संपादकीय- खर्ची पडलेल्या डॉक्टरांची  ही अवहेलना नव्हे काय?

eReporter Web Team

खर्ची पडलेल्या डॉक्टरांची 
ही अवहेलना नव्हे काय?
गणेश सावंत
कर्तव्यशून्य माणसाची अधोगती लोकांच्या लक्षात येऊ लागली की, कर्तव्यशून्य माणूस आपल्या अधोगतीवर पांघरुण घालण्यासाठी आपण किती प्रगती पथावर आहोत हे दाखवत असताना सामाजिक बांधिलकीत अग्रेसर असणार्‍या व्यक्तींची स्तूती करतो, स्तूतीसुमने उधळतो मात्र त्याच सामाजिक बांधिलकीत कर्तव्य बजावणार्‍याला शब्द सुमनाव्यतिरिक्त काहीच देत नाही हे वेळोवेळी पदोपदी आणि वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक वेळा दिसून आले आहे. केवळ शब्दांच्याच फुशारक्या मारणारे केेंद्रातले सत्ताधीश आपल्या कर्तव्यशून्य पणाचा नमुना पुन्हा एकदा दाखवताना दिसून आले आहेत. कोरोना महामारीत आपला जीव तळ हातावर ठेवत कोरोना बाधीतांचा उपचार करणारे देशभरातील डॉक्टर सेवा करताना किती जण खर्ची पडले याची माहिती केेंद्र सरकारकडे नसावी, यापेक्षा खेदजनक ते काय असेल. लोकसभेचं अधिवेशन चालू आहे, यामध्ये मोदी सरकारला कोरोनाच्या कार्यकाळात देशभरात किती डॉक्टरांचा मृत्यू झाला हे सांगता आले नाही. सरकारकडे त्याची आकडेवारी नाही. हे जेव्हा समोर आले तेव्हा केवळ स्तूतीसुमनात योद्धांना सरकार गुंडाळत असेल तर यापेक्षा नाकर्तेपणाचा दुसरा तो नमुना नसेल. क्षेत्र कुठलेही असो, रणांगण कुठलेही असो, मग ते ते सीमेवरचा असो अथवा घरातला असो. स्वत:च्या मरणाची फिकिर न करता देशवासियांच्या जीवाची काळजी घेणारा तो योद्धा म्हणून आपल्याकडे संबोधला जातो. परंतु  
कोविड योद्धा 
   म्हणून आपण ज्या आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणार्‍या डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार यांच्यासह अन्य व्यक्तींकडे पाहतो. त्या कोविड योद्धांच्या शहादतची नोंद केेंद्र सरकारकडे नसावी यापेक्षा त्या कोविड योद्धाची अवहेलना ती काय. ज्या प्रमाणे पहिल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मजूर मोठ्या संख्येने गावी परतत असताना रस्त्यात मृत्यूमुखी पडले, त्या मजुरांची जशी केेंद्र सरकारकडे नोंद नव्हती तशीच नोंद कोविडमध्ये काम करत असताना मृत्यूमुखी पडलेल्या डॉक्टरांचीही केेंद्र सरकारकडे नोंद नाही. दुर्दैवाने असंवेदनशील असलेल्या मोदी सरकारकडून याबाबत अपेक्षा करणं तसे गैरच. कारण जे सत्तघाधीश, जे सरकार हुकुमशाही वृत्तीचं असतं, जे लोक घटनेपेक्षा मनुस्मृतीला महत्व देत आले आहेत, राजकीय जीवनामध्ये समाजाच्या मुलभूत गरजांपेक्षा , लोकांच्या विकासापेक्षा जात-पात, धर्म-पंथ या विषयांना अधिक महत्व देत आहेत अशा लोकांकडे सद्सद्विवेक बुद्धीने चांगले काम करणार्‍या लोकांची नोंद असेलच कशी! आपल्याकडे सीमेवर सैनिक तैनात असतो, भारत मातेच्या छातीवर पाय देणार्‍याच्या तो छाताडात गोळ्या घालतो, देशाचे रक्षण करतो आणि रक्षण करत असताना आमचे अनेक जवान शहीद होतात तेव्हा अशा योद्धांचा आम्ही सन्मान करतो तो केवळ त्यांची नोंद सरकार दरबारी असते, लोकांपर्यंत त्यांचे नाव येते आणि त्यांनी केलेले कर्तव्य हे आसमंता एवढे प्रचंड मोठे असते. ते दृष्टिक्षेपात पडणार्‍या मैदानातल्या शत्रुशी लढत असतात. परंतु अदृश्य शत्रू असलेल्या कोरोनाशी लढा देणार्‍या त्या 
  शहीद डॉक्टरांचे काय ? 
  कोरोनासारख्या अदृश्य शत्रुशी थेट भिडण्यासाठी देशभरातील डॉक्टर गेल्या सहा महिन्यांपासून कोविड वॉर्डामध्ये काम करत आहेत. या शत्रुशी लढा देताना देशभरात अनेक डॉक्टर मृत्युमुखी पडले आहेत. एकट्या महाराष्ट्रात डॉक्टर, परिचारिकेसह आरोग्य क्षेत्रातले असे १८८ जण शहीद झाल्याचे महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात येते. महाराष्ट्राकडे याची नोंद आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रातलं सरकार महाराष्ट्राशी इमान राखत महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी बलिदान देणार्‍या मग ते कुठल्याही क्षेत्रात असो त्याची इत्यंभूत नोंद ठेवतं हे महाराष्ट्र सरकारचं मोठं कर्तव्य नाही तर ते कर्तव्य आहे. त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करायला हरकत नाही. परंतु उंटावरून शेळ्या हाकणार्‍या मोठमोठ्या बाता करणार्‍या केंद्र सरकारचं काय? केंद्र सरकारकडे कोविड काळात मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टरांची नोंद नसेल, त्यांची दखल घेतलेली नसेल, किती डॉक्टर मृत्युमुखी पडले हे केंद्र सरकारला माहित नसेल तर केंद्र सरकारचा मोदी सरकारचा हा असंवेदनशीलपणा नव्हे. केवळ 
थाळ्या आणि 
टाळ्या वाजवून 
स्तुतीसुमने उधळून अदृश्य शत्रुशी लढताना मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टरांच्या कुटुंबियांची जबाबदारी थाळ्या आणि टाळ्या वाजवल्याने संपुष्टात येते काय? हाही आमचा सवाल आहे. कोविड योद्धा म्हणून डॉक्टरांना सन्मान केले जाते, टाळ्या आणि थाळ्या वाजवून त्यांचं प्रोत्साहनही वाढलं असेल, दिपप्रज्वलीत करून, आभार व्यक्त करून, ऋण व्यक्त करून त्यांच्या कर्तव्याचा जय जयकारही महत्वाचा मानला जाईल. परंतु ज्या घरातला व्यक्ती कोरोना उपचार करताना मृत्युच्या दारात गेल, सरणावर गेला त्या घरातील, त्या डॉक्टराच्या पत्नीचे काय? आई वडिलांचे काय? त्यांच्या लेकरांचे काय? अदृश्य शत्रुशी लढा म्हणजेच देशावर झालेल्या आक्रमणाशी लढा म्हणावा लागणार आहे आणि या लढ्यात लढताना जे लोक शहीद झाले आहेत त्या लोकांच्या घरातील लोकांची जबाबदारी सरकारची नाही काय? सरकारने कोरोनाशी लढताना मृत्युमुखी पडलेल्या योद्धांच्या घरी साधं सांत्वनाचं देखील पत्र पाठवलं का? हा प्रश्‍न माणुस म्हणून विचारायलाच हवा. कोविड योद्धा म्हणून आरोग्य विभागात काम करणार्‍या लोकांचं कौतुक केलं जातं. परंतु प्रत्यक्षात या कोविड योद्धाला ज्या काही यातना, ज्या काही अडचणी येतात त्याकडे केंद्र सरकारचं लक्ष आहे का? मुळात जे लोक लोकांच्या मुलभूत गरजा भागवण्यासाठी प्रयत्नांची परिकाष्ठा करतात, एकवेळी आपल्या जीवाचीही परवा करत नाहीत त्या लोकांकडे लक्ष दिलं जात नाही. मात्र राजकारणाचा विषय, मताचा विषय डोळ्यांसमोर ठेवून इथे जनावरांकडे लक्ष दिलं जातं. इथं माय-मावशी छेडली गेली, मारली गेली, तिला महत्व नाही, गाय मारली गेली तर तिथं मात्र सरकार आपलं कर्तव्यपणा दाखवतं, हे या देशाचच दुर्दैव म्हणावं लागेल. कोविड काळामध्ये किती 
योद्धे धारातिर्थ
पडले याची नोंद केेंद्र सरकारकडे नाही. यापेक्षा केेंद्र सरकारचे कोरोना बाबतचे दुर्लक्षपण दुसरे ते काय असेल. सुदैवाने या देशाचा आरोग्य मंत्री डॉक्टर आहे. डॉ. हर्षवर्धन यांना खरं तर आपल्या समव्यवसायिकांची काळजी असायला हवी, त्यांनी त्यांची बाजु घ्यायला हवी, परंतु बाजु घ्यायचे तर द्या सोडून हर्षवर्धन यांना या अदृश्य शत्रुशी लढताना किती डॉक्टर मृत्युमुखी पडले हे सुद्धा माहित नाही. यापेक्षा सरकारचा निर्भत्सपणा तो काय? इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी जेव्हा आवाज उठवला तेव्हा कुठं आता सरकार या संघटनेने उपस्थित केलेल्या मुद्यांकडे लक्ष देऊ लागलय. याच संघटनेच्या माहितीनुसार कोरोनाशी दोनहात करताना देशभरातील ३८२ डॉक्टर बळी गेल्याचे सांगण्यात येते. आम्ही तर म्हणू  कोरोना सारख्या अदृश्य शत्रुशी लढा देणारे डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका यांच्यासह पोलिस सफाई कामगार आणि अन्य प्रत्यक्ष कोरोनाशी लढा देणार्‍या प्रत्येक क्षेत्रातील कोविड योद्ध्याची नोंद ही सरकारकडे असायला हवी. परंतु जे सरकार कर्तव्य कर्मापेक्षा धर्माला अधिक महत्व देतं तेव्हा माणसा-माणसातील अधर्माला अधिक वाव मिळतो आणि तेच अधर्म करण्याचे पाप केंद्र सरकारकडून सध्या अप्रत्यक्ष नव्हे तर प्रत्यक्ष होतय. असं जबाबदारीने याठिकाणी म्हणावेसे वाटते. 


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like