आदि मानव ते प्रगत माणुस

eReporter Web Team

मजीद शेख l बीड 

पृथ्वीचा जन्म हजारो अब्ज वर्षाचा असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. पृथ्वीच्या जन्माबाबत वेगवेगळी मते तज्ञांमध्ये आहेत. पृथ्वीवर पुर्वी माणुस माकडाच्या स्वरुपात होता आणि नंतर त्याच्यात बदल झाला, असं ही मानलं जातं,चार पायावरचा माणुस दोन पायावर आला, आणि बदलाला सुरुवात झाली. माणसाचा मेदु छोटा असला तरी तो कार्यक्षम ठरु लागला. माणुस विचार करु लागला. जसा तो विचार करु लागला, तशीच त्याच्यात प्रगल्भता निर्माण होऊ लागली. जगात एकमेव प्राणी मानव आहे, त्याने भाषा अवगत केली, तो बोलू लागला. एकच भाषा नाही तर कित्येक भाषांचा तो निर्माता झाला. आदि मानव जंगलात फिरुन जगण्यासाठी धडपड करत होता. अन्नाच्या शोधात तो इतर प्राण्यासारखा फिरत होता. गुहेत राहून गुजरान करत होता.गुहा हेच त्याचं घर होतं, त्याला विचाराचा, कुटूंबाचा कसलाही गंध नव्हता, पण हाळूहाळू जसा तो विकसीत होऊ लागला, तसा तो टोळीने राहू लागला. एकत्रीत राहून शिकार करु लागला. शिकार करण्याचे त्याचे साधने दगड असायचे, शिकार करुन तो पोट भरत होता. पोटासाठी दहीदिशा त्याची भटकंती होत होती. उन्ह, पाऊस, थंडी, भुकंप, लाव्हा, वादळ इत्यादी निर्सगात घडामोडी घडत असल्याने याचं त्याला कुतुहूल वाटत होतं आणि भीतीही, पण त्याच्या ते अंगवळणी पडलं आणि तो निसर्गाशी एकरुप होऊन पुढे चालू लागला. त्याच्यातला होत असलेला बदल त्याला एका जागी स्थिर करु लागला. भटकणारा माणुस वसाहत करु लागला, तेव्हा पासून माणसाचे एक वेगळे जग निर्माण झाले.
खेडे वसले,आराजकतेचा जन्म
टोळीने राहणारा माणुस गाव वसू लागला. गावांची निर्मीती झाली, जगण्यासाठी जी काही साधणे लागतात ती त्याने निर्माण करण्यास सुरुवात केली. त्याच्यातला कलाकार, चित्रकार, विज्ञानवाद जागा झाला. मातीचे भांडे निर्माण झाले, राहण्यासाठी छताची निर्मीती होऊ लागली. शेतीचा शोध लागल्याने, अन्नाची निर्मीती होऊ लागली. अन्नासाठी शिकार करणारा माणुस शेती पिकवू लागला. जसा तो विकासात पुढे जात होता तसा तो हावरट आणि खुनशी, धोकेबाज ही बनत होता. मुळात त्याच्यात तो गुण पुर्वीपासूनच होता. गावात एकत्रीत राहणारा माणुस भांडण,तंटे करण्यात कमी नव्हता. लुटा-लुटीची सुरुवात झाली. काम करणारी एक वृत्ती व निष्क्रीय असणारी दुसरी प्रवृत्ती जन्माला येत होती. चांगलं आणि वाईट या दोन्ही बाबी एकत्रीत नांदत होत्या. स्वार्थीवृत्तीतून रक्तपाताच्या घटना घडत होत्या. सत्तेचा, संपत्तीचा मोह त्याला भारावून टाकत होता. त्याच्यात एक विलासी वृत्ती निर्माण झाली. त्याने विषमतेला जन्म घातला. हुकूमशाहीला बळ दिलं, हिंसेतून कौर्य घडू लागलं. जसा माणुस प्रबळ, बुध्दीमान होत गेला तसाच तो विनाशाकडे वाटचाल करत होता. त्याच्यासाठी महिला एक भोगवस्तू ठरत होती. आपल्या हुकूमशाहीसाठी त्याने युध्दाचा आरंभ सुरु केला. युध्दातून रक्त,मासांचा चिखल होऊ लागला. युध्दात मरणारांची संख्या हजारोंच्या संख्येने होती, युध्दात जिंकणं हेच त्याचं ध्येय होतं. तो क्रुर होत गेला. साम्राज्यशाही,भांडवलशाही, हुकुमशाही त्याने जन्माला घातली. यामुळे माणुस माणसाला परका झाला, तो सत्तेसाठी एक दुसर्‍याला गुलाम करु लागला. या सगळ्या घडामोडीत काही चांगलेही होते, पण त्यांची तितकी दखल घेतली जात नव्हती. चांगल्याचा इतिहास आज ही अजरामर आहे.
निसर्गाची लुट
माणसात जसी विकासदृष्टी निर्माण झाली. तसा तो अघोरीपणा करु लागला. ज्या निसर्गाच्या सानिध्यात तो वाढला, ज्या निसर्गाने त्याला जगवले त्याच्यावरच तो हल्ला करु लागला. जंगलाची तोड होऊ लागली. जमिनीतील खनिजे उपसले जावू लागले. इंधनाचा शोध लागल्यापासून तो इंधनसाठे जप्त करण्यासाठी टोकाचे पाऊल उचलू लागला. इंधनासाठी आता पर्यंत कित्येकवेळा यादवी माजली आणि आजही ती थांबलेली नाही. निसर्गाचा समतोल राखण्याऐवजी बिघडू लागला. नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले. पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला. निसर्ग भकास करण्याचा जणू माणसाने विडाच उचलला अशी परस्थिती निर्माण झाली. केवळ माणसामुळे निसर्ग धोक्यात आला. विज्ञानाची प्रगती निसर्गाच्या मुळावर येऊ लागली. भविष्यात किती निसर्गाची हाणी होणार या बाबत अंदाज आज व्यक्त केला जात आहे. निसर्गाची हानी होणं हे माणसासाठीच चांगलं नाही. निसर्गाची होत असलेल्या हानी बाबत अनेक वैज्ञानीक चिंता व्यक्त करत असतात. मात्र त्याच्या चिंतेकडे दुर्लक्ष केलं जातं. एक दिवस पृथ्वीचं अस्तित्व नष्ट होईल असं ही काहीचं मत आहे. आपल्यासाठी नाही तर येणार्‍या पिढ्यासाठी पृथ्वीचं आरोग्य चांगलं ठेवणं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. आपल्या कर्तव्यांचा सर्वांना विसर पडलेला आहे.
विज्ञानाचा प्रवास
माणुस दोन पाय आणि दोन हाताचाच पण त्याने अनेक कमालीच्या कल्पनेला जन्म घातला. जशा त्याने कल्पना निर्माण केल्या. तशा त्याने सत्यात देखील उतरवल्या आहेत. पायी चालणारा माणुस घोड्यावर आला आणि घोड्यावरचा माणुस यानात अंतराळात प्रवास करु लागला. दगडाने शिकार करणाराच्या हाती विविध शस्त्र आले, तो बसल्या-बसल्या कोठे ही बॉम्ब टाकू शकतो. इतकी अफाट ताकद त्याने निर्माण केली, ती केवळ आपल्या बुध्दीच्या जोरावर, तलवारीच्या युध्दाला आता पुर्णविराम मिळाला आहे, हे जग हजार वेळा नष्ट होईल इतकी भयानक अस्त्रे त्याने जन्माला घातले. ज्याच्या हाती जास्त अस्त्र त्या देशाची जास्त चर्चा होवू लागली. विज्ञानाचे प्रयोग आणखी थांबलेले नाहीत, ते सुरुच आहेत. ज्या गोष्टीचा पुर्वीच्या लोकांनी विचार केला नाही अशाच बाबी आजचा माणुस निर्माण करत आहेत. अवघं जग त्याच्या मुठीत असल्यासारखं आहे. कॉम्प्युटर्सच्या एका क्लीकवर अवघं जग पाहता येतं. जगात कुठं काय झालं याची माहिती काही सेकंदात उपलब्ध होवू लागली. विज्ञानाने माणुस फास्ट झाला. तसाच तो आळशी ही झाला. विज्ञान जितकं चांगलं तितकच ते मारकही ठरु लागलं.
महामारी, आजरपण
जीवन म्हटलं की, मरण आलचं, अकाली मरणारांची संख्या पुर्वी खुप होती,एखादी साथ आली की, ती वर्ष-वर्ष आटोक्यात येत नव्हती. साथीने, कित्येकांना गिळलेलं आहे. काही रोगांची इतिहासाने नोंद करुन ठेवली. प्लेग सारख्या रोगाने गावे की गावे ओस पडत होती, पुरातन काळात ही अनेक साथीचे रोग होते, त्या वेळी रोगाचे निदान होण्यापुर्वी हाजारो लोक मरत होते, जुने आजार मागे पडत गेले, नवीन आजार पुढे येवू लागले. माणसाचं शरीर आजाराचं माहेर घर बनवू लागलं. काही आजार असे आहेत ते माणसाला जडले की, ते माणसाला घेवूनच जातात. विज्ञानाने जग जवळ आणले असले तरी काही आजार विज्ञानाला दाद देत नाहीत. विज्ञान आपला शोध सुरुच ठेवून ज्या आजारावर उपचार नाहीत त्याचा अभ्यास विज्ञान आज ही करत आहे. काही देशातील शास्त्रज्ञ इतके पुढे गेले की, ते कृत्रीम मेंदु निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. विज्ञान किती ही पुढे गेलं असलं तरी निसर्ग त्याच्या पुढे नेहमीच नवीन संकटे उभी करत आहे हे ही तितकेच खरे आहे.
जगावर संकट
मानवाने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले. जगात २०० पेक्षा जास्त देश आहेत. प्रत्येक देशात वेगवेळ्या स्पर्धा दिसतात. काही देश आज ही अंतर्गत धुमसत असतात. जाती-पातीचं आणि धर्माचं राजकारण थांबलेलं नाही. सामुहिक हत्याकांड सुरुच आहेत. सर्व मानव जातीने गुण्यागोविंदाने एकत्रीत नांदावे असे संदेश नेहमीच दिले जातात, पण हे संदेश किती लोकांच्या डोक्यात बसतात? कोरोनामुळे अवघं जग परेशान आहे. या आजाराने जगात भीती निर्माण केली. आता पर्यंत जगातील हजारो लोक आजाराने मरण पावले. कित्येकांना लागन झाली. रोज नवे रुग्ण वाढत आहेत. प्रगतीशील म्हणुन घेणारे देश पुर्णंता हातबल झाले. त्यांचे विज्ञान कोरोनाची लस शोधू शकले नाही. जागातील संपुर्ण मानव जात एकत्रीत येवून कोरोनाला हारवण्यासाठी लढत आहे पण कोरोना सगळ्यांना भारी पडू लागला. अदृष्य असलेला विषाणू किती खतरनाक असू शकतो हे रोजचं दिसतयं, एकमेकांना दुषणे देणारे देश, आपल्यातील राग-लोभ विसरुन कोरोनाच्या विषाणुचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. माणुस कोरोनाच्या विरेाधात जिद्दीने लढत आहे, पण त्याला तितकं यश येत नाही. एकदा अमेरिकेचे माजी अध्यक्ष रोनाल्ड रीगन (अनपेक्षीतपणे) म्हणाले होते की, मानवजातीला आज ना उद्या एकत्र यावेच लागेल. परग्रहावरुन पृथ्वीवर आक्रमण होईल तेव्हा, सर्वांना आपला राष्ट्रवाद,धर्मवाद, विचारसरणी विसरुन आक्रमणाचा एकत्रीपणे प्रतिकार करायला सिध्द व्हावे लागेल. रीगन यांनी गृहीत धरले होेते की, परग्रहावरचा माणुस पृथ्वीवरील माणसासारखाच आक्रमक ,िंंहंसक व विध्वंसक असेल. आजची परस्थिती काही वेगळी नाही. कोरोनाच्या विषाणुने जगात विध्वंस सुरु केला, तो एक मानव जातीवर हल्लाच आहे. ऐरवी किरकोळ कारणासाठी भांडणारे, जात,पात पाहणारे आज सगळं काही विसरुन एकत्रीत येवून कोरोनाशी युध्द करत आहेत. त्याचा शेवट काय होईल हे आज सांगता येणार नाही, पण माणुस कोरोनाशी तीव्र लढा देवून आपलं अस्तित्व आबादीत राखण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व मानव जात एकत्रीत आली आहे, कोरोनाला हरवण्यासाठी, ही विशेष बाब आहे.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like