धनंजय मुंडे अडचणीत; गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

eReporter Web Team

औरंगाबाद (रिपोर्टर):- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर अडचणीत आले आहेत. सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. तर या प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचा संबंध नसल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले.
       सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात राजाभाऊ फड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली असता हायकोर्टाने धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. हायकोर्टाने तपास अधिकार्‍याच्या भूमिकेवरही ताशेरे ओढले आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर हायकोर्टाने हा निर्णय दिल्याने धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सत्ताधार्‍यांकडून या प्रकरणावरुन मुंडे यांची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे.
रत्नाकर गुट्टे प्रकरणी आवाज उठवल्यामुळे राजकीय
सुडबुध्दीतून आपल्या विरूध्द तक्रारी - धनंजय मुंडे

 पुस ता.अंबाजोगाई येथील जगमित्र शुगर मिल्स साठी कोणत्याही संस्थानाची अथवा शासनाची जमिनी कुणाचीही फसवणुक करून खरेदीखत करून घेतलेली नाही. मात्र शेतकर्‌यांना व बँकांना ५४०० कोटी रूपयांना बुडवणार्‌या रत्नाकर गुट्टे यांचे प्रकरण मी लावुन धरल्यामुळे त्यांचे जावाई असलेल्या राजाभाऊ फड यांच्या कडून राजकीय सुडबुध्दीने कोर्टाची दिशाभूल करून आपल्या विरूध्द खोटे आदेश मा.न्यायालयाकडून प्राप्त करून घेतले असल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. जगमित्र शुगर मिल्स प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुन्हे दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशाच्या संदर्भात आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
सदर जमिनीची खरेदी रजिस्ट्री ऑफीस अंबाजोगाई येथे खरेदी खताच्या आधारे करून तहसिल कार्यालय, अंबाजोगाई येथे फेरफार घेण्यात आलेली आहे. ती जमिन देवस्थानची नाही, या प्रकरणी चंद्रकांत गिरी व इतरांनी अंबाजोगाई न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यामध्ये जगमित्र शुगर मिल्सच्या नावाने न्यायालयात डिक्री झालेली आहे. असे असतांना चुकीच्या माहितीवरून न्यायालयाची दिशाभूल करण्यात आलेली आहे. या प्रकरणाची सर्व कागदपत्रे, कागदोपत्री पुरावे व महसूल कागदपत्रे आपल्या बाजुने आहेत. या प्रकरणी या पूर्वीच आपल्यावर अंबाजोगाई न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झालेल्या असताना राजकीय त्रास देण्याच्या हेतूने एकाच प्रकरणामध्ये वारंवार नाव बदलून कोर्टाची दिशाभूल करून, खोटे आदेश न्यायालयाकडून प्राप्त करून घेतलेले आहेत. या प्रकरणातील तक्रारदार राजाभाऊ फड हे रत्नाकर गुट्टे यांचे जावाई आहेत. रत्नाकर गुट्टे यांनी ५४०० कोटी रूपयांची शेतकरी व बँकांची फसवणुक केली, या प्रकरणी आपण आवाज उठवल्यामुळेच राजकीय सुडबुध्दीतून त्यांचे जावाई आपल्या विरूध्द न्यायालयात वारंवार तक्रारी करत असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयातून आपल्याला नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला


अधिक माहिती: beed

Related Posts you may like