शिवाजी महाराजांचा अपमान करणार्‍या श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारचा दणका

eReporter Web Team

मुंबई (रिपोर्टर):- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादात अडकलेला अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारने दणका दिला आहे. महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी नगरविकास विभागाने छिंदमवर कारवाई केली असून त्याचे नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे. यासंदर्भातील निकाल नगरविकास विभागाने आज दिला.
   महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी छिंदमवर कारवाई करण्यासंदर्भात नगरविकास विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवर गुरुवारी सुनावणी होणार होती. या सुनावणीला छिंदमला उपस्थित राहून आपली बाजू मांडण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र छिंदम या सुनावणीला उपस्थित राहिला नाही. त्यानंतर आजच्या सुनावणीलाही छिंदम अनुपस्थित होता. अखेर आज छिंदमला मुदतवाढ न देता किंवा त्यांची वाट न पाहता नगरविकास विभागाने आपला निकाल सुनावला. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये महापुरुषांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही. महापुरुषांच्या नावाने राज्याच्या प्रशासनाचे काम चालते. असं असतानाच लोकप्रतिनिधींकडून महापुरुषांबद्दल अशाप्रकाराची वक्तव्य केली जात असतील तर त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो असं निकालादरम्यान नगरविकास विभागाने स्पष्ट करत छिंदमचे नगरसेवक पद काढून घेण्याचा निर्णय दिला.


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like