्ण देशाचा आपल्याला पाठींबा आहे असं होत नाही.  झारखंड राज्याच्या निकालातून भाजपाने काहीच धडा घेतला नाही, हे दिल्लीच्या निवडणुकीत दिसलं, दिल्ली आपली आहे, आपल्याकडे केद्राची सत्ता आहे म्हणजे दिल्लीत काही ही करता येतं असा समज भाजपाचा झाला, एवढेच नव्हे तर भाजपाने दिल्लीत काय-काय ’राडे’ केले याचे किस्से आता समोर येवू लागले, जामिया महाविद्यालयात धुडघूस घालून जो अमानुषपणा दाखवला तो नक्कीच कोणत्याही चौकटीत बसणारा नाही, जामियाच्या बाबतीत भाजपाच्या ’बालीश’ नेत्यांनी नको ती वाचाळ बडबड करुन आपल्या आकलेचे तारे तोडून स्वत:चे हासू करुन घेतले. जामियामध्ये पोलिसां मार्फत जो धुडघुस घातला त्याचा व्हिडीओ समोर आल्याने भाजपाचा खरा चेहरा त्यातून दिसून येतो, जामियात विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण झाली ते समोर आले, मारहाण झाली नसल्याचा दावा भाजपाचे खोटारडे नेते करत होते. या घटनेला आणि शाहीनबागच्या आंदोलनाला दिल्लीच्या राजकारणाशी जोडण्याचा प्रयत्न भाजापाने जाणीव पुर्वक केला, यातून मताचे विभाजन करुन आपली राजकीय दुकानदारी चालवण्याचा खटाटोप होता, पण दिल्लीच्या जनतेने भाजपाला पाणी पाजून एक आदर्श विचाराची पेरणी केली. 
ही हिटलरशाही
चांगलं राजकारण केलं तर लोक नाव घेतात. वाईटाचं नाव निघत नाही, निघालं तरी तो वाईट होता असं निघतं, हिटलर हा क्रुर होता, त्याने अनेकांना जिवंत मारलं, त्यामुळे त्याचा इतिहास सगळ्यांनाच ज्ञात आहे. त्याच पावलावर पाऊल टाकून देशातील सर्व सत्तास्थाने आपल्याकडे रहावीत हा उद्देशच भाजपाच्या नव्या हिटलरशाहींचा आहे? नवा हिटलर जन्माला येतो की काय असचं दिसून येवू लागलं. तोडा-फोडा आणि राज्य करा या नितीची अवलंबून इंग्रजांनी केला होता, तीच निती भाजपावाले वापरु लागले, पण भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. येथे सगळे लोक एकोप्याने राहतात. जाती-धर्माच्या नावाने राज्य करणारांना जास्त दिवस राज्य करता येत नाही हा भारताचा इतिहास आहे, ज्या गतीने भाजपाने देशातील सत्तास्थाने हास्तगत केली,त्याच गतीने भाजपाला लोक दुर सारु लागले. भाजपाच्या ताब्यातून एक-एक राज्य कमी होवू लागले. त्याला कारण म्हणजे भाजपाने चालवलेली धर्मांध राजकीय निती आहे. 
एकट्या केजरीवाल यांना घेरलं 
अरविंंद केजरीवाल यांचा राजकीय उदय अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून झाला. केजरीवाल यांनी 2015 च्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीत घवघवीत यश मिळवून सगळ्या राजकीय पक्षांच्या ’मुस्कटात’ मारली होती, पाच वर्षात केजरीवाल यांनी दिल्लीत कामे करुन दाखवली, कामे केल्यानंतरच केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेला मते मागितली. केजरीवाल यांना केंद्राने नेहमीच आडचणीत आणण्याचा जाणीव पुर्वक प्रयत्न केला, कितीही अडचणी आणल्या तरी केजरीवाल हे डगमगले नाहीत. त्यांनी आपले कार्य सुरुच ठेवले, दिल्लीच्या एका राज्याच्या निवडणुकीसाठी केंद्राचं संपुर्ण मंत्रीमंडळ, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री योगी, खासदार, आमदार, माजी मंत्री हा सगळा लवाजमा दिल्लीत प्रचारासाठी दाखल होता. ह्या सगळ्याशी एकट्या केजरीवाल यांनी टक्कर दिली. दिल्लीची निवडणुक भाजपाने इतकी प्रतिष्ठेची केली की, जणु काही हे महायुध्दाच होतं, एका केंद्रशासीत प्रदेश असलेल्या राज्याच्या निवडणुकीत इतकी प्रतिष्ठा आज पर्यंत कुणी पणाला लावली नाही ती, भाजपाने लावली, आणि आपलं नाक कापून घेतलं.  
शाहीनबागला कोसलं 
एनआरसी, सीएएच्या विरोधात गेल्या दोन महिन्यापासून दिल्लीच्या शाहीनबाग येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन होत आहे. या आंदोलनाबाबत भाजपाच्या वाचाळांनी आपली ’वाणी’ किती खालच्या पातळीची आहे हे दाखवून दिलं. शाहीनबागचं आंदोलन म्हणजे केजरीवाल यांना सहकार्य अशी भाजपाच्या नेत्यांनी आवाई उठवून आंदोलना बाबत अपप्रचार केला. आंदोलनाच्या स्थळी बिर्याणी येते कुठून? हा खर्च करतो कोण? या आंदोलनात कोण सहभागी आहेत, असे अनेक फालतू प्रश्‍न निवडणुकीत उपस्थित करुन आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. देश के गद्दारोको गोली मारो सालोको अशी अतिरेकी भाषा केंद्रीय राज्यमंत्री ठाकुर यांनी वापरली, खालच्या पातळीवर जावून भाजपाचे लोक बोलले, तसेच केजरीवाल यांना केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी  देशद्रोहीच ठरवून भाजपावाले देशभक्त ठरले होते. ज्यांना विधानसभा,लोकसभा निवडणुकीत स्वत:चा विजय मिळवता आला नाही ती मंडळी दिल्लीत जावून केजरीवाल यांच्या विरोधात बोलत होती, ही एक अर्श्याचीच बाब होती. महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पाटील दिल्लीत जावून घरोघरी पॉम्पलेट वाटत होते, चंद्रकांत पाटील यांना राज्याच्या राजकारणाचा मेळ लागला नाही ते दिल्लीत जावून प्रचार करत होते, दिल्लीकरांना पाटील यांची भाषा किती प्रमाणात समजली माहित नाही? त्यांच्या पॉम्पलेट वाटपामुळे एक ही आमदार निवडून आला नाही, महाराष्ट्राच्या भाजपात एकमत नाही, बंडखोरीने भाजपाला घेरलं, पाटील यांनी आधी राज्याच्या भाजपातील निष्ठावंताना न्याय द्यायाला हवा, व नंतर इतर राज्याच्या निवडणुकीत सहभागी व्हावे, पाच वर्ष राज्यात भाजपाचे सरकार होते, पाच वर्षात फडणवीस यांच्या सरकारने काय विकासाचे दिवे लावले? त्यापेक्षा केजरीवाल यांनी विकासाचे मॉडेल देशासमोर ठेवले. 
काय मिळालं? 
दिल्लीच्या निवडणुकीत भाजपाने जशी प्रतिष्ठा पणाला लावली तितक्या अपेक्षीत जागा भाजपाच्या निवडून आल्या नाहीत, केजरीवाल 62 जागांवर जिंकले, भाजपाला फक्त आठच जागा मिळाल्या. ह्या आठ जागासाठी भाजपाने कोट्यावधी रुपयाची उधळून करुन काही दिवस दिल्लीला वेठीस धरलं होतं. मात्र लोकांनी केजरीवाल यांना पसंदी देवून मोदी, शहांना सपसेल नाकारुन चांगलाच तडाखा दिला.  देशात अनेक प्रश्‍न आहेत. ह्या प्रश्‍नां बाबत भाजपाच्या लोकांनी तितकं गांभीर्याने घेतलं नाही. जितकी प्रतिष्ठा दिल्लीच्या निवडणुकीत लावली तितकीच प्रतिष्ठा देशाच्या शेतकर्‍यांच्या, बेरोजगारंाच्या प्रश्‍नासाठी लावली असती तर भाजपाचं नाव लोकांनी घेतलं असतं, पण भाजपाला समाजीक हिताचं शहाणपण सुचत नाही, कुठं ही जात,धर्म दिसतो.  सीएए, एनआरसीच्या विरोधात देशभरात आंदोलन होत आहे. ह्या आंदोलनकर्त्यांशी साधी चर्चा करण्याचं काम भाजपाने केले नाही, याचा अर्थ लोकांशी भाजपाला देणं-घेणं नाही. शाहीनबागचं आंदोलन म्हणजे मुस्लिमांचं आंदोलन समजून त्यांच्या मागणीकडे भाजपा का दुर्लक्ष करतयं?  2014 च्या निवडणुकीत भाजपाला मुस्लिमांंचे मते चालली, पण मुस्लिमांनी केलेले आंदोलन आता चालेना? सीएए, एनआरसीचा हा मुद्दा हा फक्त मुस्लिमापुरता नाही, त्याचा त्रास सगळ्यांनाच होणार आहे. यात एवढचं की, मुस्लिमांमध्ये त्याची जास्त प्रमाणात जागृकता निर्माण होवून कायद्याच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. आंदोलन करणार्‍यांना  भाजपा देशविरोधी ठरवत असेल तर अशा कुचक्या मानसीकतेला काय म्हणावं? 
विकासाशिवाय पर्याय नाही 
भाजपावाले काही करत नाही पण फुशारक्या मात्र जास्त मारत असतात. आज पर्यंतच्या सत्तेच्या काळात भाजपाने लोकांच्या नजरेत भरेल असं कोणतचं चांगलं काम केलं नाही, जेणे करुन लोकांना त्याचा फायदा झाला. केजरीवाल यांनी गेल्या पाच वर्षात दिल्लीचा चेहरा मोहरा बदलला, पण हा बदललेला चेहरा खराब करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. दिल्लीत मोफत शिक्षण, पाणी, विज या सुविधा मिळतात. या मोफतला भाजपाने निवडणुकीचा मुद्दा बनवून ही नुसती स्टंटबाजी असल्याच्या पुड्या सोडल्या, आज शिक्षणाची काय अवस्था आहे हे अवघा देश जाणून आहे. अशा परस्थितीत केजरीवाल सारखा मुख्यमंत्री गोर-गरीबांच्या मुलांना मोफत शिक्षण देत असेल तर तो चांगला उपक्रम नाही का? भाजपाच्या काळात महाराष्ट्रात तेराशे मराठी शाळा बंद करण्यात आल्या, तसा उपक्रम तर केजरीवाल यांनी दिल्लीत राबवला नाही? मराठी शाळा बंद करणारे महाराष्ट्राचे माजी मंत्री दिल्लीत केजरीवाल यांच्या विरोधात प्रचारात होते, दिल्लीच्या शाळा पाहून माजी मंत्र्यांना नक्कीच मनातल्या मनात आपलीच लाज वाटली असेल? लोकांना जाती-धर्माच्या लढाया नको आहेत. जग कुणीकडे चाललं आणि आपण निवडणुकीत कुठले मुद्दे पुढे आणतोत याचा विचार पुढारी का करत नाहीत? गुजरात मॉडेल विकासाच्या चर्चेचा विषय बनला होता, मात्र  मोदी पंतप्रधान झाले, तसाच विकासाचा मुद्दा मागे पडला आणि जाती-धर्माचे प्रश्‍न  पुढे आले. जाती-धर्माच्या लढायांनी भुकेलेल्या पोटाला अन्न मिळणार नाही, किंवा बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार नाही? त्यासाठी विकासचं करावा लागणार आहे. दिल्लीत ’आम’ जनतेचं राज्य आणण्यात केजरीवाल यशस्वी झाले, त्यांनी इतिहास घडवला. एकीकडे विरोधात प्रचंड भाजपाचे सैन्य, बडे नेते आणि दुसरीकडे फक्त एकटे केजरीवाल ते ही हातात झाडू घेवून, झाडूने भाजपाची दाणादाण उडवून टाकली. खराटा हा फक्त स्वच्छतेचं काम करत नाही तर तो वेळ पडली तर फटके  मारु शकतो हे केजरीवाल यांनी दाखवून दिलं. केजरीवाल ’बाप’ ठरले, आता तरी भाजपाने भानावर येवून विकासाचं राजकारण करावं. दिल्लीच्या निवडणुकीत जरा जास्तच झालं याची उपरती गृहमंत्री अमित शहा यांना आली. लोक डोक्यावर घेवू शकतात आणि डोक्यावरुन खाली अपटू शकतात हे भाजपाने लक्षात घेतलं पाहिजे.


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like