अग्रलेख- हरिश्‍चंद्राच्या फॅक्टरीत गर्दुल्ले

eReporter Web Team

गणेश सावंत
महाराष्ट्र रेटणारा नव्हे तर खेटणारा आहे, महाराष्ट्राची माती सुपिक आणि उपजाव आहे. त्यामुळेची माणसे स्वाभिमानी आहेत, कर्तृत्ववान आहेत. सत्याला सत्य आणि असत्याला असत्य मानत धाडसाने आव्हाने पेलवणारी आहेत. हिमालयाच्या मदतीला सातत्याने धावणारा सह्याद्री हिच या मराठी मुलुखाची खरी यशोगाथा आहे. अशा वेळी महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या मातीला बदनाम आणि बेईमान ठरवण्याचे काम अनेक वेळा अनेकांच्या मेंदूमध्ये शिजले. परंतु आज पावेत अशा नत्द्रष्ट प्रवृत्तीच्या मेंदुंना महाराष्ट्राने ठेचून काढले. महाराष्ट्राचा अविभाज्य घटक म्हणून मुंबईकडे पाहितलं जातं. जी मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे त्या मुंबईला आपल्या कव्हेत घेण्याचा अनेक वेळा अनेकांनी प्रयत्न केला परंतु मुंबई महाराष्ट्राची आहे आणि ती महाराष्ट्रातच राहणार हेही महाराष्ट्राने अनेक वेळा ठणकावून सांगितले. जेव्हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील माणूस रेटत नाही, तो आपल्याला सातत्याने खेटतो तेव्हा महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या माणसाला बदनाम करण्या इरादे त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे काम काल सुरू होतं आणि आजपण ते सुरू आहे. प्रत्येक वेळा पद्धत वेगळी असते. कधी राजकारण, कधी समाजकारण, कधी भौगोलिक कारण तर कधी महाराष्ट्राच्या धारदार इतिहासाचे वस्त्रहरण केले जाते. या वेळी मात्र हे सर्व विषय बाजुला ठेवून मुंबईला देशात आणि जगात नाव कमवून देणार्‍या सिनेसृष्टीला बदनाम करण्याचं काम होतय. हे स्पष्टपणे म्हणायला काहीच हरकत नाही. अवघ्या देशाला चित्रपटाची निर्मिती ही महाराष्ट्राच्या मातीने करून दिली. त्याच चित्रपटसृष्टीला नशाबाज, नशिले, गर्दुल्ले ठरवण्याचा खटाटोप सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावरून सुरू झाला. नट-नट्यांना नशाबाज असल्याचे दाखवण्याचा खटाटोप जो सुरू आहे तो निव्वळ नट-नट्यांच्या नशिली यौवनांचा चटका म्हणून नव्हे तर यामागे महाराष्ट्राला बदनाम करण्याचा खटका अनेकांच्या हाताने पाडला जातो. मग 
हरिश्‍चंद्राची फॅक्टरी  
गर्दुल्ले होते का? हा सवाल उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. रोज कुठल्या एका नटीवर फोकस करायचं ती चरस, गांजा, अफिम घेत असल्याचे सांगायचे अन् अखंड मुंबई चित्रपटसृष्टीला बदनाम करायचे हे नेमके काय चालू आहे? ज्या चित्रपटसृष्टीने देशाचं नाव जगात गाजवलं, अनेक मोठमोठे लोक घडवले, गायक, कलाकार यांच्यासह पडद्यामागे काम करणार्‍या हजारो हातांना काम दिले. अख्खी चित्रपटसृष्टी बदनाम का होतेय? का तिला जाणीवपूर्वक बदनाम केलं जातय. जे सुज्ञ लोक म्हणण्यापेक्षा या सृष्टीत काम करणारे व्यवस्थेविरोधात बोलतात, प्रवाहाच्या विरोधात जावून मत प्रकट करतात, अशांना तर व्यवस्था टार्गेट करण्याचा प्रयत्न तर करत नाही ना? असे एक ना अनेक प्रश्‍न आज महाराष्ट्रातील चित्रपटनगरीत होत असलेल्या घडामोडीतून उपस्थित होत आहेत. मुंबई मायानगरी आहे, चंदेरी दुनिया आहे, अनेकांचं स्वप्न पुर्ण करणारी मुंबई माझी आहे आणि या मुंबईला मायानगरी चंदेरी दुनिया बनवण्याचे काम याच मराठी मुलुखातल्या मराठी माणसाने केले आहे. दादासाहेब फाळकेसारख्या मराठी माणसाने सिनेमासाठी झपाटून काम केले आणि मुंबई महानगरीला जगाच्या पाठीवर नेऊन ठेवले. हा इतिहास नाकारता येणार आहे का? दादासाहेब फाळकेंनी एकदा नाडकरणींना माणसाचा 
मेंदू गहाण 
ठेवण्याची व्यवस्था असते तर बरं झालं असतं असं म्हटलं होतं. इ.स. 1911 साली मुंबईत दादासाहेब फाळकेंनी एक चित्रपट पाहितला आणि तेथूनच फाळकेंना चित्रपट तयार करण्याचं वेड लागला. चित्रपट तयारीसाठी त्यांना ज्या काही करावं लागलं ते अटकेपार होतं. अक्षरश: लोकांनी त्यांना वेडात काढलं. जवळच्या नातेवाईकांनी गुंगीचं औषध पाजून त्यांना वेडांच्या इस्पितळात नेलं होतं. परंतु फाळकेंना इतिहास रचायचं होतं, महाराष्ट्राचं नाव जगाच्या पाठीवर लिहायचं होतं. सत्य आणि विज्ञानी दृष्टीकोन लोकांसमोर आणायचा होता. म्हणून त्यांनी चित्रपट बनवण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावला. आर्थिक परिस्थिती नसताना घरातलं सामान विकलं अन् चालता मुकपट बनवण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री आणण्यासाठी थेट लंडनला गेले. तिथे कॅमेरा चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं. फाळके मुंबईत ाले आणि सर्वप्रथम घरामध्ये कुंडीत एक बिज लावून पंधरा दिवसात ते कसं उगवतं याचं प्रात्यक्षित घरच्यांना आणि मित्र परिवारांना याची देही याची डोळा दाखवलं आणि तेथून फाळकेंच्या या वेडाला मान्यता मिळत गेली. जेव्हा चित्रपट काढण्याचे ठरवण्यात आले तेव्हा त्यासाठी लागणारा खर्च कोठून उभा करायचा यासाठी आपला मित्र नाडकर्णींसोबत ते चर्चा करू लागले. तेव्हा नाडकर्णी फाळकेंना म्हणाले, डोळे ठिक आहेत का? होय ठिक आहेत, डोकं ठिक आहे का फाळकेंचं? ते दुरुस्त होणं अवघड आहे नाडकर्णींनी. याचाच मतितार्थ जे काम हाती घेतलं आहे ते पूर्णत्वास नेणं एवढं होतं आणि पहिला चित्रपट फाळकेंनी राजा हरिश्‍चंद्र काढला आणि तेथून हा प्रवास आजपावेत सुरू आहे. मुंबईला आणि महाराष्ट्राला मराठी माणसाने जगाच्या पाठीवर नेले, कोल्हापुरात मराठी चित्रपट मुंबईत हिंदी चित्रपट होत राहिले, मुंबई चित्रपटसृष्टीचा इतिहास अफाट आहे. परंतु मेंदू गहाण टाकणारा नाही. पुढे चालून या सृष्टीला प्रचंड यश प्राप्त राहिलं आणि यशाच्या शिखरावर गेलेल्या अनेकांकडे अमाप संपत्ती निर्माण झाली आणि या संपत्तीतूनच मग गदुर्र्ल्यांची पैदास होत राहिली. परंतु आजचा विषय एखाद दुसर्‍या नशेबाजाचा नाही, गर्दुल्याचा नाही. आज विषय आहे 
मेंदु गहाण ठेवत नशा 
असणार्‍यांचा. इथं व्यवस्थेची स्तुती केली. व्यवस्थेतील व्यक्तीचं कौतुक केलं. त्याच्या विचाराशी जमवून घेतलं की तो अक्षरश: राजा हरिश्‍चंद्रच होतो, परंतु व्यवस्थेच्या चुकांवर बोटं ठेवलं, राजकीय कार्यप्रणालीवर आक्षेप घेतला, त्रुटी काढल्या मग मात्र तो देशद्रोहीपासून नशेबाजपर्यंत आणि चारित्र्यहीनही होऊन जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत गुजरातमध्ये पतंग उडवणारा सलमान व्यवस्थीत असतो, गुजरातचे अ‍ॅम्बेसेडर राहिलेले अमिताभ बच्चन व्यवस्थीत राहतात, नव्हे नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आंबे कसे खातात? हे उभ्या देशाला मुलाखतीतून सांगणारा अक्षय कुमार हाही भलाभाती असतो. यातून एवढच सांगायचं आहे, चित्रपटसृष्टी आणि राजकारण आता बरचसं एकत्रित येत आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार हे आमदार-खासदार आहेत. अनेक नट-नट्या विधानसभा-लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी रणांगणात येतात, भलेही राजकारण्यांनी त्यांना फक्त गर्दी जमवण्यासाठी बोलवलेलं असलं तरी फाळकेंच्या हरिश्‍चंद्राच्या फॅक्टरीत कपटी राजकारणाची झालर लागत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई सिनेमासृष्टीला नशाबाज ठरवलं जातय की, मुंबई महानगरीतून कर्तबगारांना हाकलून देण्याचा बेत आखला जातोय हे कळायला सध्यातरी मार्ग नाही. परंतु महाराष्ट्राची माती ही खच खणारी नाही, वांझोटी तर नाहीच नाही, भिणारी नाही, दगा-फटक्याला घाबरणारी नाही. केवळ राजकारण किंवा राजकीय नशाच्या हव्यासापोटी मुंबईला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असेल तर हे सर्वात मोठे दुर्दैव असेल. राजकारण करताना समाजकारणाकडे जेवढं लक्ष दिलं जायला हवं. केवळ राज्यकर्ते झाल्यानंतर सर्वांकडे समानतेने पहायला हवं, परंतु 
केंद्र सरकार 
ज्या नशेबाजीत 
काम करताना दिसून येतं, ती नशा अहंकाराची आहे, अहमपणाची आहे, मी पणाची आहे, हुकुमशाही आहे. कुठल्याही क्षेत्रात राज्यकर्त्यांविरोधात नकारात्मक प्रतिक्रिया आली की, त्या क्षेत्रातल्या नकारात्मक प्रतिक्रिया देणार्‍याविरोधात केंद्राकडून जी मोहीम आखली जाते गेल्या सहा वर्षांच्या कालखंडात उभ्या देशाने नव्हे तर उभ्या जगाने पाहितले आहे. मुंबईतील सिनेमासृष्टी गर्दुल्ली असेल तर केंद्रातले मोदी सरकारही अहंकाराचे, अहमपणाची नशा करणारेच म्हणावे लागेल. राजकीय पटलावर एखाद्या नेत्याने विरोध केला, त्याच्या पाठीमागे ससेमिरा लावा, सिनेमासृष्टीतील एखादी नटी सरकारविरोधात आंदोलन करणार्‍या आंदोलनस्थळी गेली की तिला चारित्र्यहिन ठरवा, नशेबाज ठरवा हे जे धोरण आखलं जात आहे ते जास्त काळ टिकणारा नाही. आज लोकांना हिंदी चित्रपटसृष्टी आणि त्यातील नट-नटी किती नालायक आहेत, नशाबाज आहेत हे दाखवण्याचा पुरेपूर होत असला तरी हा प्रयत्न केवळ नट-नट्यांबाबत नव्हे तर तो अखंड महाराष्ट्राबाबत, मुंबई बाबत असायला हवा, हे बोलायला वाव नक्कीच मिळत आहे. भाजप ज्या पद्धतीने आपल्या अहंकाराच्या भूमिकेतून एखाद्याला जीवनातून उठवण्याचा अट्टाहास करते, केवळ आपलं सरकार आलं नाही म्हणून त्या राज्यालाच दुश्मन समजते, त्या भारतीय जनता पार्टीकडून भविष्यात महाराष्ट्रातील लोक अपेक्षा ती काय करतील? मुंबई चित्रपटसृष्टीला दादासाहेब फाळकेंचा इतिहास आहे.
 


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like